कोल्हापूर शहराची हद्दवाढ आवश्यक असल्याने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांची लवकरच संयुक्त बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न करू....आमदार जयश्री जाधव

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला माझा पाठिंबा आहे, हद्दवाढ आवश्यक असल्याने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांची लवकरच संयुक्त बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही आमदार जयश्री जाधव यांनी दिली आहे.कोल्हापूर हद्दवाढ सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने आमदार जाधव यांची भेट घेत त्यांची भूमिका जाणून घेत चर्चा केली. हद्दवाढीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी विशेष बैठक घ्यावी यासाठी प्रयत्न करू, अधिवेशनात याबाबत आवाज उठविणार आहे. हद्दवाढीच्या प्रश्नांसंदर्भात कृती समितीसोबत कायमपणे राहू, अशी ग्वाही आ. जयश्री जाधव यांनी दिली.

यावेळी समितीकडून हद्दवाढीसाठी नगरविकास मंत्रालयाकडे पाठपुरावा, 20 गावांचा प्राधान्याने विकास केला जाईल, अशी ग्वाही देण्याची कृती करावी, हद्दवाढीचा निर्णय होत नाही तोपर्यंत महापालिकेची निवडणूक स्थगित ठेवण्यासाठी पाठपुरावा करावा, मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करावी, अशा मागण्या करण्यात आल्या.

आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हद्दवाढ आहे. स्वर्गीय आमदार चंद्रकांत जाधव यांनीही खूप प्रयत्न केले. मी या लढ्याचे नेतृत्व करण्यास तयार आहे. हद्दवाढीसाठी ग्रामीण जनतेशी समन्वय साधला पाहिजे. लोकप्रतिनिधी ग्रामस्थ आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून सकारात्मक तोडगा काढण्यात येईल.

रोजगार निर्मिती व्हावी, मोठे उद्योग, आयटी कंपन्या याव्यात, यासाठी पायाभूत सुविधा निर्माण हव्यात. त्यामुळे शहर विकासाचे पहिले पाऊल हद्दवाढ आहे. हद्दवाढीत समाविष्ट होणार्‍या गावांना प्रत्येकी 25 कोटी रुपये दिले पाहिजेत. तसेच पायाभूत सुविधांसाठी शहरास 500 कोटींचा विशेष निधी दिला पाहिजे. मुख्यमंत्र्यांना हद्दवाढीसंदर्भात पहिले पत्र पाठविण्यात येईल. यासंदर्भात तांत्रिक समस्या सोडविण्यासाठी तांत्रिक समिती नेमूया, असे सत्यजित जाधव यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post