पॉईंट टू बी नोटेड : विद्यापीठ प्रशासनाचे बदलते स्वरूप:

 पॉईंट टू बी नोटेड :  

   फुकटचं घावलं आन बापलेक धावलं....

प्रेस मीडिया लाईव्ह : 

- डॉ. तुषार निकाळजे : 

विद्यापीठाचे प्रमुख सेवानिवृत्त होऊन  महिना उलटला नाही. त्यावेळी विद्यापीठ प्रमुखांनी सेवानिवृत्तीनंतर आपला अनुभव व मनोगत व्यक्त केले. ' विद्यापीठ प्रशासनाने स्वतःचा दृष्टीकोन बदलण्याची सध्या आवश्यकता आहे, त्यामुळे स्वतःकडे असलेल्या गुणवत्तेचा योग्य वापर करून प्रगती होऊ शकेल',असे भाष्य  केले. याचा प्रत्यय नुकताच आला. विद्यापीठात एक समारंभ आयोजित केला होता. विद्यापीठाशी संबंधित असलेल्या एका नागरिकाला ई-मेल द्वारे निमंत्रण आले. हा ई-मेल दोन दिवसात तीन वेळा त्या नागरिकास प्राप्त झाला. या परिस्थितीचा थोडा सखोल अभ्यास केला. यामध्ये  प्रथमता एक बाब निदर्शनास आली, ई-मेल द्वारे संपर्क कोणत्याही व्यक्तीस मोफत असतो. या संस्थेने  कार्यक्रम आयोजित केला असल्याने तेथे किमान २०००  लोक जमा होतील अशी व्यूहरचना केली होती. या २००० संबंधित व्यक्तींना प्रत्यक्षपणे निमंत्रण देता येणे शक्य नसल्याने विद्यापीठाच्या डोकेबाज तज्ञांनी शक्कल लढवली. ई-मेल द्वारे या दोन हजार व्यक्तींना  निमंत्रण द्यावे. ठीक आहे. हे निमंत्रण एकदा पाठविले तर पुरे, परंतु हे निमंत्रण तीन वेळा पाठवण्या मागचा दृष्टिकोन काय? ई-मेल पाठवताना  कोणतेही शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे हा निमंत्रणाचा ई-मेल वारंवार तीन वेळा पाठविला गेला असावा. याला आपल्या ग्रामीण भाषेत असे म्हणतात, ' फुकटचं घावल आणि बाप लेक धावल'.म्हणजे एखादी गोष्ट मोफत मिळाली तर त्याचा आस्वाद किती वेळा किंवा किती जणांनी घ्यायचा? हे ज्याचे त्याने ठरविले पाहिजे. याबाबतीत जर एकदाच ई-मेल पाठवला असता  तर इतर वेळ किंवा मोफत ई-मेलची सुविधा वापरून विद्यापीठाची बरीच कामे करता आली असती. याद्वारे विद्यार्थी व महाविद्यालय यांच्या काही तक्रारींचे निवारण  होऊ शकले असते. परंतु या गोष्टींचे प्रशासनाला काही सोयरसुतक नाही, असे दिसते. या घटनेतील दुसऱ्या बाजूचा विचार केला, यास थोडा राजकारणाचा वास येतो. म्हणजे सध्या  विद्यापीठ कायद्यानुसार कुलगुरूंच्या निवड प्रक्रिया सुरू झाल्या आहेत.

 त्यामुळे जसे निवडणुकीच्या वेळी मतदारांना गोळा करून सभा भरविल्या  जातात, तसाच हा प्रकार असावा. म्हणजे २०००  पाहुण्यांना बोलाविले की प्रत्येक घरातील सरासरी ३ अशी एकूण ६०००  मते सहानुभूती पोटी का होईना नव्याने कुलगुरू पदासाठी अर्ज भरणाऱ्या उमेदवारास मिळू शकतील.तसेच हा शो कशासाठी तर विद्यापीठाच्या मानांकनाची  झालेली घसरण जनतेने विसरून जावी यासाठी. एखाद्या  विद्यापीठाची गेल्या पंधरा दिवसांपूर्वीची घटना यापेक्षा वेगळी, एका शिक्षण तज्ञाचा सत्कार पर जिल्ह्यामध्ये आयोजित केला होता. परजिल्ह्यात म्हणजे जवळपास २५०  ते २७० किलोमीटर अंतरावर हा समारंभ दुपारी ४ वाजता आयोजित केला होता. परंतु विद्यापीठाच्या संबंधित असलेल्या एका व्यक्तीस व पाहुण्यास या सत्कार समारंभास उपस्थित राहण्याबाबत त्याच दिवशी दुपारी ४  वाजून ५ मिनिटांनी निमंत्रण पत्रिका ई-मेल द्वारे पाठविली. आता हा पाहुणा २५०  किलोमीटर अंतर कसे कापू शकेल? समारंभ ४  वाजता सुरू होणार होता आणि २५०  किलोमीटर अंतरावरील या पाहुण्यास ४ वाजून ५ मिनिटांनी ई-मेल द्वारे निमंत्रण देणे यास काय म्हणावे? कदाचित या व्यक्तीला मुद्दामून हा ई-मेल उशिरा  पाठविला असल्याचे राजकारण  असू शकते. जर हा व्यक्ती २५०  किलोमीटर अंतर अडीच तासात कापून आला किंवा प्रवास करून आला, तर या संपलेल्या  कार्यक्रमाच्या टेबल खुर्च्या उचलणे, स्वच्छता करणे किंवा उष्टी- खरकटी ताटे उचलणे हेच पदरात पडले असते. आणि याच करिता या राजकारण्यांनी उशिरा ईमेल केला असावा. या सर्व कृतीबद्दल प्रशासनाचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर योग्य प्रकारे झाल्यास निश्चितपणे प्रगती होऊ शकते. एक महिन्यापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कुलगुरूंनी जे मनोगत व्यक्त केले होते, त्यांची ही भविष्यवाणी असावी.  पण हे काहीही असले तरी विद्यापीठातले ईव्हंट मॅनेजमेंट गुरु, तज्ञ, बौद्धिक संपदा हक्क प्राप्त केलेले किंवा करून घेतलेले डोकेबाज यांचं हे  पितळ उघडे पडले, तरी यापुढे देखील ये रे माझ्या मागल्या असे वागू नये, अशी सद्बुध्दी  प्राप्त होवो.

Post a Comment

Previous Post Next Post