अन्न व औषध प्रशासनातर्फे मुदतबाह्य चॉकलेट वापरणाऱ्या गुऱ्हाळ चालकावर कारवाई



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे दि.११- अन्न व औषध प्रशासनातर्फे मुदतबाह्य चॉकलेट वापरणाऱ्या दौंड तालुक्यातील गुऱ्हाळ चालक उस्मान मयूर यांच्यावर नमुने घेणे आणि जप्तीची कारवाई केली.

  अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ हा महाराष्ट्रासह संपूर्ण देशात २०११ पासून लागू झालेला असून सदर कायद्याचा उद्देश जनतेस सुरक्षीत, सकस व निर्मळ अन्न पदार्थ उपलब्ध करून देणे हा आहे. प्रशासनाने मागील काही कालावधीत केलेल्या कारवाई मध्ये काही गुळ उत्पादक चुकीच्या मार्गाने गुळ उत्पादन करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबतीत कार्यशाळा घेवून मार्गदर्शन केल्यानंतरही चुकीचे प्रकार होत असल्याची माहिती मिळाल्यावरून मु.पो. राहु येथे ही कारवाई करण्यात आली.

 गुऱ्हाळवर अचानक धाड टाकली असता ते मुदतबाह्य व खाण्यास अयोग्य चॉकलेट वापरून विनापरवाना गुळ उत्पादन करीत असल्याचे आढळुन आले. त्यामुळे त्यांच्याकडून गुळ व मुदतबाह्य चॉकलेट या पदार्थाचे दोन नमुने घेउन ८९८ किलो २८ हजार ७३६ रुपये किंमतीचा व  ९९८ किलो मुदतबाह्य चॉकलेट असा एकूण रु.५२ हजार ६८८ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला.

सदर कार्यवाही सहायक आयुक्त (अन्न) संजय नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सदर प्रकरणी तपासणी मध्ये आढळून आलेल्या त्रुटी प्रकरणी नियमानुसार कारवाई घेण्यात येत असून  विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर कायद्याअंतर्गत तरतुदीनुसार पुढील कारवाई करण्यात येईल. सर्व गुऱ्हाळ चालक- मालकांना परवाना घेवूनच कायद्याअंतर्गत सर्व तरतुदींचे पालन करुनच गुळ उत्पादन करण्याचे आवाहन सह आयुक्त (अन्न)  शिवाजी देसाई यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post