भारतकेसरी सिकंदर शेखने पंजाबचा हिंदकेसरी गौरव मच्छीवाला याचा पोकळ घिस्सा डावावर चितपट केले.

कुस्ती शौकिनानी मोठी गर्दी केल्याने शाहू खासबाग मैदान खचाखच भरले होते.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर :  अवघ्या अडीच मिनिटात शाहू विजयी गंगावेस तालमीचा पैलवान महान भारतकेसरी सिकंदर शेखने पंजाबचा हिंदकेसरी गौरव मच्छीवाला याचा पोकळ घिस्सा डावावर चटकदार कुस्ती जिंकून श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात घसघशीत अडीच लाख रुपयांचे बक्षीस आणि चांदीची गदा पटकावली. उपविजेत्या गौरव मच्छीवाला याला दोन लाख रुपये बक्षीस देण्यात आले. तब्बल दोन वर्षांनी कोरोनामुळे कुस्ती मैदान न झाल्याने आज कुस्ती शौकिनानी मोठी गर्दी केल्याने शाहू खासबाग मैदान खचाखच भरले होते.

श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या अमृत महोत्सव वाढदिवसानिमित्त कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाने बेमुदत कुस्ती मैदानाचे आयोजन केले होते. यावेळी खासदार शरद पवार, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह खासदार, आमदार उपस्थित होते.

प्रथम क्रमांकाची कुस्ती सिकंदर शेख आणि गौरव मच्छीवाला यांच्यात झाली. सिकंदर शेखने लाल रंगाची तर गौरव मच्छी वालाने मरून कलरची लांग परिधान केली होती. सव्वाशे किलोचा गौरव हा सिकंदर पेक्षा तगडा दिसत होता. मुख्य पंच संभाजी वरुटे यांनी सूचना दिल्यानंतर कुस्ती सुरु झाली. दोन्ही मल्ल डोके टेकवून आणि एकमेकाची हाताची बोटे गुंतवून एकमेकांचा अंदाज घेत होते. सिकंदर शेख पटात घुसण्याचा प्रयत्न करत होता. दुसऱ्याच मिनिटाला अंदाज घेत असलेला सिकंदर आक्रमक झाला. सिकंदर गौरव मच्छीवाल्याच्या पटात शिरला आणि एकचाकी डाव टाकून त्याने गौरवला खाली खेचले. आणि क्षणार्धात पोकळ घिस्सा डावावर कुस्ती जिंकली. या चटकदार कुस्तीवर उपस्थित कुस्तीशौकीन जाम खुश झाले. मैदानावर एकच टाळी कडाडली.

पंजाबचा सतनाम सिंग आणि गंगावेस तालमीचा उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर यांच्या दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती झाली. गोरापान सतनाम सिंग आणि सहा फूट उंचीचा शंभर किलो वजनाचा प्रकाश बनकर यांच्यातील कुस्ती बराच वेळ रंगली. प्रकाश बनकरने सतनाम सिंग च्या पटात घुसून त्याचा कब्जा घेतला. त्याच्या मानेचा कस गुडघ्याने काढण्याचा प्रयत्न केला.स्वारी भरून त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न केला पण 110 किलो वजनाचा सतनाम खालून सटकला. परत दोघांची खडाखडी सुरू झाली. यावेळी प्रकाश बनकरने त्यांच्यावर ताबा मिळवत घिस्सा डावावर त्याला आसमान दाखवले.
 
तिसऱ्या क्रमांकाची मोतीबाग तालमीचा अरुण बोंगाडे आणि सांगलीच्या सिद्धनाथ ओमनी यांच्यातील कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली. इचलकरंजीच्या प्रशांत जगतापने मोतीबागच्या कुमार पाटील याला दुहेरी पटावर चित्रपट केले. पाचव्या क्रमांकाची कुस्ती चटकदार झाली. मोतीबाग तालमीच्या आणि वाकरे गावच्या यश माने यांनी सांगलीच्या प्रताप ठाकूर हांडे पाटील याला एक चाक डावावर पराभूत केले.

Post a Comment

Previous Post Next Post