स्पर्श” कुष्ठरोग जनजागृती अभियानाचे ३० जानेवारी पासून जिल्ह्यात आयोजन - डॉ. उषा कुंभार

                                  


प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर, दि. 23 (जिमाका): कुष्ठरोगाचे लवकर निदान झाल्यामुळे पुढील होणारी विकृती टाळता येईल व त्वरित उपचार घेतल्यामुळे व औषधोपचार पूर्ण केल्यानंतर कुष्ठरोग पुर्णपणे बरा होतो. म्हणून कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यास ती लपविण्यापेक्षा नजिकच्या शासकीय, निमशासकीय, महानगरपालिका, नगरपालिका दवाखान्यात जावून तपासून घ्यावी, असे आवाहन आरोग्य सेवा (कुष्ठरोग) च्या सहाय्यक संचालक, डॉ. उषा  कुंभार यांनी केले आहे.

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत ३० जानेवारी २०२३ रोजी " स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान २०२३" राबविण्यात येणार आहे. यावेळी कुष्ठरोगमुक्त कोल्हापूर करण्यासाठी तसेच कुष्ठरुग्णांशी भेदभाव करणार नाही, अशा आशयाचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आवाहनाचे वाचन करण्यात येणार आहे. या बरोबरच सरपंचांचे भाषण, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कुष्ठरोगमुक्त भारतासाठी प्रयत्न करण्याबाबतची प्रतिज्ञा उपस्थित नागरिकांना देण्यात येणार आहे. "सपना" या कुष्ठरोगाच्या जनजागृतीकरीता तयार केलेल्या आयडॉलने समाजाला द्यावयाच्या संदेशाचे वाचन करण्यात येणार आहे. या वर्षीचे घोषवाक्य -कुष्ठरोगा विरुद्ध लढा देऊन कुष्ठरोगाला  इतिहास जमा करुया (Let's fight leprasy and make leprasy a history )

"स्पर्श" कुष्ठरोग जनजागृती अंतर्गत महात्मा गांधीजी यांच्या पुण्यतिथी निमित्त दि. ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२३ दरम्यान कुष्ठरोग निवारण दिन व पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत कुष्ठरोगाच्या शास्त्रीय माहितीचा समाजामध्ये प्रचार व प्रसार करुन लवकर निदान व लवकर उपचार यांचे महत्व अधोरेखीत करण्यात येणार आहे. कुष्ठरोग हा इतर सर्वसाधारण आजारांसारखाच एक आजार असून तो प्रामुख्याने त्वचा व मज्जेला बाधित करतो. त्वचेवर फिक्कट पांढरा, लालसर, बधीर असलेला चट्टा, ज्यावरील केस गळलेले, घाम येत नसलेला कोरडा असा असतो. तर मज्जा बाधित असल्यास हाता पायांमध्ये सतत मुंग्या येणे, हातापायातील शक्ती कमी होणे, हाताला / पायाला बरी न होणारी जखम असणे इ. कुष्ठरोगाची संशयित लक्षणे आहेत.

या आजाराची, निदानाची सोय सर्व शासकीय / निमशासकीय / मनपा दवाखान्यांमध्ये मोफत केलेली आहे. तसेच निदान, निश्चित झाल्यावर त्यावरील बहुविध औषधोपचार (एम. डी. टी) देखील मोफत उपलब्ध आहेत. कुष्ठरोग हा हमखास बरा होणारा आजार आहे. जिल्ह्यात माहे एप्रिल ते डिसेंबर २०२२ अखेर एकूण १७८ नवीन कुष्ठरुग्णांचे निदान झाले असून त्यांना त्वरीत औषधोपचार देण्यात आला आहे. तसेच नवीन शोधलेल्या सर्व कुष्ठरुग्णांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना कॅप्सुल रिफाम्पीसीनचा केवळ एक डोस देऊन त्यांना देखील कुष्ठरोगाचा संसर्ग होण्यापासून संरक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. कुंभार यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post