पुण्यातील सर परशुराम महाविद्यालयाच्या आवारात अंगावर झाड कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली

मालसिंग पवार असं मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे. 


प्रेस मीडिया लाईव्ह :

 पुणे : पुण्यातील सर परशुराम महाविद्यालयाच्या आवारात अंगावर झाड कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मालसिंग पवार असं मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे. झाडं कापायला गेले असता ही दुर्घटना घडली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. स. प. महाविद्यालयाच्या आवारातील मुलांच्या वसतीगृहाच्या परिसरात वाढलेले गवत कापण्यासाठी पवार गेले होते. त्यावेळी अचानक त्यांच्या अंगावर झाड कोसळलं. झाडाच्या काही फांद्या त्यांच्या अंगावर कोसळल्या यात ते जखमी गंभीर झाले. त्यानंतर महाविद्यालयातील काही व्यक्तींनी त्यांना दवाखान्यात दाखल केलं. त्यांच्यावर काही तास उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पवार हे मुळचे सोलापूरचे आहेत. स. प. महाविद्यालयात ते अनेक वर्षांपासून काम करत होते. महाविद्यालयाच्या परिसरात अनेक मोठी झाडे आहेत. त्यांच्याकडे महाविद्यालयातील मुलांच्या वसतीगृहाच्याजवळ असलेलं गवत कापण्याचं काम दिलं होतं. सकाळच्या वेळी त्यांनी रोजच्या सारखी गवत कापायला सुरुवात केली. मात्र अचानक त्यांच्या अंगावर झाड कोसळलं.

सध्या पुणे शहरात झाड पडल्याच्या घटना सातत्याने वाढत आहे. रोज किमान शहरात दोन किंवा तीन झाड पडल्याच्या घटना होतात. यात नागरीकांचं काही प्रमाणात नुकसानदेखील होतं. मागील तीन महिन्यात झाड पडल्याने पुणे शहरात दोन मृत्यू झाले आहेत. त्याच बरोबर मागील तीन महिन्यात वेगवेगळ्या परिसरात झाड पडल्याच्या शंभराहून अधिक घटना समोर आल्या आहे, अशी माहिती अग्निशमनदलाने दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post