आपत्ती व्यवस्थापनासाठी समन्वयाने काम करा

  संपर्क , संवाद व समन्वयानेच करता येईल नैसर्गिक आपत्तीचा सामना ----- पालक सचिव आभा शुक्ला.

प्रेस मीडिया लाईव्ह :

भंडारा दि. 8: पावसाळा सुरू झाला असून राज्याच्या काही भागात अतिवृष्टी झाली आहे.भंडारा जिल्हयात प्रभावी आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी परस्परांशी संपर्क,संवाद व समन्वय ठेवण्याचे निर्देश पालक सचिव तथा लेखा व कोषागारे विभागाच्या प्रधान सचिव  आभा शुक्ला यांनी आज दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आपत्ती निवारणा संदर्भातील तयारीचा  आढावा त्यांनी आज घेतला.


या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून,पोलीस अधिक्षक वसंत जाधव,अप्पर जिल्हाधिकारी घनश्याम भुगांवकर,निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील,जिल्हा कृषी अधिक्षक अरूण बलसाने,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिलींद सोमकुंवर,पाटबंधारे विभागाचे अभियंता श्री.गोडे,अधिक्षक अभियंता विदयुत विभाग श्री.नाईक,सहआयुक्त नगर प्रशासन चंदन पाटील यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.

यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांनी सादरीकरण केले. त्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्ट्रीने  आजपर्यत केलेली कार्यवाहीची मांडणी केली.जिल्हयातील 130 पूरप्रवण गावांच्या ठिकाणी 10 मॉक ड्रिलचे आयोजनासह साधनसामुग्रीची उपलब्धता,प्रशिक्षण सत्रे ,विविध विभागांशी केलेल्या बैठकाची माहिती त्यांनी दिली.

जिल्हयात 1 जून ते 6 जुलै या काळात वीज पडण्याच्या दुर्घटनांमध्ये 5 मृत तर 8 जण जख्मी झाले आहेत.वीज पडण्याच्या आधी पूर्वसूचना देणारे दामिनी ॲपच्या वापराबाबत नागरिकांमध्ये जाणिवजागृती करण्यात आली आहे. 1 जून ते 6 जुलै दरम्यानच्या काळात 29 जनावरे पूर तसेच वीज पडण्यामुळे दगावल्याची माहिती श्री.नामदास यांनी दिली.

आपत्तीच्या काळात साथरोग प्रतिबंधक औषधासह ,रूग्णवाहीका व अन्य वैदयकीय मदतीची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी श्री.सोमकुंवर यांनी दिली.पावसाळयातील सर्पदंशाचे प्रमाण पाहता प्राथमिक आरोग्य केंद्रात विषनाशक औषधे उपलब्ध  ठेवावीत अश्याही सूचना श्रीमती शुक्ला यांनी दिल्या.

प्रभावी संपर्कासाठी तेलंगणा,मध्यप्रदेश व गोंदीया जिल्हयातील अधिका-यांशी जलद संपर्कासाठी आपत्ती व्यवस्थापनासाठी व्हॉटसअप ग्रुपव्दारे नियमीत  संदेश देवाण घेवाण सुरू असल्याची  माहिती निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील यांनी दिली.जिल्हयातील कोरोना रूग्णांचा व सोबत लसीकरणाचा आढावा सुध्दा यावेळी घेण्यात आला.

ऑगस्ट 2020च्या महापूराच्या आपत्तीचा अनुभव पाहता भविष्यात सर्व यंत्रणांनी पावसाळयात दक्ष राहून समन्वयाने काम करण्याची सूचना श्रीमती आभा शुक्ला यांनी  केल्या.Post a Comment

Previous Post Next Post