यंञमाग उद्योगातील दिवाळखोरीची प्रवृत्ती वेळीच रोखण्याची गरजप्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : प्रतिनिधी : 

इचलकरंजी शहरात यंञमाग उद्योगात गेले काही वर्षे दिवाळखोरीच्या प्रथेला आळा बसलेला असताना पुन्हा ही प्रवृत्ती डोके वर काढत आहे. या प्रवृत्तीमुळे इचलकरंजीचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे ही प्रवृत्ती वेळीच रोखण्याची गरज आहे. यासाठी सर्वांनी संघटितपणे एकत्रित यावे तसेच दिवाळखोरीच्या प्रकरणामध्ये कोणी यंत्रमागधारक अडकला असलेस त्यांनी दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनला संपर्क साधावा असे आवाहन इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

शहरातील एका व्यापाऱ्याने मोठ्या प्रमाणात दिवाळीखोरी करून अनेक कारखानदार व व्यापारी यांना अडचणीत आणलेचे वृत्तपत्रांतून बातम्या येऊ लागल्या आहेत.  इचलकरंजी शहरातील यंत्रमाग उद्योग विविध कारणामुळे वेगवेगळ्या अडचणींतून जात आहे. त्यातच कोरोनामुळे वस्त्रोद्योग व्यवसाय प्रचंड अडचणीत आला. यामध्ये व्यवसायाला जबर फटका सहन करावा लागला. तरीसुद्धा येथील उद्योजक या व्यवसायाला गती देण्याचा प्रयत्न करीत आहेत. इचलकरंजी  शहरामध्ये काही यंत्रमागधारकांची सावकारीतून पिळवणूक होत आहे. तर हनीट्रॅप सारखा प्रकार इचलकरंजीमध्ये घडताना दिसत आहे. त्यातच दिवाळखोरीमुळे इचलकरंजी मँचेस्टर शहराचे नांव डागळत चाललेले आहे. दिवाळखोरी हि इचलकरंजीला लागलेली कीड आहे. दिवाळखोरी एक फॅशनच झाली आहे. याच्या विरोधात सर्व व्यापारी, यंत्रमागधारकांनी एकजुटीने विरोध करणे गरजेचे आहे. काही दिवाळखोर शहर सोडून पळून जातात. त्यांचा नंतर काहीच पत्ता लागत नाही. तर काही दिवाळखोर व्यापारी २५% ते ३०% मध्ये सेटलमेंट करून पुन्हा इथेच व्यवसाय सुरु करतात. आणि काही दिवस परत रोखीने कापड खरेदी करून विश्वास संपादन करून पुन्हा दिवाळ काढलेचे अनेक प्रकार यापूर्वी घडलेले आहेत. अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचणे आवश्यक आहे.  या प्रवृत्तीला कायद्याचा धाक राहिलेला नाही. अशा दिवाळखोर व्यापाऱ्याच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केल्यास त्यास ४ ते ८ दिवसांची पोलिस कस्टडी होते व त्यानंतर तो जामीन वर सुटून इचलकरंजी परिसर सोडून पळून जातो व त्यानंतर मिळून येत नाही. अशा प्रकरणामध्ये दिवाणी केस दाखल करूनही दिवाळखोर व्यापारी मिळून न आल्याने कारखानदारांचे पैसे वसूल होत नाहीत. सध्या अस्तित्वात असणारे कायदे फारच तोकडे आहेत. कायद्यातील पळवाटांचा फायदा घेऊन असे व्यापारी कायद्यालाच आपली ढाल करतात. अशा वेळी महाराष्ट्र शासनाने दिवाळखोरांच्या विरूद्ध कठोर कायदे जसे कि महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा ( मोका ) सम कायद्यामध्ये त्यांचा गुन्हा नोंद करून त्यांना लवकर जमीन मिळणार नाही. यासाठी केंद्रीय व राज्य पातळीवर कायद्यांमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. यापूर्वीच दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनने तत्कालीन गृह राज्य मंत्री यांच्याकडे तशी मागणी केलेली आहे. 

कठोर परिश्रम करून पाई-पाई मिळवून काही रक्कम यंत्रमागधारक जमवितो आणि हे दिवाळखोर एका झटक्यात हि सर्व रक्कम दिवाळखोरीने लाटून यंत्रमागधारकांना अडचणीत आणत आहेत. यंत्रमागधारक आपली संपूर्ण प्रॉपर्टी बँकेला लिहून देऊन बँकेतून कर्जे घेतात. व दिवाळखोरीच्या माध्यमातून मोठा फटका बसलेनंतर कारखानदार अडचणीत आलेची अनेक उदाहरणे यापूर्वी इचलकरंजीत घडलेली आहेत. या प्रवृत्तीचा दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन तीव्र निषेध करीत आहे. वृत्तपत्रातून झळकत असलेल्या दिवाळखोरीच्या प्रकरणामध्ये कोणी यंत्रमागधारक अडकला असलेस त्यांनी दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनला संपर्क साधावा असे आवाहन दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post