लोकसत्ताकाची लोकशक्ती आपणच



प्रेस मीडिया लाईव्ह :

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

(९८५०८ ३०२९० )

२६ जानेवारी हा दिवस आपला 'लोकसत्ताक दिन 'आहे.आज भारताचा ७४ वा लोकसत्ताक दिन आहे.लोकसत्ताक दिनाचे ऐतिहासिक महत्त्व मोठे आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, परंतु आपल्याकडे कोणतेही सरकार किंवा राज्यघटना नव्हती. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय राज्यघटना मंजूर झाली आणि २६ जानेवारी १९५० पासून तिची अंमलबजावणी सुरू झाली.हा दिवस एका अर्थाने ब्रिटीश राजवटीचा पूर्णतः अंत आणि लोकसत्ताक राज्य म्हणून भारताचा जन्म झाल्याचे जाहीर करतो.स्वातंत्र्यानंतरच्या जवळपास अडीच वर्षांनी आपण एक सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाही ,लोकसत्ताक देश बनलो. भारताची राज्यघटना ही घटनासमिती भरवून एक कायदा म्हणून संमत झाली आहे.ती जनतेच्या प्रतिनिधींनी बनविलेली घटना आहे.डॉ.राजेंद्र प्रसाद घटनासमितीचे अध्यक्ष होते.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष होते.

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील लोकशाही व उदारमतवादी विचारधारा,महात्मा गांधी यांची विचारधारा ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा समाज सुधारणावाद,पंडित नेहरू यांचा समाजवाद अशा विविध प्रवाहांचा प्रभाव भारतीय राज्यघटनेवर नैसर्गिकपणे पडलेला आहे.भारतीय राज्यघटना ही जगातील महत्वाचा सामाजिक दस्तऐवज मानली जाते.भारताचा इतिहास आणि संस्कृती यांचा विकासक्रम आणि त्यातून आलेले अनुभव यांचा सम्यक विचार करून आपली राज्यघटना या खंडप्राय देशासाठी तयार करण्यात आली.ही राज्यघटना कशासाठी?, तिचे स्वरूप कोणते ?,तिची उद्दिष्टे कोणती ?आणि तिची वाटचाल कोणत्या दिशेने होणार आहे ? याची स्पष्टता राज्यघटनेच्या सरनाम्यातून दिसते. प्रदीर्घ काळच्या स्वातंत्र्य लढ्याने स्वातंत्र्याविषयीच्या दबून राहिलेल्या सर्वसामान्य जनतेच्या इच्छा व आकांक्षांचे प्रतिबिंब आपल्याला या सरनाम्याचा आढळते.

 " आम्ही भारताचे लोक ,भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक ,आर्थिक, राजनैतिक, न्याय- विचार- अभिव्यक्ती - विश्वास - श्रद्धा -उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता ,निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्प पूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत."

असा आपल्या संविधानाचा सरनामा आहे. 'आम्ही भारतीय लोक' अशी सुरुवात करून ही घटना 'आम्हालाच अर्पण करत आहोत' असे म्हणणारा हा सरनामा 'लोक ' हीच भारताची खरी शक्ती आहे हे स्पष्ट करतो. भविष्यकालीन वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरणारी मूलभूत मूल्ये सरनाम्याच्या मध्यभागी आढळतात. संपूर्ण स्वातंत्र्य, लोकांचे सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता, समाजवाद ,लोकशाही आणि संघराज्यीय एकात्मता ही ती मूल्ये आहेत. सरनामा म्हणजेच घटनेची प्रास्ताविका.राज्यघटनेतील तरतुदींकडे जाण्यासाठी दिशा दाखवणारी ही कमान आहे .या कमानीवर अथवा प्रवेश द्वारावर दाखवलेल्या मार्गाने जाणे ही आपली जबाबदारी आहे. मूलभूत कर्तव्य आहे आणि ते आपण स्वतःहून स्वीकारलेले आहे.

आपले स्वातंत्र्य सर्वार्थाने चिरायू रहायचे असेल तर राज्यघटनेतील मूल्ये निर्णयप्रक्रियेत,वर्तन व्यवहारात अग्रस्थानी आणली पाहिजेत.असा लोकाग्रह सतत ठेवला तरच लोकसत्ताक राष्ट्र चिरंतन राहू शकते.आज राज्यघटनेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पदार्पण दिनी आपण सर्वजण राज्यघटनेतील मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी आग्रही राहू. आपणा सर्व भारतीय नागरिकांची अस्सल व अव्वल राष्ट्रनिष्ठा फक्त आणि फक्त संविधानाशीच आहे हे आपल्याला अन्य कोणी सांगायची गरज नाही.कारण आपण आपल्या लोकसत्ताक राष्ट्रातील लोक म्हणून आपली जबाबदारी ओळखतो. आणखी २५ वर्षांनी लोकसत्ताक राष्ट्राची शताब्दी होईल तेंव्हा हा देश आपण सर्वार्थाने अधिक बलशाली करू असा संकल्प करूया....!सर्व भारतीयांना भरभरून शुभेच्छा...!



Post a Comment

Previous Post Next Post