प्रतिबंधीत संघटनेचा सदस्य नालासोपाऱ्यातून ताब्यात; एटीएसची कारवाई
प्रेस मीडिया लाईव्ह

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

प्रतिबंधीत संघटनेशी संबंधीत असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ४५ वर्षीय व्यक्तीला नालासोपारा येथून ताब्यात घेतले. आरोपी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओ) या केंद्र सरकारने प्रतिबंधीत केलेल्या संघटनेशी संबधीत असून त्याच्यावर ३१ गुन्हे दाखल आहेत.

आरोपीवर १५ लाखांचे बक्षीस जाहिर करण्यात आले होते.

गोपनीय माहितीच्या आधारे एटीएसने रविवारी पहाटे नालासोपारा पूर्व येथील रामनगरातील धानवी येथे छापा मारला. या कारवाईत कारू हुलाश यादव(४५) याला ताब्यात घेण्यात आले. तो मूळचा झारखंड येथील हजारीबागमधील डोडगा येथील रहिवासी आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओ) याचा विभागीय समिती सदस्य आहे. तो २००४ पासून नक्षलवादी कारवायांमध्ये सक्रिय असून त्याच्याविरोधात १५ लाखांचे बक्षीस जाहिर करण्यात आले होते. आरोपी औषधोपचारासाठी नालासोपारा येथे आल्याची माहिती मिळाली आहे. याबाबतची माहिती झारखंड पोलिसांना देण्यात आली असून एटीएस अधिक तपास करत आहे.

आरोपी विरोधात दाखल ३१ गुन्ह्यांपैकी ११ गुन्हे खुनाचे आहेत. इतर गुन्ह्यांमध्ये पोलिसांवर हल्ला, खुनाचे अनेक प्रयत्न, खंडणी व इतर गुन्ह्यांचा समावेश आहे. लवकरच त्याला झारखंड पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.

Post a Comment

Previous Post Next Post