विविध भावभावनांचा आशयपूर्ण अविष्कार - गझलसाद

अर्थपूर्ण आणि आशयपूर्ण गझल सादर करून रसिकांची दाद मिळवली.

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी दि. १ जुलै- येथील महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या गझलसाद या कविसंमेलनात विविध प्रकारच्या तरल भावभावनांचा आविष्कार करणा-या गझल सादर करण्यात आल्या. मराठीमधील सध्याचे प्रसिद्ध गझलकार डॉ. दिलीप कुलकर्णी कुरुंदवाड, श्रीराम पचिंद्रे कोल्हापूर, प्रसाद कुलकर्णी इचलकरंजी आणि डॉ. सुनंदा शेळके जयसिंगपूर यांनी या कार्यक्रमात आपल्या अर्थपूर्ण आणि आशयपूर्ण गझल सादर करून रसिकांची दाद मिळवली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला रोटरी क्लब सेंट्रलचे अध्यक्ष यतीराज भंडारी यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले तर मसाप इचलकरंजी शाखेच्या अध्यक्षा कवयित्री वैशाली नायकवडे यांनी प्रास्ताविक केले. दोघांच्या हस्ते निमंत्रित कवींना पुष्पगुच्छ प्रदान करण्यात आले.

गझलसाद कार्यक्रमात सुरुवातीला डॉ. कुलकर्णी यांनी आपल्या गझल आणि शेर सादर केले. 

"जात राही जी सदा, ती कात आहे. 

जात नाही जी कधी, ती जात आहे" 

अशा सामाजिक आशयाच्या गझलबरोबरच त्यांनी विनोदी शैलीतील हजल सादर केली. त्यानंतर श्रीराम पचिंद्रे यांनी आपले शेर आणि गझल सादर केल्या. 

"वागणे नाही सखे विपरीत माझे, मी तुझ्या ओठात देतो गीत माझे. जोडले नातेच आता वेदनेशी, हुंदके स्वस्तातले नाहीत माझे"

अशा भावस्पर्शी तसेच सामाजिक आशयाच्या गझल त्यांनी सादर केल्या.

त्यानंतर प्रसाद कुलकर्णी यांनी प्रेमभावना व्यक्त करणाऱ्या तसेच सामाजिक आशयाच्या गझल आणि शेर सादर केले.

 "मूल्यांच्या मार्गावर मज, घटनेची सोबत होती. ते धापा टाकत होते, मी मजेत दौडत होतो" 

अशा त्यांच्या अर्थपूर्ण गझलांना रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर डॉ. सुनंदा शेळके यांनी आपल्या तरल भावना व्यक्त करणाऱ्या गझल सादर केल्या. 

"पावसाशी काही मला बोलायचे आहे, 

भिजायच्या आधी मन खोलायचे आहे" 

अशा प्रकारच्या तरल गझलांमधून त्यांनी आपल्या भावना रसिकांपर्यंत पोहोचविल्या. याबरोबरच त्यांनी गझलसाद कार्यक्रमाचे अतिशय सुंदर सूत्रसंचालन केले.

याप्रसंगी प्रसाद कुलकर्णी यांना प्रतिष्ठेचा भाई माधवराव बागल पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि मसापचे माजी अध्यक्ष शाहीर विजय जगताप यांच्या अमृत महोत्सवी वर्षाबद्दल डॉक्टर कुलकर्णी यांच्या हस्ते भेटवस्तू आणि बुके प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रा. अशोक दास यांनी दोन्ही सत्कारमूर्तींच्या बद्दल समयोचित मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर मसाप पुणेचे विभागीय कार्यवाह राजन मुठाणे उपस्थित होते.

 कार्यक्रमाच्या शेवटी ॲड. माधुरी काजवे यांनी आभार व्यक्त केले तर सूत्रसंचालन संतोष आबाळे व संजय होगाडे यांनी केले. येथील रोटरी श्री दगडूलाल मर्दा मानव सेवा केंद्र सभागृहात सदरचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी इचलकरंजी, जयसिंगपूर व कोल्हापूर येथील काव्यरसिक उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post