मतदार यादीतील नोंदीचे आधार क्रमांकाच्या आधारे प्रमाणीकरण

 मतदारांना आधार क्रमांक सादर करण्यासाठी अर्ज क्र. ६ ब भरण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे  : भारत निवडणुक आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासन, विधी व न्याय मंत्रालय यांचेद्वारा निवडणुक कायदा (सुधारणा) अधिनियम २०२१ अन्वये लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० मध्ये सुधारणा केल्या आहेत. यामधील कलम २३ नुसार मतदार याद्यातील तपशीलाशी जोडण्याकरीता आणि प्रमाणीकरणासाठी मतदारांना ऐच्छिकपणे आधारची माहीती नोंदणी अधिकाऱ्याकडे द्यावी लागणार आहे. मतदारांनी आधार क्रमांक सादर करण्यासाठी अर्ज क्र. ६ ब भरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.

सदर सुधारणांची अंमलबजावणी १ ऑगस्ट २०२२ पासून लागु होणार आहेत. उपरोक्त कायदा आणि नियमांमध्ये केलेल्या सुधारणांनंतर मतदार नोंदणी अधिकारी  हे मतदार यादीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून विहित स्वरूपात आधार क्रमांक मिळविण्यासाठी वैधानिकरित्या प्राधिकृत करण्यात आलेले आहेत.  १ एप्रिल २०२३ पर्यंत किंवा तत्पुर्वी मतदार यादीत असलेली प्रत्येक व्यक्ती याचा आधार क्रमांक उपलब्ध करून देऊ शकतो. त्यासाठी भारत निवडणुक आयोगाद्वारा कालबध्द पध्दतीने मतदारांकडून आधार क्रमांक प्राप्त करून घेण्यासाठीचा कार्यक्रम सुरु करण्याचे निश्चित केले आहे.

 मतदारांकडून आधार संकलनाचा उद्देश मतदारांची ओळख प्रस्थापित करणे आणि मतदार यादीतील नोंदीचे प्रमाणीकरण करणे आणि एकापेक्षा जास्त मतदारसंघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदारसंघात एकाच व्यक्तीच्या नावाची नोंदणी ओळखणे हा आहे. सदर कार्यक्रमाचा उद्देश कायदेशीर तरतुदीस अनुसरून आहे. तथापि, आधार क्रमांक सादर करणे हे मतदारांच्यावतीने ऐच्छिक आहे असेही आयोगाने स्पष्ट केलेले आहे.

 मतदार यादीतील विद्यमान मतदारांना त्यांच्या आधार क्रमांक भरण्यासाठी  अर्ज क्र. ६ब भारत निवडणुक आयोगाच्या  संकेतस्थळावर उपलब्ध असेल. मतदारांना ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्र.६ ब एनव्हीएसपी, व्हीएचए  या माध्यमांवरदेखील उपलब्ध असेल. तसेच या अर्ज नामुन्याच्या छापील प्रतीदेखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 

ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठीचे स्व-प्रमाणीकरण भारत निवडणुक आयोगाने विकसित केलेल्या पोर्टल/ अॅपच्या माध्यमातून  ऑनलाईन पद्धतीने अर्ज क्र. ६ब भरून मतदारास करता येईल. यूआयडीएआयकडे नमुद असलेल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त ओटीपीद्वारे आधारचे प्रमाणीकरण करता येईल. तथापि, तपशिलात फरक असल्यास प्रमाणीकरण अपयशी ठरण्याची शक्यता आहे.

 जर मतदारास स्व-प्रमाणीकरण करावयाचे नसल्यास किंवा वरीलप्रमाणे प्रमाणीकरण अपयशी ठरत असल्यास, मतदार ऑनलाईन पद्धतीने अर्ज क्र. ६ब भरून त्यासोबत योग्य दस्तावेज सदर करू शकतो.

आधार क्रमांक देणे पूर्णपणे ऐच्छिक असून  आधार क्रमांक मिळवण्याचा उद्देश मतदार यादीतील त्याच्या नोंदींचे प्रमाणीकरण करणे आणि भविष्यात त्यांना अधिक चांगली निवडणूक सेवा प्रदा करणे हा आहे. मतदाराकडे आधार क्रमांक नसेल  नमुना अर्ज क्र. ६ब मध्ये नमूद केलेल्या अकरा पर्यायी कागदपत्रांपैकी कोणत्याही एक दस्तावेज सादर करावा 

मतदार यादीतील कोणत्याही विद्यमान मतदाराचा आधार क्रमांक सादर करण्यास/ आधार देण्यास असमर्थतेच्या आधारावर मतदार यादीतील कोणतीही नोंद वगळण्यात येणार नाही. मतदारांनी आधार क्रमांक सादर करण्यासाठी नमुना अर्ज ६ ब भरून सादर करावा असे आवाहन  जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post