इचलकरंजीत वाढत्या अतिक्रमणावर कारवाईचा हातोडा

 खाद्यपदार्थांचे 11 गाडे जप्त ; कारवाईमुळे शहरवासियांसह वाहनधारकांतून समाधान

प्रेस मीडिया लाईव्ह:

इचलकरंजी येथे प्रलंबित असलेला अतिक्रमणाचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी आज सोमवारपासून महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात झाली. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने शहरातील जुनी नगरपालिका इमारत परिसरापासून ते डीकेएएससी महाविद्यालयापर्यंत रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे हटविले. या कारवाईत बंद अवस्थेत रस्त्याकडेलाच ठेवण्यात आलेले खाद्यपदार्थांचे 11 गाडे जप्त करण्यात आले. आयुक्त देशमुख यांच्या या कारवाईमुळे शहरवासियांसह विशेषत: वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे.

इचलकरंजी शहर आणि अतिक्रमण हे जणू समीकरणच बनले होते. मुख्य रस्त्यापासून पार गल्लीबोळापर्यंत आणि पदपथावरच अनेकांनी व्यवसाय, व्यापार थाटून अतिक्रमण केले होते. शिवाय मुख्य रस्त्यावरच वर्दळीच्या ठिकाणी खाद्यपदार्थ, फळविक्रेत्यांचे हातगाडे हे सातत्याने वाहतूकीला अडथळा ठरत होते. नगरपालिका असताना हे अतिक्रमण हटविण्याचा अनेकवेळा प्रयत्न झाला. परंतु राजकीय हस्तक्षेप आणि लोकप्रतिनिधींची अरेरावी व दबावामुळे त्यात अडथळे यायचे. सकाळी अतिक्रमण हटविले तर दुपारनंतर त्याचठिकाणी पुन्हा ते दिसून यायचे.

सोमवारी सकाळपासूनच आयुक्त देशमुख यांच्या आदेशाने अतिक्रमण निर्मुलन पथकाने अतिक्रमण हटाव मोहिम सुरु केली. जुनी नगरपालिका इमारत परिसरातून अतिक्रमण हटविण्यास प्रारंभ झाला. रस्त्याकडेला वाहतूकीला अडथळा होईल अशा पध्दतीने बसलेल्या हारतुरे, भाजीपाला विक्रेते यांना हटविण्यात आले. त्यानंतर धान्यओळ परिसरात दुकानांना मारलेल्या छपर्‍या काढण्यासह रस्त्यावरच मांडलेली धान्याची पोती मागे घेण्यास भाग पाडले. नेहमीच चर्चेचा आणि वादाचे प्रसंग घडणार्‍या शॉपिंग सेंटर परिसरात फळविक्रेत्यांनी हातगाडे रस्त्यावरच लावून केलेले अतिक्रमण दूर करण्यात आले. त्यामुळे प्रदीर्घकाळानंतर या रस्त्याने मोकळा श्‍वास घेतला. त्यानंतर मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे दूर करण्यासह विठ्ठल रामजी शिंदे शाळा ते डीकेएएससी महाविद्यालय परिसरात बंद अवस्थेत रस्त्याकडेला लावण्यात आलेले चिकन 65 व अन्य खाद्यपदार्थाचे 11 गाडे जप्त करण्यात आले. ही अतिक्रमण मोहिम अशीच सुरु राहणार असून ज्यांनी ज्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यांनी ते स्वत:हून काढून घेऊन कारवाई टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या कारवाईत अतिक्रमण निर्मुलन पथकाचे प्रमुख सुभाष आवळे, मारुती जावळे, विकास लाखे, कैलास आवळे, पिंटू कांबळे, धोंडीराम कांबळे, धोंडीराम जावळे आदींचा समावेश होता.

Post a Comment

Previous Post Next Post