मुख्यमंत्र्यांची “दिवाळी भेट” नागरिकांना पोहचली नाही,प्रेस मीडिया लाईव्ह :

 अन्वरअली शेख  :

निगडी, दि.  महाराष्ट्र राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांना दिवाळी सणानिमित्त दिवाळी भेट (100 रूपयांमध्ये एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो चणा डाळ आणि एक लिटर पाम तेल) देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सुमारे 20 दिवसांपूर्वी केली होती.  त्यांच्या या घोषणेमुळे महाराष्ट्रातील गरीब जनतेला एक दिलासा मिळाला होता आणि आपले दुःख जाणणारा कोणी आपल्याला मिळाला अशी भावना महाराष्ट्रातील जनतेमध्ये निर्माण झाली होती. परंतु आज लक्ष्मी पूजनाचा दिवसही उलटून गेल्यानंतरही जनतेच्या हाती निराशाच लागली आहे. केवळ 10 ते 15 टक्के रेशन दुकानदारांकडे चारही वस्तू आल्या असून त्यांनाही वेळ कमी असल्यामुळे त्याचे पूर्ण वाटप करता आलेले नाही. उरलेल्या 85 टक्के दुकानदारांनी नागरिकांना काय उत्तर द्यावे यामुळे दुकानही बंद करून ठेवले होते. काही दुकानदारांनी आपुलकीची भावना दाखवत जे रवा आणि तेल मिळाले आहे त्याचे वाटप नागरिकांना केले. 

आमचे वृत्त प्रतिनिधी  यांनी विविध परिमंडळ अधिका-यांना फोन करून विचारले असता त्यांनी सांगितले की, पूर्ण पुरवठा दुकानदारांना करण्यात आलेला आहे आणि वेळेत नागरिकांना किटचे वाटप करण्यात येईल. फ विभागचे परिमंडळ अधिकारी श्री. भोसले यांच्याशी दिनांक 23 रोजी संपर्क साधला असता त्यांनीही सांगितले की, 23 च्या सायंकाळपर्यंत सर्व दुकानदारांना 100 टक्के किटचा पुरवठा करण्यात येईल आणि उद्या दिनांक 25 म्हणजेच लक्ष्मीपुजनाच्या दिवशी सर्व नागरिकांना किटचे वाटप करण्याचे आदेश सर्व दुकानदारांना दिलेले असून जास्त माणसे नेमून बायोमेट्रिक न करता आॅफलाईन पद्धतीने नागरिकांना किटचे वाटप करण्यात येईल. 

हाच विश्वास घेवून आमचे प्रतिनिधी यांनी दिनांक 24 रोजी सकाळी 8:45 वाजता जेव्हा दुकानांची पहाणी केली तर त्यांचा भ्रमनिरास झाला. परिमंडळ अधिकारी यांचे म्हणणे आणि वस्तूस्थिती यामध्ये जमीन अस्मानाचा फरक होता. सेक्टर नंबर 22,  रूपीनगर, आकुर्डी, थरमॅक्स चैक, निगडी येथील दुकानांपैकी अर्धी दुकाने बंद होती आणि तळमळीने ज्या दुकानदारांनी दुकाने उघडली त्यांच्याकडे केवळ रवा आणि तेल यांचा अर्धवट पुरवठा करण्यात आला होता. तरीही त्यांनी लोकांचे हाल पाहता त्या 2 वस्तूंचे वाटप करणे योग्य समजले. त्या दोन वस्तूंसाठी नागरिक सकाळची पूजा सोडून रेशनिंग दुकानासमोर सकाळी 7 वाजलेपासून रांगेत उभे होते. 

पुरवठा करण्यातही विषमता

माननीय मुख्यमंत्री यांनी खासकरून गरीब जनतेसाठी या किटचे आयोजन केले होते. परंतु त्यांच्या या नियोजनासही तडा जात जे सधन असे भाग होते त्या भागातील दुकानदारांना चारही वस्तूंचा पुरवठा करण्यात आला आणि जे झोपडपट्टी आणि अंध, बहीरे, गरीब या भागातील दुकाने होती त्या दुकानदारांना केवळ दोनच वस्तू (रवा आणि तेलचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे ज्यांना खरंच गरज होती अशा अंध,  गरीब, अपंग लोकांना याचा लाभच मिळालेला नाही. त्यामुळे या लोकांच्या पदरी पुन्हा निराशाच आली. 

या “कीट”मुळे कित्येक लोकांच्या पीठाचा डबा रिकामाच राहीला

एका दुकानदाराने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, या कीटच्या बोजामुळे बायोमेट्रिक मशिनवर अतिरिक्त ताण पडून ते मशिन निकामी झाले. परिमंडळ अधिकारी यांच्या ते निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी केवळ दिवाळी कीटचे वाटप आॅफलाईन पद्धतीने करण्याचे आदेश दिले. परंतु जे दर महिन्याचे अन्नधान्य आहे ते बायोमेट्रिकनेच करण्यास सांगितले. त्यामुळे कित्येक नागरिकांना ते दर महिन्याचे गहू मिळाले नाही आणि त्यांना भाकरी करण्यासाठीही पीठ मिळाले नाही. जर दिवाळी किट साठी आॅफलाईन पद्धती स्विकारली तर इतर अन्नधान्यासाठी का नाही, अशी विचारणा करीत नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. अनेक ठिकाणी नागरिकांकडून शिवीगाळ करण्याचेही व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचे आश्वासन

या सर्व प्रकारानंतर कोणाकडूनही काही समाधानकारक कृत्य होत नसल्याने अखेरीस आमचे प्रतिनिधी यांनी माननीय जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याशी संपर्क साधून झाल्या प्रकाराची त्यांना कल्पना दिली असता मा. जिल्हाधिकारी यांनी लवकरात लवकर याविषयी कृतीशिल पावले उचलण्याचे आदेश संबंधितांना देण्याचे आश्वासन दिले. 

या संपूर्ण प्रकारातून आज अन्न पुरवठा विभागाची निष्क्रियता आणि गरीबांसाठीची त्यांची संपलेली आत्मियता हीच जबाबदार असल्याची भावना नागरिकांमध्ये बोलून दाखविली जात आहे.Post a Comment

Previous Post Next Post