( वाचकपत्र ) पॅन हेल्थकेअर,चेतन भगत आणि आपण


'पॅन हेल्थकेअर' या संस्थेने 'दि लिबर्टी इन लाईफ ऑफ ओल्डर पिपल २०२२ ' हे सूत्र घेऊन नुकतेच एक सर्वेक्षण केले. त्यामध्ये दिल्ली, मुंबई ,कोलकत्ता, बेंगलोर ,हैदराबाद, चेन्नई, लखनऊ ,पाटणा, पुणे ,अहमदाबाद अशा काही महानगरातील लोकांशी संवाद साधला. त्यातील ६५ टक्के ज्येष्ठांनी मोबाईल वापराचा अतिरेक आणि इतर तंत्रज्ञान यामुळे तरुण आणि ज्येष्ठांमध्ये  कमालीचा दुरावा  निर्माण झाला असून दोघातील वैयक्तिक संवाद संपत असल्याची कबुली दिली आहे.

हे घरोघरी दिसणारे वास्तव ढासळत चाललेल्या कुटुंब व्यवस्थेला अधिक मारक ठरणार आहे.कारण गेल्या काही वर्षांत बहुतांश कुटुंबातील  सदस्यांचा संवाद कमी होऊन विसंवाद वाढला आहे. समाजाच्या सर्वच स्तरात हे घडत आहे .आर्थिक संपन्नता आणि भावनांची विशण्णता अनेक ठिकाणी एकत्र नांदू लागली आहे. याचा परिणाम माणूस अस्वस्थ होण्यात होतो आहे. निरोगी पणाची जागा रोगटपणा व्यापतो आहे. अर्थात यात आपली आपल्यालाच दुरुस्ती करावी लागेल. त्यासाठी गमावलेल्या 'स्व 'ची ओळख नव्याने करून घ्यावी लागेल.एकांत - आत्ममग्नता - एकाकीपणा यातील फरक वेळीच समजून घ्यावा लागेल.स्वभान असेल तरच कुटूंबाभान,समाजभान येऊ शकेल.

नव्या पिढीचे लेखक चेतन भगत यांनी अलीकडेच एका लेखात आयुष्य पूर्णत:बरबाद करण्याचे पाच सोपे मार्ग सांगितले होते.अर्थात ते उपरोधिक पद्धतीने लिहिले असले तरी चहूदिशांनी दिसणार सत्य आहे.त्यामध्ये जंक फूड आणि नो एक्सरसाइज ( चमचमीत  खाणं आणि व्यायाम न करणं), स्क्रीन एडिक्शन ( सतत मोबाईल,टीव्ही ,कॉम्प्युटरच्या पडदयावर काहीतरी बघत असणं ),यु आर द प्रॉब्लेम ( दुसऱ्याला दोष देणे ),नो गोल्स( आयुष्यात कसलेही ध्येय नसणं), आणि लेझीनस-नो डिसिप्लिन (आळशीपणा आणि बेशिस्तपणा यावर नेमकं भाष्य केलं होतं व लोकांना जागं करण्याचा प्रयत्न केला होता.

एकूण परिस्थितीत माणसांचा कौटुंबिक ,सामाजिक संवादच हरवत चाललेला आहे.पण आत्मसंवादही हरवत चाललेला आहे.हे अतिशय चिंताजनक आहे.बाल, तरुण ,मध्यम व ज्येष्ठ असे साऱ्या वयोगटातील मोठ्या संख्येने या व्यसनाची शिकार झाले आहेत.म्हणूनच या वेळखाऊच नव्हे तर 8आयुष्य खाऊ मोहजालापासून जरा जपून राहिले पाहिजे. निरर्थकता की सार्थकता याचा गंभीरपणे विचार या मोहजालात अडकलेल्या प्रत्येकाने करण्याची गरज आहे.

                           प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

                                   ( ९८ ५०८ ३० २९० )

Post a Comment

Previous Post Next Post