अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहाला भीषण आग, सुसज्य नाट्यगृहाचे मोठे नुकसान


प्रेस मीडिया लाईव्ह

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

जवळपास दोन दशकांच्या प्रतिक्षेनंतर अलिबागकरांसाठी सेवेत दाखल झालेले नाट्यगृह बुधवारी संध्याकाळी लागलेल्या आगीत जळून खाक झाले. शासकीय अनुदानातून सहकारी संस्थेने उभारलेले हे राज्यातले पहिले नाट्यगृह होते.

आग लागण्यामागचे मूळ कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही

नाट्यगृहाला सायंकाळी पाचच्या सुमारास भीषण आग लागल्याचे निदर्शनास आले. अलिबाग पोलिसांसह, नगर पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अलिबाग नगरपालिकेच्या अग्नीशामक, आरसीएफ कंपनीच्या अग्नीशामन दलांना तत्काळ पाचारण करण्यात आले. पाच अग्नीशमन दलाच्या बंबाच्या मदतीने आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले. जवळपास एक ते दीड तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात जवानांना यश आले.

मात्र तोपर्यंत नाट्यगृह जळून खाक झाले होते. आगीचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. २०१७ साली या नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली होती. अलिबाग शहरात कला, सांसकृतिक कार्यक्रमासाठी एक हक्काचे व्यासपीठ असावे यासाठी पीएनपी सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळाने पुढाकार घेऊन अलिबागकरांसाठी नाट्यगृहाची उभारणी केली होती.

राज्यसरकारने यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले होते. जवळपास सहा ते सात कोटी रुपये खर्चून सुसज्य वातानुकूलीत ९०० आसन क्षमतेचे नाट्यगृह उभारण्यात आले होते. तेव्हापासून अलिबागमधील सांस्कृतिक आणि नाट्यचळवळीचे केंद्र म्हणून हे नाट्यगृह नावारुपास आले होते. या दुर्घटनेमुळे नाट्य आणि कला क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post