शिवसेना खासदार संजय राऊत यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला



प्रेस मीडिया लाईव्ह :

 मुंबई: पत्राचाळ घोटाळा प्रकरणी तुरुंगवासात असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. संजय राऊत यांना आठ दिवसांच्या ईडी कोठडीनंतर दि.२२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. सोमवारी दि. २२ ऑगस्ट रोजी त्यांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्यांना मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीवेळी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएल कोर्टानं संजय राऊत यांना पुन्हा न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. परिणामी, दि. ५ सप्टेंबरपर्यंत त्यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात येणार आहे.

या प्रकरणात खासदार संजय राऊत यांना ३१ जुलै रोजी ईडीनं अटक केली होती. आठ दिवसांच्या ईडी कोठडीनंतर त्यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. ईडी कोठडी संपल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. तिथे ईडीनं त्यांच्या कोठडीची मागणी केली नाही, त्यामुळे त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर संजय राऊतांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली होती. आर्थर रोड कारागृहात संजय राऊत यांना घरचं जेवण आणि औषधं पुरवण्याची मुभा न्यायालयानं दिलं होती. आज पुन्हा त्यांना ५ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही पत्राचाळ आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं समन्स बजावलं होतं. त्यांचीही चौकशी करण्यात आली.

मुंबईतील गोरेगाव परिसरातील पत्रा चाळच्या पुनर्विकासाशी संबंधित १०३४ कोटी रुपयांच्या कथित जमीन घोटाळ्याच्या चौकशीत प्रवीण राऊतला ईडीने अटक केली होती. एप्रिलमध्ये, ईडीने या तपासाचा भाग म्हणून राऊतची पत्नी वर्षा राऊत आणि त्यांच्या दोन साथीदारांची ११.१५ कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली. संलग्न मालमत्ता ही संजय राऊत यांचे सहकारी आणि गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे माजी संचालक प्रवीण एम राऊत यांच्या पालघर, सफाळे (पालघरमधील शहर) आणि पडघा (ठाणे जिल्ह्यातील) येथे असलेल्या जमिनीच्या स्वरूपात आहेत. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये मुंबईच्या उपनगरातील दादर येथील वर्षा राऊत यांच्या मालकीचा फ्लॅट आणि अलिबागमधील किहीम बीचवर वर्षा राऊत आणि सुजित पाटकर यांच्या पत्नी स्वप्ना पाटकर यांच्या संयुक्तपणे आठ भूखंडांचा समावेश आहे, असे ईडीने एका निवेदनात म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post