सुभाषबाबूंच्या स्वप्नातील स्वतंत्र भारत


प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

(९८ ५०८ ३० २९०)

 सोमवार ता. २३ जानेवारी २०२३ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा १२६ वा जन्मदिन आहे. आज सुभाष बाबूंच्या योगदानाबद्दल, त्यागाबद्दल, शौर्याबद्दल गल्ली ते दिल्ली पर्यंत बरेच काही बोलले जाईल ते निश्चितच महत्वाचे आहे. पण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा केल्यानंतर सुभाषबाबूंच्या स्वप्नातील भारत आपण उभा करू शकलो का ? त्या दृष्टीने आपली काही धोरणात्मक पावले  पडत आहेत का? त्या विचारांशी आपण बांधिलकी जपत आहोत का ? याचा शोध घेण्याची नितांत गरज आहे. याचे कारण देश स्वतंत्र झाल्यानंतर आपण जे संविधान निर्माण केले त्या संविधानातले तत्त्वज्ञान सुभाष बाबू मांडत होते. समाजवादापासून धर्मनिरपेक्षतेपर्यंतच्या तत्त्वांवर आधारित स्वतंत्र भारत त्यांना घडवायचा होता. पण आज आपली त्यापासून फारगत घेत वाटचाल सुरू आहे. विषमता किती भयानक पद्धतीने वाढत आहे हे नुकत्याच जाहीर झालेल्या ऑक्सफॅमच्या अहवालानेही सिद्ध केले आहे. दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीत पहिल्या दिवशी म्हणजे १५ जानेवारी २०२३ रोजी वार्षिक विषमता अहवाल प्रकाशित करण्यात आला.त्यानुसार 'भारतातील एक टक्के लोकांकडे ४० टक्के संपत्ती आहे. तर तळातील अर्ध्या लोकसंख्येकडे केवळ तीन टक्के संपत्ती आहे. एक टक्के लोकांकडे ९९टक्के लोकांच्या दुप्पट संपत्ती आहे.'सुभाष बाबुना असा तीव्र विषमताग्रस्त भारत नको होता.

२३ जानेवारी १८९७ रोजी ओरिसातील कटक येथे जन्मलेले नेताजी सुभाषचंद्र बोस १८ ऑगस्ट १९४५ रोजी विमान अपघातात कालवश झाले.भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात त्यांची कामगिरी मोठी आहे.लोकांना संघटित करून ब्रिटिश साम्राज्यशाहीचा अंत करून शोषण विरहित समाजरचना प्रस्थापित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.आझाद हिंद सेना उभारून इतिहासाचे एक पान त्यांनी लिहिले.कोलकत्यात प्राथमिक ते पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या सुभाषबाबूंनी उच्च शिक्षणासाठी लंडनला प्रयाण केले.केम्ब्रिज विद्यापीठात त्यांनी तत्वज्ञानापासून भूगोलापर्यंत आणि राज्यशास्त्रापासून व्याकरणापर्यंत विविध विषयांचा सखोल अभ्यास केला.१९२० साली ते आयसीएस झाले. तेथून भारतात परतले ते सरकारी नोकरी न करण्याचा आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा संकल्प करूनच.

भारतात आल्यावर त्यांनी १६ जुलै १९२१ रोजी गांधीजींची भेट घेतली. असहकार आंदोलनात सहभाग घेतला. कोलकत्यात देशबंधु चित्तरंजन दास यांच्या मार्गदर्शनाखाली ते कार्यरत झाले. २५ डिसेंम्बर १९२१ रोजी प्रिंस ऑफ वेल्स च्या आगमनावेळी कोलकत्यात हरताळ पाळण्यात आला त्याचे नेतृत्व सुभाषबाबूनी केले होते.१९२३ साली ते स्वराज पक्षाच्या ‘फॉरवर्ड ‘दैनिकाचे संपादक झाले.२३ मार्च १९३१ रोजी ब्रिटिशांनी भगतसिंग,सुखदेव व राजगुरू याना फाशी दिलीे होती.त्यामुळे देशभर असंतोष पेटला.त्यानंतर चार दिवसात कराची येथे भगतसिंग यांनी नेतृत्व केलेल्या ‘ऑल इंडीया नौजवान भारत सभा ‘या संघटनेचे अधिवेशन झाले.सुभाषबाबू त्याचे अध्यक्ष होते. त्या भाषणात त्यांनी नवा भारत घडविण्यासाठी नवा कार्यक्रम असावा ही भूमिका मांडली.तो कार्यक्रम असा होता.

१) समाजवादावर आधारित अशी शेतकरी व कामगार यांची संघटना बांधणे

२) कडक शिस्तीखाली सेवाभावी तरुणांच्या संघटना बांधणे

३) जातीसंस्थेचे निर्मूलन व सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा आणि धर्माच्या नावाखाली केला जाणारा वेडाचार नष्ट करणे

४) स्त्री उन्नतीसाठी नवे ध्येय आखून स्त्री संघटनांचे जाळे तयार करणे

५) ब्रिटिश मालावर बहिष्कार घालण्यासाठी योजनाबद्ध कार्यक्रम आखणे

६) नवा कार्यक्रम आणि नवरचनेच्या प्रचारासाठी नवसाहित्याची निर्मिती करणे.

याच भाषणात सुभाषबाबू म्हणतात , 'आम्हाला याठिकाणी अशा सामाजिक व आर्थिक रचनेचा आणि पक्षीय राजकारणाचा विचार करायचा आहे की जो विचार मानवतेचा पुरस्कार करेल. आणि चारित्र्याचा विकास साधेल. तोच विचार मानवतेचे उंच आदर्श सत्यात साकारेल.ही ध्येये गाठण्यासाठी याआधी केलेला प्रयत्न, त्यासाठी हाताळलेल्या विविध पद्धती ,या गोष्टींचा इथे शोध घ्यायचा आहे. आमच्या सार्वत्रिक जीवनाचा आदर्शभूत पाया न्याय ,समता, स्वातंत्र्य, शिस्त आणि प्रेम हा असावा या निर्णयापर्यंत येऊन पोहोचलो आहे.म्हणून समतेची खात्री देण्यासाठी आपण सर्व प्रकारची बंधने झुगारली पाहिजेत.मग ती सामाजिक असतील, आर्थिक व राजकीय असतील .ती झुगारून आपण पूर्णतः आणि तत्वत: स्वतंत्र झाले पाहिजे.'

तत्पूर्वी १९२७ साली सुभाषबाबू काँग्रेसचे बंगाल प्रांतिक सरचिटणीस झाले. २५ डिसेंबर १९२८ रोजी कलकत्त्यात अखिल भारतीय युवक काँग्रेसचे तिसरे अधिवेशन झाले. या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी मुंबईचे लढाऊ युवक नेते के.एफ. नरिमन होते. यावेळी सुभाष बाबूंचेही अत्यंत महत्त्वपूर्ण भाषण झाले होते. आज सांस्कृतिक राष्ट्रवादाचा बागुलबुवा उभा केला  जातो आहे. सुभाष बाबू या भाषणात म्हणाले होते, ' भारताची सांस्कृतिक परंपरा मला अगदी स्पष्टपणे दिसते. परंतु ही प्राचीन परंपरा भारतातील दारिद्र्य, निरक्षरता, अधोगती यांच्या मुळावर येऊ नये .आपण जोपर्यंत भारतातील अर्थजर्जर, दरिद्री लोकांना नेटके रूप देऊ शकत नाही, तोपर्यंत भारताची धार्मिक परंपरा आणि तत्वज्ञान यांना काही काळ बाजूला ठेवले पाहिजे. आजकालच्या काळात धर्म आणि तत्वज्ञान हे भुकेल्यांचे अन्न झाले पाहिजे. नागड्यांचे कपडे झाले पाहिजेत. बेघरांचे घर झाले पाहिजे.चांगल्या जीवनमानासाठी चांगल्या तत्वज्ञानाची आवश्यकता असते.'

१९२९ साली पं.जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचे ‘लाहोर ‘अधिवेशन झाले.हे अधिवेधन भारताच्या इतिहासात अनेक अर्थानी संस्मरणीय आहे.कारण याच अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करणारा ठराव मंजूर करण्यात आला.कायदेमंडळावर बहिष्कार टाकून असहकाराचा लढा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.तसेच २६ जानेवारी हा दिवस ‘स्वातंत्र्यदिन ‘म्हणून ठरविला गेला.या अधिवेशनात सुभाषबाबूनी संपूर्ण व कडक बहिष्काराची भूमिका मांडली होती.

१९३० साली कोलकत्याचे सुभाषबाबू महापौर बनले.त्यांनी अनेकदा शिक्षाही भोगली.काँग्रेसच्या बांधणीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. १९३६ साली त्यांची जर्मनीचा प्रमुख एडॉल्फ हिटलरशी भेट झाली.१९३७ साली त्यांनी ‘अँन इंडियन पिलग्रीम ‘हे आत्मचरित्र लिहिले. १९ फेब्रुवारी १९३८ रोजी हरीपूरा ( गुजरात )काँग्रेसचे ते अध्यक्ष होते.त्यांचे अध्यक्षीय भाषणही फार गाजले.त्यात त्यांनी शिक्षणापासून दारिद्र्यापर्यंत आणि धर्मांधते पासून शास्त्रीय दृष्टिकोनापर्यंत विविध मुद्यांवर सैद्धांतिक भाष्य केले होते. ते म्हणाले, '.........अल्पसंख्यांकांचे हक्क  अबाधित राखणे आणि त्यांच्या विकासाला पूर्ण वाव देणे आणि राष्ट्राच्या राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक जीवनात त्यांना परिपूर्ण वाव देणे हे काँग्रेसचे कर्तव्य आहे. स्वतंत्र आणि एकसंघ भारतात एखादा गट, वर्ग व बहुसंख्य अगर अल्पसंख्य स्वतःच्या फायद्यासाठी इतरांची छळवणूक करणार नाहीत. असा स्वतंत्र आणि एकसंघ भारत आपल्याला घडवायचा आहे. इथे सर्व प्रकारच्या शक्ती सार्वजनिक सुखासाठी आणि भारतीय लोकांच्या विकासासाठी परस्परांना सहकार्य करतील. सार्वत्रिक स्वातंत्र्यासाठी ऐक्याची आणि परस्परात सहकार्याची कल्पना म्हणजे भारतीय जीवनातील वैभवी विविधता आणि सांस्कृतिक भिन्नता यांची मुस्कटदाबी नव्हे. उलट प्रत्येक व्यक्तीला, गटाला त्याच्या त्याच्या ताकतीप्रमाणे व कलांप्रमाणे विकास करण्याच स्वातंत्र्य आणि संधी देण्यासाठी या विविधतेचे आणि सांस्कृतिक भिन्नतेचे रक्षण केले पाहिजे.'... याच भाषणात पुढे सुभाषबाबू म्हणतात,'... राजकीय स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर देशाला समाजवादाकडे नेण्यासाठी समाजवादी कार्यक्रम बनवणे गरजेचे आहे .राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यावर डावी विचारसरणी याचा अर्थ समाजवाद असेल. आणि समाजवादी पायावर देशाच्या राष्ट्रीय जीवनाची नवी उभारणी करणे हे मुख्य काम असेल . भारतचे व जगाचे पुनरुत्थान समाजवादावर अवलंबून आहे.

याच दरम्यान त्यांचे राष्ट्रसभेतील काही नेत्यांशी वैचारिक मतभेद झाले.गांधीजींची अनेक मते सुभाषबाबू,पं.नेहरू,मानवेंद्रनाथ रॉय आदींना पटत नव्हती. त्यात युरोपात महायुद्ध भडकल्यावर काँग्रेसच्या धोरणांशी विसंवाद निर्माण झाल्याने रॉय व त्यांचे सहकारी बाहेर पडले.सुभाषबाबू यांची भूमिका रॉय यांच्यापेक्षा वेगळी होती.विशिष्ठ मुदतीत ब्रिटिशांनी सत्ता त्याग केला नाही तर प्रत्यक्ष प्रतिकाराच्या मार्गाने भारतीयांनी प्रतिस्पर्धी राज्ययंत्रणा निर्माण करावी अशी सुभाषबाबू यांची भूमिका होती.गांधीजींना अर्थातच तत्कालीन परिस्थितीत ते मान्य झाले नाही.१९३९साली त्रिपुरा येथील अधिवेशनात सुभाषबाबू काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी उभे राहिले.त्यांचे प्रतिस्पर्धी डॉ.पट्टाभिसीतारामय्या यांना महात्मा गांधी यांचा पाठिंबा असूनही सुभाषबाबू निवडून आले.पण कार्यकारिणी बनविण्यात अडचणी येत गेल्याने त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देणे भाग पडले.

सुभाषबाबूंनी ‘फॉरवर्ड ब्लॉक ‘ नावाचा गट स्थापन केला.१९४० जून महिन्यात नागपुरात फॉरवर्ड ब्लॉकची परिषद झाली.जहाल कार्यक्रमातून स्वातंत्र्य आणण्याचे तेथे ठरविण्यात आले.फॉरवर्ड ब्लॉकला प्रतिसाद मिळू लागला.सुभाषबाबूंना अटक व सुटकाही झाली.सुभाषबाबू एका कम्युनिस्ट कार्यकर्त्यांच्या मदतीने १७ जानेवारी १९४१ रोजी पुढील लढ्यासाठी गुप्तपणे देश सोडून गेले. नंतर सर्व वृत्तपत्रात ‘सुभाषबाबू अदृष्य झाले ‘अशी बातमी झळकली.दरम्यान त्यांनी स्वतंत्र भारत संघ स्थापन केला होता.तसेच ‘एमिली शेकेल ‘या जर्मन महिलेशी विवाहही केला होता.तसेच त्यांची कन्या अनिता हिचा जन्म झाला .याच वेळी त्यांनी मुसोलिनीचीही भेट घेतली. मे १९४२ मध्ये बर्लिन रेडिओवरून भाषण करून आपण जर्मनीत आहोत हे त्यांनी जाहीर केले.महायुद्धात जर्मनी हे ब्रिटिशांचे शत्रूराष्ट्र असल्याने सरकारने त्यांना दोषी ठरवले.

८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईत भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात महात्मा गांधींनी ब्रिटिशांना ‘चले जाव ‘चा आदेश दिला आणि भारतीय जनतेला ‘करा अथवा मरा ‘ हा संदेश दिला.३१ ऑगस्ट १९४२ रोजी जर्मनीतून आझाद हिंद रेडिओ वरून सुभाषबाबूनी भाषण करून या चळवळीला पाठिंबा दिला.तसेच एक बारा कलमी कार्यक्रमही सुचविला.१९४२ च्या आंदोलनाचा समग्र आढावा घेतला तर लोकांनी सुभाषबाबूंचा हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात स्वीकारल्याचे दिसून येते.

सुभाषबाबूंनी जर्मनीत राहून लष्करी शिक्षण घेतले.महायुद्धात ब्रिटिशांच्या बाजूने लढणाऱ्या हिंदी सैनिकांनी आपल्याला येऊन मिळावे असे आवाहन त्यांनी केले.अनेक सैनिक मोठ्या धाडसाने त्यांना मिळाले.त्यांनी आझाद हिंद सेना उभारली.दरम्यान जर्मनीची कोंडी झाल्याने सुभाषबाबू तेथून हॉलंडमार्गे जपानला आले.यावेळी नव्वद दिवस त्यांनी पानबुडीतून प्रवास केला.२६ जानेवारी १९४४ रोजी ‘चलो दिल्ली ‘ हा नारा देत आझाद हिंद सेना रणांगणावर उतरली.अंदमान व निकोबार ही बेटे त्यांनी जिंकली.इंफाळपर्यंत वाटचाल केली.पण या दरम्यान महायुद्धाचे रंग पालटू लागले.अमेरिकेने दोस्त राष्ट्रांच्या बाजूने युद्धात प्रवेश केल्यावर इंग्लंडची बाजू भक्कम झाली.जर्मनीला नामोहरम करून दोस्त राष्ट्रांचे सैन्य जपानची कोंडी करण्याचा प्रयत्न करू लागले.एप्रिल१९४५ मध्ये ब्रिटिश सैन्य रंगून पर्यंत आले.सुभाषबाबू तेथे होते,आपण सुरक्षित स्थळी जावे म्हणून ते बँकॉकला गेले.ऑगस्ट १९४५ हा महिना निर्णायक ठरला.जर्मनी शरण गेले होते.जपानही खचत चालले होते.८ व ९ ऑगस्ट रोजी अमेरिकेने हिरोशिमा व नागासाकी शहरांवर अणुबॉम्ब टाकून मोठा संहार केला होता.जपानने शरणागती पत्करल्यावर आझाद हिंद सेनेच्या लढ्याचाही शेवट झाला होता.अशावेळी सुभाषबाबूंनी जपान सोडूनअज्ञातस्थळी जाण्याचे ठरविले.१८ ऑगस्ट १९४५ रोजी होकू येथून विमानाने जात विमानाने उड्डाण करत असताना विमानाने अचानक पेट घेतला आणि त्यात सुभाषबाबू कालवश झाले.

सुभाषबाबू यांच्या निधनाविषयी अनेक गैरसमज पसरले होते. तसेच ते मध्य भारतात ‘गुमनामी बाबा ‘ आणि ‘संत सोमनाथ ‘ नावाने रहात होते,१९८५ मध्ये त्यांचे निधन झाले.अशा अनेक आख्यायिका पसरवल्या गेल्या.अर्थात हे सारे सुभाषबाबू यांच्या व्यक्तिमत्वाशी अजिबात जुळणारे नाही हे स्पष्ट आहे.कारण स्वातंत्र्यानंतर सुभाषबाबू अज्ञातवासात राहत होते असे म्हणणे व मानणे याचा अर्थ आपण त्यांना वैचारिक दृष्टया ओळखूच शकलो नाही असा आहे.तरीही त्यांच्या मृत्यूची चौकशी करणारे तीन आयोग नेमले गेले.भारत सरकारने नेमलेल्या ‘शहानवाझ खान आयोगाने’ सुभाषबाबू यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करून १९५६ साली ‘सुभाषबाबू त्या विमान अपघातात मृत झाले’ असा निष्कर्ष जाहीर केला.पण लोकांमध्ये पुन्हा शंका निर्माण झाल्याने या चौकशीसाठी१९७० साली सरकारने न्या.जी.डी.खोसला आयोग नेमला.त्यानीही १९७४ साली सुभाषबाबू विमान अपघातातच कालवश झाले असा निष्कर्ष दिला.भाजपा आघाडीचे केंद्रात सरकार असतांना याच विषयावर १४ मे १९९९ रोजी न्या.मनोजकुमार मुखर्जी अहवाल नेमण्यात आला.त्यांनीही ८ नोव्हेंबर २००५ रोजी आपला अहवाल सरकारला सादर केला.या अहवालाने ठाम निष्कर्षच काढला नाही. अवघे अठ्ठेचाळीस वर्षाचे आयुष्य मिळूनही फार मोठी कामगिरी करणाऱ्या ,महान क्रांतिकारी व्यक्तित्व असलेल्या नेताजींच्या १२६ व्या जन्मवर्षाच्या निमित्ताने स्मृतीला विनम्र अभिवादन. त्यांना अभिवादन करतांना एका अविस्मरणीय गोष्टीचा अभिमान वाटतो की, सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेत असलेल्या कॅप्टन डॉ.लक्ष्मी सहगल यांच्या हस्ते मी लिहिलेल्या ‘सुभाषबाबू : व्यक्तित्व - विचार-कर्तुत्व ‘ या पुस्तकाचे पंचवीस वर्षांपूर्वी म्हणजे जानेवारी १९९८ मध्ये समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने इचलकरंजीत प्रकाशन झाले होते.


(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे गेले अडतीस वर्षे कार्यकर्ते आहेत. तसेच गेली चौतीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)

Post a Comment

Previous Post Next Post