त्यामुळे, गृहखात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई -  एकनाथ शिंदे  यांच्या रणनीतीने पुन्हा एकदा महाराष्ट्रात  खळबळ उडाली असून महाराष्ट्रातील पोलीस विभागाचे इंटेलिजन्स ब्युरो फेल  झाल्याचे वास्तव समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या आंदोलनावेळी देखील अशाच प्रकारचे अपयश समोर आले होते. त्यानंतर आता राज्यात भूकंप घडवणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या बंडाची खबर इंटेलिजन्स ब्युरोला देखील नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे, गृहखात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पोलीस बंदोबस्तात एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदार मुंबई सूरत रस्त्याने गुजरातपर्यंत पोहचले असल्याची माहिती समोर आली आहे. तलासरीपर्यंत महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा एकनाथ शिंदे यांना होती. त्यानंतर गुजरात पोलिसांच्या सुरक्षेत एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार सूरतला रवाला झाले. विशेष म्हणजे, इतकी मोठी घडामोड घडत असताना याची कल्पना गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री कार्यालयाला देण्यात आली नव्हती. त्यामुळे, गृहखात्याच्या कारभारावर आता प्रश्न उपस्थित होत आहे.

राज्यात सरकार अस्थिर करण्यासाठी किंवा सत्ता उलथवण्यासाठी काही प्रयत्न तर सुरू नाहीत ना, यावर गुप्तचर यंत्रणा लक्ष ठेवून असते, अशा काही हालचाली दिसल्यास या यंत्रणेकडून राज्याच्या गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना तशी माहिती दिली जाते. मात्र, जवळपास 20 आमदारांसह शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे हे मुंबई सोडून सुरतला गेले तरी शिवसेना नेतृत्व याबाबत काही तास अनभिज्ञच होते, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे, गुप्तचर यंत्रणेच्या अपयशावर आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.


दरम्यान राजकीय भूकंपाआधी एकनाथ शिंदेंसह नाशिकमधूनच आमदारांचे पलायनाचे नियोजन होते, अशी माहिती समोर आली आहे. एका खासगी उद्योगपतीचे विमान त्यासाठी नाशिकला काही मिनिटांसाठी थांबणार होते. नाशिकच्या विमानतळावर खासगी बिझनेस क्लास विमान येणार होते. मात्र, मध्यरात्री मुंबईतूनच अचानक आमदार थेट गुजरातला रवाना झाले.

शिवसेनेतलं आता पर्यंतच सर्वात मोठं बंड - 

शिवसेनेतील आजवरचे हे सर्वात मोठं बंड असणार आहे. एकाच वेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35 आमदार असल्याची चर्चा आहे. या आमदारांची भूमिकाही आता समोर आली असून त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबरचे सरकार अमान्य असल्याचे कळत आहे. भाजपबरोबर गेल्यास आम्ही अजूनही शिवसेनेसोबत असल्याची भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे.

राज्यातील गृहमंत्रालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची गेल्या अडीच वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे, असेही नाही. काही दिवसांपूर्वीच मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक आंदोलन केले होते. शरद पवार हे राज्याच्या राजकारणातील प्रमुख नेत्यांपैकी एक नेते म्हणून ओळखले जातात. पवार यांच्या राजधानी मुंबईतील निवासस्थानी हल्ला झाल्यानंतर आधी माध्यमांचे कॅमेरे पोहोचले आणि त्यानंतर पोलीस दाखल झाले. तेव्हाही गुप्तचर यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post