राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या पुणे महसुली विभाग नवीन कार्यालयाचे ११ ऑक्टोबरला उद्घाटन


 प्रेस मीडिया लाईव्ह :

अन्वरअली शेख : 

पुणे, दि.१०: राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या पुणे महसुली विभाग नवीन कार्यालयाचे ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.

पुणे महानगरपालिकेच्या शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रिय कार्यालय येथे आयोजित या कार्यक्रमास विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार गिरीष बापट, वंदना चव्हाण, आमदार अनिल भोसले, उमा खापरे, सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग माजी मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय आदी उपस्थित राहणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग मुख्य आयुक्त दिलीप शिंदे यांनी दिली आहे.

पुणे विभागाची कामगिरी

पुणे विभागात‘आपले सरकार’पोर्टलवर ३७ विभागांच्या ३९२ सेवांबाबत ऑक्टोबर २०१५ पासून सप्टेंबर २०२२ पर्यंत प्राप्त २ कोटी ४३ लाख ९८ हजार अर्जापैकी २ कोटी ३१ लाख २ हजार अर्ज (९५ टक्के) निकाली काढण्यात आले आहेत. यापैकी सर्वाधिक ४२ लाख ६९ हजार अर्ज २०१९-२० मध्ये प्राप्त झाले व त्यापैकी ४० लाख ५२ हजार निकाली काढण्यात आले. 

चालू वर्षात सेवा हमी कायद्यांतर्गत आतापर्यंत २५ लाख २४ हजार अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी २३ लाख ३२ हजार अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. यापैकी २३ लाख २२ हजार अर्ज मंजूर करण्यात आले असून २१ लाख ७२ हजार सेवांचे वेळेवर वितरण करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यात ८ लाख ९६ हजारपैकी ८ लाख १८ हजार, सोलापूर ५ लाख ११ हजारपैकी ४ लाख ७० हजार, कोल्हापूर ४ लाख ४२ हजारपैकी ४ लाख ६ हजार, सांगली ३  लाख ९४ हजारपैकी ३ लाख ७० हजार आणि सातारा जिल्ह्यात प्राप्त झालेल्या २ लाख ७९ हजार अर्जापैकी २ लाख ६५ हजार अर्जांचा निपटारा करण्यात आला. विभागात एकूण ९३ टक्के अर्जांसंदर्भातील सेवा वेळेवर देण्यात आल्या आहेत.


   

Post a Comment

Previous Post Next Post