पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा ४० वर्धापन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम व आरोग्य विषयक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.



प्रेस मीडिया लाईव्ह 

 अन्वरअली शेख : 


 पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणामध्ये पिंपरी चिंचवड नगरीचे शिल्पकार दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सह आयुक्त आशादेवी दुरगुडे, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, मुख्य लेखा परिक्षक प्रमोद भोसले, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे, सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, उप आयुक्त मनोज लोणकर, सहायक आयुक्त अण्णा बोदडे, वामन नेमाणे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.  

          सकाळच्या सत्रात महापालिकेच्या प्रांगणामध्ये रक्तदान शिबिर आणि आरोग्य तपासणी शिबिराचे  आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिकेच्या अधिकारी कर्मचा-यांना  विविध आरोग्य विषयक तपासणी करून घेण्याचे आवाहन केले.  माता सुरक्षित तर घर सुरक्षित या उपक्रमाचा महिला अधिकारी, कर्मचा-यांनी लाभ घेऊन आणि आपले आरोग्य सुदृढ ठेवावे, असेही ते म्हणाले.

महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचा-यांसाठी विविध खेळांचे व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुषंगाने सकाळी रस्सी खेच स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत अधिकारी विरुद्ध कर्मचारी असा सामना झाला. या सामन्यात कर्मचारी संघाने अधिकारी संघाला कडवी झुंज दिली. परंतु या सामन्यात अधिकारी संघाने कर्मचारी संघावर मात देत विजय मिळवला. अधिकारी संघाचे कर्णधार म्हणून अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी भूमिका बजावली. तर कार्मचारी संघाचे कर्णधार म्हणून नंदकुमार इंदलकर यांनी धुरा सांभाळली. या सामन्यात आयुक्त शेखर सिंह यांनी पंच म्हणून भूमिका पार पडली. त्यानंतर संगीत खुर्ची स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत  महिला - पुरुष अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.  

दरम्यान, महिलांसाठी खास न्यू होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच पाक कला व फँन्सी ड्रेस, रांगोळी स्पर्धा देखील पार पडल्या. पिंपरी येथील  महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत तळ मजल्यावर उद्यान विभागाच्या वतीने विविध झाडांच्या एकत्रीकरणाने आकर्षक बाग तयार करण्यात आली असून या बागेत आकाशाच्या दिशेने भरारी घेणारे फुलपाखरू दर्शवण्यात आले आहे. हे दृश्य महापालिकेत येणाऱ्या सर्वांचे लक्ष्य वेधून घेत आहे.  महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून त्यामुळे महापालिकेचा परिसर उजाळून निघाला आहे.




Post a Comment

Previous Post Next Post