६ डिसेंबर २०२२ रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सहाष्ठावा महापरिनिर्वाणदिन आहे.

आज समाजात जातीअंतापेक्षा जातीचे बळकटीकरण, धर्मनिरपेक्षत्यापेक्षा धर्मांधतेचे प्रकटीकरण आणि परधर्मद्वेष हा स्थायीभाव , लोकशाही पेक्षा ठोकशाहीचे,हुकूमशाहीचे समर्थन,मिश्रअर्थ व्यवस्थेपेक्षा देशविके खाजगीकरण यांचे समर्थन वाढीस लागलेले असताना आंबेडकरांचा जात,धर्म व मानवकेंद्री समता विचार महत्त्वाचा ठरतो.......


डॉ.आंबेडकरांचा जात,धर्म आणि समता विचार

----------------------------------


प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

( ९८ ५०८ ३० २९० )

Prasad.kulkarni65@gmail.com

मंगळवार ता.६ डिसेंबर २०२२ रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सहाष्ठावा महापरिनिर्वाणदिन आहे. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, थोर प्रज्ञावंत, तत्वचिंतक,अर्थतज्ञ, समाजशास्त्रज्ञ, चिकित्सक लेखक,ख्यातनाम संपादक ,बुजुर्ग नेते अशा विविध पैलूंनी युक्त असे ते महामानव होते. कोलंबिया विद्यापीठातून त्यानी अर्थशास्त्र विषयात एम.ए.पीएच.डी. केली होती.गतवर्षी कॅनडा देशातील ब्रिटिश कोलंबिया प्रांताने भारतरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रिल २०२१ हा जन्म दिवस ‘ समानता दिन ‘ म्हणून घोषित केला होता.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना जगातील विविध देशांनी,संस्थांनी,प्रांतांनी विविध प्रकारे सन्मानित करून त्यांच्या विचारांचे सार्वकालिक महत्व अधोरेखित केले आहे.कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया शासनाचा हा निर्णय असाच स्वागतार्ह आहे.

ब्रिटिश कोलंबिया प्रांताच्या वतीने याबाबतचे एक पत्र प्रकाशित केले होते. त्यात म्हंटले आहे,ब्रिटीश कोलंबिया हा सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण प्रांत आहे.ज्यात बरेच लोक आणि समुदाय यांचा समावेश आहे.येथे आदिवासी, कृष्णवर्णीय आणि अन्य मागास समाजातील लोक वर्णद्वेष, अन्याय, भेदभाव यांचा दाह सतत अनुभवत आहेत. ब्रिटीश कोलंबिया सरकार अशा सर्व प्रकारच्या वर्णद्वेषाला घालविण्यासाठी वचनबद्ध आहे. भारतात १४ एप्रिल १८९१ रोजी जन्मलेले डॉ. बी. आर. आंबेडकर हे भारतीय राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ आणि समाजसुधारक होते. “भारतीय राज्यघटनेचे जनक” म्हणून ओळखले जाणारे डॉ.आंबेडकर समाजसुधारक सुधारक होते.त्यांनी दलित समाजांच्या हक्कांसाठी वकिली केली. जातीवर आधारित भेदभावाविरुद्ध चळवळीचे नेतृत्व केले .त्यांच्या जन्मदिनी आपण जाहीर करत असलेला ‘डॉ. बी. आर. आंबेडकर समानता दिवस ‘म्हणजे त्यांचे समानता आणि सामाजिक न्यायाविषयीचे समर्पण लक्षात ठेवण्याची आणि त्याचा सन्मान करण्याचा दिवस आहे. त्यातून ब्रिटिश कोलंबियासह जगभरातील लोकांना प्रेरणा मिळणार आहे.आता आपण या घोषणापत्राद्वारे जाहीर करत आहोत की १४ एप्रिल २०२१ हा दिवस “डॉ. बी. आर. आंबेडकर समानता दिवस ”म्हणून ब्रिटिश कोलंबिया प्रांतात ओळखला जाईल “.

यानिमित्ताने सुदृढ समाजासाठी पुन्हा एकदा डॉ.आंबेडकरांच्या समतावादी विचारांचे महत्व अधोरेखित झाले आहे.तसेच आज जात – धर्म – लिंग – भाषा – प्रांत आदींच्या आधारे विषमता पेरण्याचे प्रयत्न जोरात होत आहेत. सांस्कृतिक राष्ट्रवाद वेगाने फोफावतो आहे. रोजी रोटीच्या ऐवजी आंधळे जातधर्म प्रेम आणि परधर्मद्वेष जागा केला जात आहे. म्हणूनच आपण सर्वानीच डॉ.आंबेडकर यांचें समतावादाचे विचार पुन्हा पुन्हा ध्यानात घेऊन त्याची कृतिशील अंमलबजावणी व्यक्तिगत व सामाजिक जीवनात करण्याची गरजही निर्माण झाली आहे.

‘ समान समाजातच समान संधीचे तत्व उपयोगी पडते. असमानांना समान वागणूक देणे म्हणजे असमानता कायमची टिकवून ठेवणे होय ‘हा समाजशास्त्रीय सिद्धांत आहे.त्यामुळे ‘ समानतेने वागविणे ‘ हे महत्त्वाचे की ‘ समता प्रस्थापित करणे ‘ हे महत्त्वाचे ?. समता प्रस्थापित करणे हे ध्येय आहे की समान संधी देणे हे ध्येय आहे हे ठरवावे लागेल. ज्या समाजात समानता नाही त्या समाजाला जर सारखी संधी दिली तरी मुळातली असमानता तशीच राहील किंवा कदाचित वाढूही शकेल.त्यामुळे मागासलेल्यांना विशेष संधी देणे हे समाजाचे कर्तव्य व मागासलेल्यांचा हक्कच आहे. हे लक्षात घ्यावे लागेल.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे, ” समतावादाचे ध्येय सर्वांना समान वागविणे नसून समता प्रस्थापित करणे हे आहे. हे ध्येय असताना सर्वांना समतेने वागवून चालणे शक्य नाही.जेथे सर्व व्यक्ती समान आहेत तेथे काही व्यक्तींना असमानतेने वागविल्यास विषमता उत्पन्न होईल.पण जेथे व्यक्ती असमान आहेत तेथे त्यांना सारख्या लेखून चालणे म्हणजे समता प्रस्थापनेच्या ध्येयाला विरोध करणे होय. समानांमध्येच समता नांदू शकते. असमानांना समान मानणे म्हणजे विषमता जोपासणे होय.”

भारतीय घटना समितीच्या सभेत २५ नोव्हेंबर १९४९ रोजी म्हणजे राज्यघटना मंजूर होण्याच्या आदल्या दिवशी डॉ. आंबेडकर म्हणाले होते , ” भारतीय समाजात आज दोन गोष्टींची कमतरता दिसून येते. त्यापैकी एक समता होय. सामाजिक क्षितिजावर आज स्तरात्मक असमानता आहे. त्यात काही वरिष्ठ आणि उरलेले बरेचसे कनिष्ठ पातळीवर आहेत.आर्थिक क्षितिजावर मूठभर लोक गर्भश्रीमंत आहेत तर बहुसंख्य अतिशय दारिद्र्याने पिचलेले आहेत. २६ जानेवारी १९५० रोजी या राज्यघटनेचा अंमल करतानाच आपण एका विरोधाभासाच्या युगात प्रवेश करणार आहोत. राजकीय क्षेत्रात सर्वत्र समता असेल तर सामाजिक व आर्थिक क्षेत्रात असमानता असेल. अशा विरोधात्मक परिस्थितीत आपण किती काळ राहू शकणार आहोत ? किती काळ आपण सामाजिक व आर्थिक समता नाकारू शकणार आहोत ? जर आपण लवकरात लवकर विरोधाभासाचे वातावरण दूर करू शकलो नाही तर घटना समितीने परिश्रमपूर्वक तयार केलेली राजकीय लोकशाहीची इमारत, जे विषमतेचे बळी ठरतील त्यांच्याकडून उखडली गेल्याशिवाय राहणार नाही.” ब्रिटिश कोलंबिया प्रांताला आज समानता दिवस का साजरा करावा वाटला याचे उत्तर बाबासाहेबानी तेंव्हाच दिले होते हे त्यांचे द्रष्टेपण आहे.

१९१६ साली डॉ. आंबेडकरांनी “भारतातील जातीसंस्था,तिची यंत्रणा ,उत्पत्ती आणि विकास ” हा लेख लिहिला होता. त्याद्वारे त्यांनी जातीसंस्थेचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. जातीसंस्था ही मानवनिर्मित असून ती कृत्रिम आहे.जातीबद्ध विवाहसंस्था हा तिचा मुख्य आधार आहे हे त्यांनी स्पष्ट केले. ‘अनुकरणाचा संसर्ग दोष’ हा सिद्धांत डॉ.आंबेडकरांनी मांडला आहे .त्यांच्या मते ,जगातील सर्व समाज हे वर्गीय समाज होते. त्या वर्गाचा आधार आर्थिक ,बौद्धिक किंवा सामाजिक होता. समाजातील व्यक्ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी वर्गाची घटक असते. ही जागतिक वस्तुस्थिती असल्याने हिंदू समाजही त्याला अपवाद नव्हता.भारत सोडून अन्यत्र समाजातील वर्ग मुक्त राहिल्याने ते समाज परिवर्तनीय राहिले. परंतु भारतातील वर्ग बंदिस्त केले गेल्यामुळे भारतात जाती निर्माण झाल्या. जात म्हणजे बंदिस्त वर्ग होय..भारतीय समाजात वर्गाला बंदिस्त करण्याची प्रक्रिया तत्कालीन उच्चवर्णीयांनी सुरू केली.त्याचे अनुकरण इतर खालच्या वर्णानाही केले. डॉ.आंबेडकर म्हणतात ,जातीसंस्था ही मनूने निर्माण केलेली नसून ती त्याच्यापूर्वी फार वर्षे अस्तीत्वात होती. मनू हा केवळ जातिव्यवस्थेला तात्विक रूप देणारा तिचा प्रचारक होता.जातीव्यवस्था ही उपदेशातून निर्माण झालेली नाही. आणि उपदेशातून ती नष्टही होणार नाही. हे स्पष्टपणे सांगून आंबेडकरांनी जातीसंस्थेच्या उत्पत्तीत केंद्रबिंदू असलेल्या व्यवसाय ,वर्गीय संस्था, नव्या श्रद्धा, देशांतर आदी मुद्यांकडेही लक्ष वेधले आहे.

डॉ.आंबेडकरांनी ‘जातीचा उच्छेद ‘ हा लेख लिहून जातीसंस्थेचे आणखी विश्लेषण केले .भारतीय हिंदू समाजातील जाती संस्थेचे परखड विश्लेषण त्यांनी केले. त्यांच्या मते, कोणत्याही सुसंस्कृत समाजात श्रमविभागणी असते हे खरे आहे. परंतु ती श्रमविभागणी श्रमिकांच्या जन्म भेदावर हवाबंद कप्पे तयार करणारी समाज व्यवस्था नसते. जातीसंस्था ही श्रमविभागणी नसून श्रमिकांचीसुद्धा विभागणी असल्याने ती कृत्रिम आहे.त्यामुळे हिंदू जनसमुदाय ‘ समाज ‘ या संस्थेलाच प्राप्त होऊ शकला नाही.हिंदू समाज म्हणजे विविध जातींचा एक पुंजका होय.हिंदू समाजाचे हे स्वरूप व्यक्ती विकासाला आणि उत्पादन पद्धतीला मारक आहे. डॉ. आंबेडकरांचे हे विश्लेषण ध्यानात घेतले की,आज विविध मार्गानी होणारी जातीय संमेलने व जातजाणिवा बळकट करण्याचे उपक्रम सामाजिक ऐक्याला तडा देणारे आहेत हे स्पष्ट होते.


जातीसंस्थेने बद्ध झालेल्या हिंदू समाजात एका नव्या प्रबोधन चळवळीची त्यांना गरज वाटत होती.या प्रबोधनाची व्याप्ती सखोल असली पाहिजे ही त्यांची धारणा होती. जातिसंस्था नष्ट करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणून आंतरजातीय विवाहाकडे डॉ.आंबेडकर पाहताना दिसतात.जातिसंस्था नष्ट करायची असेल तर प्रथम धर्माचे आणि त्याच्या गुंतागुंतीचे स्वरूप समजून घेणे त्यांना महत्त्वाचे वाटत होते.त्यातूनच त्यांनी धर्माची समीक्षा केलेली दिसते. त्यांनी म्हटले आहे,’ धर्म हा केवळ कायदा किंवा आज्ञा नसाव्यात.ज्या क्षणी धर्माचे रूपांतर तत्वाऐवजी कायद्यात होते, त्याच क्षणाला तो धर्म भ्रष्ट होतो.आणि असा भ्रष्ट खऱ्या धार्मिक संकल्पनेचा आवश्यक गुणच मारून टाकतो.’ यातूनच त्यांना हिन्दू धर्मात मूलभूत सुधारणेची गरज वाटत होती.

१९३५ साली डॉ. आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली. जीवन आणि वास्तव यांच्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनात आणि विचारात बदल करणे म्हणजे धर्मांतर ही त्यांची भूमिका होती. डॉ.आंबेडकर यांनी वर्णव्यवस्थेचीही सखोल समीक्षा ‘ शूद्र

पूर्वी कोण होते ? ‘या ग्रंथात केली आहे. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. आंबेडकरांनी धर्मांतर केले.त्यापूर्वी त्यांनी अनेक धर्मांचा व राजकीय विचारांचा अभ्यास केला होता.साम्यवाद आणि बौद्धधर्म या दोन महत्त्वाच्या तत्त्वप्रणाली आहेत यावर ते ठाम होते. बुद्ध की कार्ल मार्क्स या लेखात आणि बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथात त्यांनी त्याची चर्चाही केलेली आहे.

डॉ.आंबेडकर यांनी धर्म आणि धम्म या दोन संकल्पनांची सखोल चर्चा केली आहे.त्यातील भेद स्पष्ट केला आहे .त्यांच्या मते धर्म हा वैयक्तिक असून धर्म हा मूलतः सामाजिक आहे. धम्म म्हणजे सदाचरण व जीवनातील सर्व क्षेत्रात माणसामाणसातील व्यवहार उचित असणे होय. धर्म या कल्पनेत वस्तूजाताच्या आरंभाच्या साक्षात्काराला महत्त्व दिले जाते.तर धम्माचे प्रयोजन जगाची पुनर्रचना हे आहे .धर्मात देव, आत्मा, प्रार्थना, पूजा, कर्मकांड यांना स्थान असून नितिला स्थान आहे. याउलट नीती हे धम्माचे सार आहे.डॉ. आंबेडकरांनी पारंपारिक बौद्ध धर्माची नव्याने मांडणी केली. अहिंसेबाबत भाष्य करताना डॉ. आंबेडकर म्हणतात,’ बुद्धाने तत्व आणि नियम यात भेद केलेला असल्यामुळे त्याने अहिंसेला नियमाचे रूप दिले नाही.तत्वामध्ये तुम्हाला त्यानुसार वर्णन वर्तन करण्याचे स्वातंत्र्य असते, तसे नियमात नसते. नियम तुम्हाला मोडतो अथवा तुम्ही नियमाला मोडता.’

आज समाजात जातीअंतापेक्षा जातीचे बळकटीकरण, धर्मनिरपेक्षत्यापेक्षा धर्मांधतेचे प्रकटीकरण आणि परधर्मद्वेष हा स्थायीभाव , लोकशाही पेक्षा ठोकशाहीचे,हुकूमशाहीचे समर्थन,मिश्रअर्थ व्यवस्थेपेक्षा देशविके खाजगीकरण यांचे समर्थन वाढीस लागलेले असताना आंबेडकरांचा जात,धर्म व मानवकेंद्री समता विचार महत्त्वाचा ठरतो

डॉ. आंबेडकरांच्या समता विचारात लोकशाही मूल्याचा आग्रह आहे. लोकशाही म्हणजे जनतेच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मूलभूत बदल घडवून आणणारी पद्धती आहे,आणि या बदलांना जनतेने कोणत्याही प्रकारच्या विवादाचा अथवा रक्तपाताचा आसरा न घेता मान्यता द्यावी अशी व्यवस्था असावी त्यांची धारणा होती. ‘ एक माणूस-एक मत ‘ यापेक्षा ‘एक माणूस – एक मूल्य ” हा त्यांच्या लोकशाही विचारांचा गाभा होता. म्हणूनच आंबेडकरांनी राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक दडपशाहीविरुद्धच्या लढ्यासाठी आपले जीवन खर्च केले. त्यांना लोकशाहीतून खरी समता, खरे स्वातंत्र्य ,खरी बंधुता, खरा न्याय यांची प्रस्थापना करायची होती हे स्पष्ट होते. अस्पृश्य समाजाची प्रगती हाच बाबासाहेबांचा श्वास आणि ध्यास बनला होता.त्यांनी करोडो पिचलेल्या मनात स्वाभिमानाची पेरणी केली.अनेक शतके उपेक्षित आणि गावकुसाबाहेर असणाऱ्या समाजात वैचारिक क्रांती घडवून आणली. बाबासाहेबांच्या मते कोणत्याही सुसंस्कृत समाजात श्रमविभागणी असते हे खरे. परंतु ती श्रमविभागणी श्रमिकांच्या जन्मभेदावर हवाबंद कप्पे तयार करणारी समाज व्यवस्था नसते.जातिसंस्था ही श्रमविभागणी नसून ती श्रमिकांचीही विभागणी असल्याने ती कृत्रिम आहे.

समतेचे मूल्य जनमानसात रुजवण्यासाठी बाबासाहेबांनी अहोरात्र परिश्रम केले.प्रचंड लोकसंपर्क, लोकसंग्रह केला. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र ,धर्मशास्त्र यांचा सखोल अभ्यास केला. त्यांनी समता – समानता ही मूल्ये बुद्धविचाराशी जोडली.ते म्हणतात, समता प्रस्थापित करताना समाजाला सहभाव किंवा स्वातंत्र्याचा बळी देता येणार नाही. सहभाव वा स्वातंत्र्य याशिवाय समतेला कसलाही अर्थ नाही. ही बुद्धाचा मार्ग अनुसरला तरच या तीन गोष्टी एकत्र राहू शकतील. डॉ. आंबेडकरांचे आयुष्य एक गतिमान संघर्ष होता.अस्पृश्यतेचा दाह आजही भोगावा लागणे म्हणजे समते पासून आपण काही योजने दूर आहोत हे स्पष्ट आहे .म्हणूनच सर्वांगीण समता -समानता नांदायची असेल तर बाबासाहेबांचा विचार महत्वाचा ठरतो.(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासून कार्यकर्ते आहेत.तसेच गेली तेहतीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)

Post a Comment

Previous Post Next Post