कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट आणि हत्या प्रकरणात 10 संशयितांवर आरोप निश्चिती करण्यात आली

दोषनिश्चिती झाल्याने पानसरे हत्या खटल्याच्या सुनावणीला वेग येणार


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर :  कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट आणि हत्या प्रकरणात 10 संशयितांवर आरोप निश्चिती करण्यात आली आहे.कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील खटल्याची कारवाई थांबवू नका असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं कोल्हापूर सत्र न्यायालयाला दिल्यानंतर आजपासून सुनावणीला प्रारंभ झाला. 10 संशयितांमध्ये समीर गायकवाड, वीरेंद्र सिंह तावडेसह अन्य संशयितांचा समावेश आहे. दोषनिश्चिती झाल्याने पानसरे हत्या खटल्याच्या सुनावणीला वेग येणार आहे. पुढील सुनावणी 23 जानेवारीला होईल.

दरम्यान, पानसरे कुटुबीयांनी केलेल्या मागणीनंतर काही महिन्यांपूर्वीच हा तपास एसआयटीकडून (SIT) एटीएसकडे (ATS) देण्यात आला आहे. तेव्हा तातडीनं यामध्ये नवी माहिती समोर येणं कठीण असल्याने एसआयटीनं तयार केलेल्या आरोपपत्राच्या आधारावर उभ्या राहिलेल्या खटल्याची कारवाई सुरू करा, असे निर्देश हायकोर्टानं जारी केले होते.

कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्येनंतर एसआयटीने तपास करून 12 संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. एटीएसकडूनही तपास सुरू आहे. दरम्यान, गुन्ह्यातील 10 संशयितांवर आज कोल्हापूर सत्र न्यायालयात न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्यासमोर दोषनिश्चिती करण्यात आली. सर्व संशयितांनी आरोप नाकबूल केले आहेत. त्यांच्यावर दोषनिश्चिती करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. पुढील सुनाणीमध्ये गुन्ह्यासंबंधी आवश्यक कागदपत्रे, पुरावे आणि साक्षीदारांची यादी सादर केली जाईल, अशी माहिती विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी दिली आहे.

दरम्यान, उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत पुढील 1 फेब्रुवारीच्या सुनावणीत आतापर्यंत झालेल्या तपासाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दहशतवाद विरोधी पथकाला दिले आहेत. या कटात सामील मारेकऱ्यांच्या हिटलिस्टवर काही ज्येष्ठ पत्रकारांसह सुमारे 40 जणांची नावं होती, अशी माहिती पानसरे कुटुबियांचे वकील अॅड. अभय नेवगी यांनी हायकोर्टात दिली होती. त्यामुळे या कटाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी न्यायालयानं हा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

20 फेब्रुवारी 2015 रोजी कम्युनिस्ट पक्षाचे नेते काँम्रेड गोविंद पानसरे यांची कोल्हापुरात हत्या करण्यात आली होती. पानसरे तपासातील एसआयटीच्या धीम्या गतीमुळे हायकोर्टानं कुटुंबियांच्या विनंतीनुसार काही महिन्यांपूर्वी हा तपास एटीएसकडे वर्ग केला गेला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post