सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागातील अव्वल कारकून आणि लिपीकाला दीड लाख रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले.

 या कारवाईमुळे जोरदार खळबळ उडाली आहे.


प्रेस मीडिया लाईव्ह :

सांगली : महारवतनाची जमीन विक्री करण्याची परवानगी मिळवून देण्यासाठी सांगली जिल्हाधिकारी  कार्यालयातील महसूल विभागातील अव्वल कारकून आणि लिपीकाला दीड लाख रुपये लाच घेताना सांगली एसीबीच्या पथकाने  सापळा रचून रंगेहाथ पकडले.अव्वल कारकून अनंता विठ्ठलराव भानुसे (वय-51 रा. क्रांती नगर, सांगली), रोजगार हमी योजनेचा लिपीक आणि डाटा इंट्री ऑपरेटर दिलीप निवृत्ती देसाई अशी लाच स्वीकारणाऱ्या दोघांची नावे आहेत. सांगली एसीबीने  ही कारवाई सोमवारी (दि.30) जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पोउपहार गृहाच्या आवारात केली. या कारवाईमुळे जोरदार खळबळ उडाली आहे.

याबाबत तक्रारदार यांनी 19 जानेवारी रोजी सांगली एसीबीकडे तक्रार केली आहे. तक्रारदार हे खरेदी करणार असलेल्या जमीनीच्या मालकांनी महारवतनाची जमीन विक्री करण्याची परवानगी मिळावी यासाठी सांगली जिल्हाधिकारी कार्य़ालयात अर्ज केला होता. वरिष्ठांना सांगून अर्ज मंजूर करुन देण्यासाठी स्वत:करीता व वरिष्ठांकरीता अनंता भानुसे यांनी दोन लाखाची लाच  मागितली. तडजोडी अंती दीड लाख रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी सांगली एसीबीकडे तक्रार केली.

सांगली एसीबीच्या युनिटने 19, 20, 25 आणि 30 जानेवारी रोजी पडताळणी केली असता अनंता भानुसे यांनी महारवतनाची जमिन विक्री करण्याची परवानगी मिळणेबाबतचा अर्ज वरीष्ठांना सांगुन मंजुर करुन देण्यासाठी स्वतःकरीता व वरिष्ठांकरीता दोन लाख रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती दीड लाख रुपये मागणी करुन स्वीकारण्याचे मान्य केले. पथकाने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पोपहार गृहाच्या आवारात सापळा रचला. तक्ररादार यांच्याकडून दीड लाख रुपये लाचेची रक्कम घेताना भानुसे यांना रंगेहात पकडले. तर दिलीप देसाई यांनी भानुसे यांना लाच घेण्यास प्रोत्साहन दिल्याने ताब्यात घेण्यात आले. दोघांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.

सदरची  कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे , अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली एसीबी पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी ,पोलीस निरीक्षक विनायक भिलारे, पोलीस अंमलदार धनंजय खाडे, प्रितम चौगुले, अजित पाटील, सीमा माने, चालक अनिस वंटमुरे यांच्या पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post