त्यांनी मांडलेले विचार हे आजही अतिशय महत्त्वाचे आहेत ते विचार स्वीकारूनच आपल्याला पुढे जावे लागेल ..ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ.बाबुराव गुरवप्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी ता. १८ क्रांतीअग्रणी डॉ.जी. डी.बापू लाड हे भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील आणि प्रतिसरकारातील एक लढवय्या सेनानी होते.स्वातंत्र्य कशासाठी आणि कुणासाठी मिळवायचे याबाबतच्या त्यांच्या संकल्पना अतिशय स्पष्ट होत्या.त्यामुळे स्वातंत्र्यानंतरही ते शेतकरी व कष्टकऱ्यांचे राज्य आणि समाजातील शेवटच्या माणसाच्या उन्नतीसाठी झटत राहिले. सहकारापासून शिक्षणा पर्यंत आणि शेतीमालाच्या किमान हमीभाव मागणीपासून समाजवादी समाजरचनेच्या प्रस्थापनेपर्यंत त्यांनी मांडलेले विचार हे आजही अतिशय महत्त्वाचे आहेत ते विचार स्वीकारूनच आपल्याला पुढे जावे लागेल असे मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ.बाबुराव गुरव यांनी व्यक्त केले. ते समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने क्रांतीअग्रणी डॉ.जी. डी.बापू लाड यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित व्याख्यानात बोलत होते. "क्रांतीअग्रणी डॉ.जी डी बापूंचे विचार आणि वर्तमान " हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी आमदार अरुणअण्णा लाड होते. प्रारंभी जयकुमार कोले यांनी पाहुण्यांचे ग्रंथ व पुष्प देऊन स्वागत केले.प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले त्यातून क्रांतीअग्रणी डॉ.जी. डी.बापू लाड आणि त्यांच्या घराण्याचे समाजवादी प्रबोधिनीशी असलेले प्रारंभापासूनचे ऋणानुबंध स्पष्ट केले. तसेच जी.डी. बापू लाड जन्मशताब्दी समितीच्या वतीने राबविल्या जात असलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली..

डॉ. बाबुराव गुरव म्हणाले, महात्मा गांधी यांच्यापासून नेताजी सुभाषबाबूंपर्यंत आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यापासून कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्यापर्यंत साऱ्यांचा प्रभाव डॉ. जी. डी. बापू यांच्या व्यक्तिमत्त्वावर पडलेला होता.डॉ.जी. डी. बापू ,नागनाथअण्णा नायकवडी, नाथाजी लाड,कॅप्टन रामभाऊ लाड आदी सगळे त्यावेळचे पंचशीतले तरुण स्वातंत्र्याच्या प्रेरणेने भरलेले होते.आणि तीच प्रेरणा उराशी बाळगत स्वातंत्र्यानंतरही सहा - साडेसहा दशके कार्यरत राहिले .बापूंची स्पष्ट वैचारिक भूमिका आज आपण अंगीकारण्याची गरज आहे. तीच त्यांना खरी जन्मशताब्दीची आदरांजली ठरणार आहे.डॉ. बाबुराव गुरव यांनी भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचा विशाल पट त्यामधील डॉ.जी. डी. बापूंची भूमिका आदी अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने मांडणी केली.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना आमदार अरुणअण्णा लाड म्हणाले ,आजच्या अस्वस्थ वर्तमानामध्ये क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी .बापूंची वैचारिक भूमिका अतिशय महत्त्वाची आहे .संपूर्ण आयुष्य समाजासाठी वाहिलेल्या जी.डी. बापूंनी दिलेले योगदान हे आपणा सर्वांनाच प्रेरणादायी आहे.आजच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक ,सांस्कृतिक क्षेत्रातील अराजकसदृश्य परिस्थितीत क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी .बापूंचे विचार हे आपल्याला मार्गदर्शक ठरतील.या भूमिकेतूनच  बापूंच्या जन्मशताब्दीकडे आपण पाहत आहोत. या कार्यक्रमास जयकुमार कोले, माजी आमदार राजीव आवळे,ऍड. सतीश चौगुले, अमर खोत,मुलाणी सर ,अजितमामा जाधव, प्रा. अशोक दास, धोंडीबा कुंभार, सदा मलाबादे,बबन बालीघाटे, धनंजय सागावकर,  विश्वास बालीघाटे ,   राजन मुठाणे यांच्यासह इचलकरंजी व परिसरातील कार्यकर्ते व जिज्ञासु नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते.प्रा.रमेश लवटे यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post