मोठी बातमी : राज्य उत्पादन शुल्क विभागाने उसाच्या शेतावर छापा टाकून दोन ट्रक गांजा जप्‍त करून गांजाची शेती उद्ध्वस्त केली.

 शिपूर  ता. मिरज येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने उसाच्या शेतावर छापा टाकून दोन ट्रक गांजा जप्‍त करून गांजाची शेती उद्ध्वस्त केली आहे. या मुळे सर्वत्र जोरदार खळबळ उडाली आहे.

सदरची कारवाई शुक्रवारी सकाळी सहा वाजता  करण्यात आली असून  गांजाची  झाडे उपटून काढून ती जप्‍त करण्यात आली आहेत. त्याची किंमत सव्वा कोटी रुपये इतकी आहे. 


या प्रकरणी शेतकर्‍यास ताब्यात घेण्यात आले असून नंदकुमार दिनकर बाबर (वय 40, रा. शिपूर) असे अटक केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. त्याने 30 गुंठ्यांमध्ये उसाची लागण केली आहे. यातच त्याने मोठ्या प्रमाणात गांजाची झाडे लावली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या विभागाच्या अधीक्षक संध्याराणी देशमुख यांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी सहा वाजता शेतात छापा टाकून शेतकरी नंदकुमार बाबर याला ताब्यात घेण्यात आले .

बाबरला घेऊनच पथक शेतात गेले. सभोवताली गांजाची झाडे पाहून पथकही चक्रावून गेले. त्यानंतर पथकाने मिरज ग्रामीण पोलिसांना पाचारण केले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने गांजाची झाडे उपटून काढण्यात आली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत या झाडांची मोजदाद सुरू होती. जवळपास चारशे झाडे असल्याचे सांगण्यात आले. सध्याच्या बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत सव्वा कोटीच्या घरात जाते.

एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजाची झाडे सापडल्याचे वृत्त पसरताच ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. पथकाने घटनास्थळीच पंचनामा करून ही झाडे जप्त केली. बाबरला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरूद्ध अंमलीपदार्थ अधिनियम कायद्यांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साधारपणे तीन महिन्यापूर्वी गांजाची लागवड केली असण्याची शक्यता आहे. जप्त करण्यात आलेली झाडे 7 ते 13 फूट उंचीची आहेत.

बाबरकडे कसून चौकशी करण्यात येत आहे. यापूर्वी त्याने गांजाची लागवड केली होती का, गांजाचा तो कुठे पुरवठा करीत होता, याचा उलघडा केला जाईल. सध्या तरी तो पहिल्यांदाच गांजाची झाडांची लागवड केल्याचे सांगत आहे, असे पथकातील अधिकारी अरूण कोळी यांनी सांगितले.

शिपूरमध्ये छापा टाकण्याचे नियोजन गुरुवारी करण्यात आले होते. यासाठी जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी असा 40 जणांचा ताफा मिरजेत पहाटे साडेपाच वाजता बोलावून घेण्यात आला होता. सहा वाजता छापा टाकण्यात आला. तेंव्हापासून सुरू झालेली कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. शेतामध्ये विजेची सोय करून रात्रीपर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू होते.

गांजाच्या झाडांची मोजदाद करण्यासाठी पथकाने शेतातच वजनकाटा आणला होता. वजन करण्यासाठी सहा अधिकारी व बारा कर्मचारी दिवसभर गुंतून पडले होते. सायंकाळी सहा वाजता मोजदाद पूर्ण झाली. त्यावेळी गांजाची 400 झाडे असल्याचे निष्पन्न झाले.

Post a Comment

Previous Post Next Post