महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे भाकीत जानेवारीत वर्तवले होते

ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांचा दावा.


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंपाचे, फुटीचे आणि घडामोडींचे भाकीत जानेवारी २०२२ मध्येच वर्तवले होते,असा दावा ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनी आज पुण्यात पत्रकाद्वारे केला आहे. 

ज्योतिष ज्ञान मासिक अंकातील जानेवारी २०२२ ते सप्टेंबर २०२२ या आवृत्तीमध्ये हे भाकीत वर्तवले होते .१४ जून रोजीची पौर्णिमान्त कुंडली व २९ जून रोजीची अमान्त कुंडलीवरून जून २०२२ या महिन्यात महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता दिसत होती.  सत्तांतर होणे, मोठे पक्ष वा आघाडीमध्ये फूट पडणे या विषयीचे भाकित मी केले होते. ते तंतोतंत खरे ठरले आहे. या पूर्वी सुद्धा २०१९ मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असे भाकित विविध दूरचित्रवाहिन्यांवरून केले होते , ते खरे ठरले ',असे ज्योतिष ज्ञान मासिकाचे संपादक व राजकीय ज्योतिषाचे  अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनी  या पत्रकात म्हटले आहे. 

जानेवारी २०२२ मध्ये वर्तवलेले भाकीत

चतुर्थातील शनि विरोधी पक्षाचे बळ वाढविणारा असून सत्ताधारी पक्ष अडचणीत येईल. मोठ्या पदावरील व्यक्तिंचा मृत्यु किंवा राजीनामा होईल. काही राज्यात सत्तांतर होण्याची शक्यता असून महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या घडामोडी होतील.

ग्रहस्थितीचा विचार करता मे-जून महिना स्फोटक घटनांचा राहू शकतो. राजकीय क्षेत्रात मोठ्या घडामोडी या महिन्यात होण्याची शक्यता वाटते. एखाद्या मोठ्या राज्यातील सरकार बरखास्त होऊ शकते. केंद्रीय व राज्य मंत्रीमंडळात मोठे फेरबदल होतील. अनपेक्षित बदल राजकीय / सामाजिक क्षेत्रात होण्याची शक्यता असून मोठे पक्ष किंवा आघाडीमध्ये फूट पडेल.

राजकीय भूकंपाला पोषक स्थिती

“सध्याची ग्रहस्थिती महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाला पोषक आहे, असे स्पष्ट करत ज्योतिषविद्या अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेचा विचार करता त्यांचे कन्या लग्न आणि सिंह रास आहे. कन्या लग्नाच्या आठव्या स्थानात मंगळ येतोय. त्याचबरोबर तेथे हर्षल आणि राहूसारखा ग्रह आलेला आहे. जून महिना त्यांच्यासाठी प्रतिकूल आहे.

शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या पत्रिकेच्या अभ्यासावरून असे लक्षात येते, की भाजपच्या मीन राशीत रवी, गुरूची भ्रमणस्थिती या सगळ्या राजकीय परिस्थितीला पोषक असून, पुन्हा सत्तेवर येण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांची धनू रास आणि गुरू सध्या स्वराशीत असल्यामुळे मोठ्या पदाची अपेक्षा दर्शवतो, त्यांना तशी संधीही चालून आली आहे.”


Post a Comment

Previous Post Next Post