क्षारपड जमीन सुधारण्याचे गणपतराव पाटील यांचे काम कौतुकास्पद : डॉ. लॉरी वॉकर



प्रेस मीडिया लाईव्ह :

शिरोळ (प्रतिनिधी) : 

क्षारपड जमीन सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना एकत्र करणे हे सोपे काम नाही, पण उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी हे केलेले काम कौतुकास्पद असून त्याचा विशेष आनंद आहे. शेती करत असताना शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याची आपली नैतिक जबाबदारी आहे. मिशिगन विद्यापीठ अमेरिका, सोमय्या विद्याविहार विद्यापीठ मुंबई आणि श्री दत्त कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनेक उपयोगी उपाययोजना आणि सहकार्य करता येईल. भविष्यात सामंजस्य करार होईल, त्याचाही फायदा या भागातील शेतकऱ्यांना नक्क्की होईल, असे मत मिशिगन विद्यापीठ अमेरिकेचे कृषी अभियंता डॉ. लॉरी वॉकर यांनी व्यक्त केले.

  

 श्री दत्त कारखान्याच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पाची पाहणी व अभ्यास दौऱ्यावेळी ते कारखाना कार्यस्थळावर बोलत होते. प्रारंभी दत्त कारखान्याचे चेअरमन, उद्यापंडित गणपतराव पाटील यांनी स्वागत करून सर्वांचा सत्कार केला. कार्यक्षेत्रातील आत्तापर्यंत झालेल्या क्षारपड मुक्तीच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला. मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना यांनी प्रोजेक्टरद्वारे योजनेची संपूर्ण माहिती दिली. यावेळी बोलताना डॉ. लॉरी वॉकर यांनी कारखान्याच्या शुगर बिट उपक्रमाची विशेष नोंद घेऊन चांगल्या प्रतीचे बियाणे उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. सोमय्या विद्याविहार विद्यापीठ मुंबईच्या सूक्ष्म जीवशास्त्र मधील संचालिका डॉ. पार्वती जे. आर. यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी आणि प्रश्न समजावून घेऊन संवाद साधण्याच्या उद्देशाने अभ्यास सुरु असल्याचे सांगितले. तसेच याबद्दल विद्यापीठ आणि शेतकऱ्यांच्यात सामंजस्य कराराद्वारे काम सुरु असल्याचे सांगितले.

शेडशाळ येथे महिलांनी स्थापन केलेल्या बीज बँकेची पाहणी करून सध्या बीज बँक तयार करण्याचे काम छोटे वाटत असले तरी देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी हे महत्वाचे असल्याचे डॉ. वॉकर यांनी सांगितले. या अभ्यास दौऱ्यात त्यांनी शेडशाळ, घालवाड, शिरोळ या ठिकाणी सुरू असलेल्या क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पास शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेटी देऊन सर्व तांत्रिक बाजू समजावून घेतल्या. 

या अभ्यास दौऱ्यात मिशिगन विद्यापीठाचे (अमेरिका) विस्तार विभाग प्रमुख नईम एडवर्ड, सोमय्या कृषी संशोधन केंद्राचे संचालक डॉ. ए. डी. कडलग, कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रजचे प्रभारी अधिकारी डॉ. एम. पी. देशमुख, इरिगेशन व ड्रेनेज अभियंता डॉ. एस. डी. राठोड, असोसिएट प्रोफेसर सॉईल सायन्स डॉ. आर. बी. पवार व डॉ. एस. डी. काळे उपस्थित होते. त्याचबरोबर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अरुणकुमार देसाई, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, कारखान्याचे सर्व संचालक, संचालिका, ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव व सर्व खातेप्रमुख तसेच शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post