पिंपरी : सर्वत्र दिसणारे सीसीटीव्ही काम करत आहेत की केवळ दिखावा..



प्रेस मीडिया लाईव्ह 

पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी:

पिंपरी : सर्वत्र दिसणारे सीसीटीव्ही काम करत आहेत की केवळ दिखावा म्हणून अडकवले आहेत  ?  याची खातरजमा करणे गरजेचे आहे . हे सीसीटीव्ही बंद पडल्यास अनेक गैरप्रकार घडण्याचा धोका आहे . पिंपरी येथील लहान मुलाच्या अपहरण आणि खून प्रकरणातील सोसायटीमध्ये केवळ दोन सीसीटीव्ही कॅमेरे सुरू होते. अन्य कॅमेरे बंद अवस्थेत असल्याने पोलिसांना तपासात अनेक अडथळे आल्याने हा प्रश्‍न चव्हाट्यावर आला आहे.

महापालिका आणि नागरिक सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करतात तरी देखील शहरात रोज वाहन चोरी, चेन स्नॅचिंग, मोबाइल हिसकावणे असे गुन्हे घडतच आहेत. त्याचप्रमाणे अपहरण आणि खून असे गंभीर गुन्हेही होत आहेत. या गुन्ह्यांची उकल करुन आरोपींना गजाआड करण्याचे प्रमाण वाढल्यास गुन्हेगारी कमी होऊ शकते. यासाठी पोलिसांना मदत हवी असते ती सीसीटीव्हीची. परंतु शहरातील अनेक सीसीटीव्ही केवळ दिखाव्यापुरते असल्याचे दिसून येत आहेत.

पिंपरी येथे एका सोसायटीमधून एका सात वर्षीय मुलाचे अपहरण केले. मुलाचा खून करून मृतदेह भोसरी एमआयडीसी मधील एका कंपनीच्या टेरेसवर टाकला. मुलगा बेपत्ता असल्याची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असता एक भयानक सत्य समोर आले. सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारावरील सीसीटीव्ही सुद्धा बंद असल्याचे आढळून आले . भल्या मोठ्या सोसायटी मधील केवळ दोनच सीसीटीव्ही कॅमेरे सुरु होते. त्यामुळे पोलिसांना आरोपींची ओळख पटविणे, त्यांचा माग काढण्यासाठी अनेक अडथळे आले.  या अगोदर याच सोसायटी मध्ये एक आठवडाभरापूर्वी घरफोडी झाली होती. घरफोडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पिंपरी पोलिसांनी सोसायटीला भेट देऊन तिथल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यावेळी संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून घेण्याच्या सूचना पिंपरी पोलिसांनी दिल्या होत्या. मात्र त्यात कोणतीही सुधारणा करण्यात आली नाही.

पिंपरी येथे एका सोसायटीमध्ये घरफोडी झाली होती. तेंव्हा पोलिसांनी सोसायटीमध्ये जाऊन सीसीटीव्ही बसविण्याबाबत सूचना दिल्या होत्या. बसवलेले सीसीटीव्ही सुस्थितीत असल्याची खात्री करण्याबाबत देखील सांगितले होते. मात्र तरीही सोसायटी पदाधिकाऱ्यांनी यावर काम केले नाही. परिणामी लहान मुलाच्या अपहरण आणि खून प्रकरणात तपास करताना पोलिसांना अडचणी आल्या होत्या. सर्व सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या सोसायटींमधील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे चांगल्या स्थितीत असल्याची खात्री करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

– शंकर आवताडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पिंपरी पोलीस ठाणे..

Post a Comment

Previous Post Next Post