हर घर तिरंगा' व 'स्वराज्य महोत्सव' उपक्रम

मोठ्या प्रमाणात यशस्वी होण्यासाठी चोख नियोजन करा

                    -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

प्रेस मीडिया लाईव्ह 

  कोल्हापूर, दि.18 (जिमाका): 'आझादी का अमृत महोत्सव' अंतर्गत 'हर घर तिरंगा' उपक्रम 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तर 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान 'स्वराज्य महोत्सव' राबविण्यात येणार आहे. हे उपक्रम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साजरे होण्यासाठी चोख नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या. 

        आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत 'हर घर तिरंगा' व 'स्वराज्य' व अन्य उपक्रम राबविण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी प्र. निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवीतके, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते

   जिल्हाधिकारी श्री रेखावार म्हणाले, स्वराज्य महोत्सवांतर्गत हुतात्मा स्मारके सुशोभिकरण, स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये विशेष सभा, शालेय स्पर्धा आयोजन, छायाचित्र प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यापीठ स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन, सांस्कृतिक कार्यक्रम, पुरातत्व दृष्ट्या महत्वाच्या स्थळांची स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. तर 'हर घर तिरंगा' उपक्रमांतर्गत नागरिकांनी आपापल्या घरावर स्वयंस्फूर्तीने राष्ट्रध्वज उभारण्यासाठी जनजागृती करा. या उपक्रमात स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस यंत्रणा, शाळा, महाविद्यालये, परिवहन, आरोग्य केंद्रे, स्वस्त धान्य दुकाने, सहकारी संस्था अशा सर्वसामान्य नागरिकांशी निगडीत यंत्रणांचे सहकार्य घ्या.

       भारतीय ध्वजसंहितेचे पालन व्हावे व अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत नागरिकांमध्ये जाणीवजागृती करा.  या उपक्रमाची रुची निर्माण करण्यासाठी विविध माध्यमांचा उपयोग करा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी दिल्या.

      या अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम जागृतीवर भर देण्यात येत असून जिल्ह्यातील शाळकरी मुले, सर्व नागरिक स्वयंसेवी संस्थांसह सर्वांचा सहभाग घेण्यात येणार आहे.  देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या देशभक्तांचे स्मरण होण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबवून तसेच लोकसहभागावर भर देवून हे अभियान यशस्वी करुया, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी केले.

         बैठकीला विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post