महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांची केंद्राच्या ‘कौशल्य विकास आराखडा स्पर्धेत’मोहर

        महाराष्ट्राला सर्वाधिक पुरस्कार प्रदान.

सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ‘उत्कृष्टता पुरस्कार.


प्रेस मीडिया लाईव्ह :

नवी दिल्ली, दि. ९: केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता  मंत्रालयाच्या ‘जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धेत(२०२०-२१)’ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाच जिल्ह्यांनी बाजी मारली. सातारा, सिंधुदुर्ग,ठाणे,वाशिम आणि सोलापूर या विजयी जिल्ह्यांना उल्लेखनीय कार्यासाठी आज येथे गौरविण्यात आले.

 येथील डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरच्या नालंदा सभागृहात केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालयाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात  मंत्रालयाचे सचिव  राजेश अग्रवाल यांच्या हस्ते‘ जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धेचे’(२०२०-२१) पुरस्कार वितरित करण्यात आले. मंत्रालयाच्या सहसचिव अनुराधा वेमुरी आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे मुख्य नियंत्रण अधिकारी वेदमनी तिवारी यावेळी उपस्थित होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या देशभरातील ४६७  जिल्हयांतून  विजयी  ठरलेल्या ३० जिह्यांना एकूण तीन श्रेणींमध्ये या यावेळी गौरविण्यात आले. महाराष्ट्रातील पाच जिल्हयांना तीन श्रेणीत पुरस्कार प्रदान करण्यात आले.

सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ‘उत्कृष्टता पुरस्कार’

   ‘जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धेत’  देशभरातून एकूण ८ जिल्ह्यांना  ‘उत्कृष्टता पुरस्कार’ श्रेणीत गौरविण्यात आले.यात सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. साताऱ्याचे जिल्हाधिकारी  शेखर सिंह  आणि  सिंधुदुर्गच्या  जिल्हाधिकारी  के.मंजूलक्ष्मी  यांनी  हे  पुरस्कार स्वीकारले.

ग्रामीण व कृषी पर्यटन प्रशिक्षण केंद्रांचा विस्तार करण्याचा प्रयत्न- जिल्हाधिकारी शेखर सिंह

    पुरस्कार स्वीकारल्यानंतर  महाराष्ट्र परिचय केंद्राशी बोलताना शेखर सिंह म्हणाले, उत्कृष्टता पुरस्कार श्रेणीत निवड झालेल्या देशातील ८ जिल्हयांमध्ये सातारा पहिल्या तीन जिल्ह्यांमध्ये आहे.पुरस्काराचा मनस्वी आनंद असून जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचा यात मोलाचा वाटा आहे. कोविड महामारीच्या काळात केंद्र आणि राज्यशासनाच्या कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत जवळपास १ हजार कोविड फ्रंटलाईन कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात आले.साहसी खेळ, ग्रामीण व कृषी पर्यटनासाठी  ग्रामीण भागात प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आली. कोविडमुळे विधवाझालेल्या स्त्रिया आणि कातकरी समाजातील लोकांना येत्या काळात कौशल्य प्रशिक्षण देण्याचा तसेच ग्रामीण व कृषी पर्यटन प्रशिक्षण केंद्रांचा विस्तार करण्याचा मनोदयही  त्यांनी व्यक्त  केला.

   श्रीमती मंजूलक्ष्मी म्हणाल्या, राज्य कौशल्य विकास विभाग, जिल्हा कौशल्य विकास केंद्र आणि  जिल्हयातील बचतगटांच्या उत्तम कार्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. पर्यटन जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बचतगटांच्या महिलांना आदरातिथ्यक्षेत्रात प्रशिक्षण देण्यात आले.मालवण आणि वेंगुर्ला भागातील न्याहरी निवासांची गुणवत्ता सुधारण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले. यासोबतच मत्स्यव्यवसाय,आंबा, काजू  आणि बांबुवरील प्रक्रिया उद्योगाबाबत विविध कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबविल्याचे श्रीमती मंजूलक्ष्मी यांनी सांगितले.

ठाणे आणि वाशिम जिल्हयांना उत्कृष्टता प्रमाणपत्र..

  या स्पर्धेंतर्गत देशभरातून एकूण १३ जिल्ह्यांना ‘उत्कृष्टता  प्रमाणपत्र पुरस्कार’ श्रेणीत गौरविण्यात आले. यात ठाणे आणि वाशिम  जिल्ह्यांचा समावेश आहे. ठाणे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त  कविता जावळे आणि वाशिम जिल्ह्याच्या त्यांच्या समकक्ष सुनंदा बजाज यांनी  हा  पुरस्कार  स्वीकारला.

   श्रीमती जावळे म्हणाल्या, ठाणे जिल्हा हा महानगर परिक्षेत्रात येतो व जिल्ह्यातील जवळपास ७० टक्के लोकसंख्या की १५ ते ३० वयोवर्ष गटातील तरुणांची आहे. त्यामुळे तरुणांना केंद्रस्थानी ठेवून विविध कौशल्य कार्यक्रमांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. ठाणे जिल्हयात शहरी, ग्रामीण आणि आदिवासी अशा तिन्ही स्तरातील महिलांचे वास्तव्य आहे अशा महिलांचे स्थलांतर थांबविण्यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण देवून रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. येत्याकाळात जिल्हयातील तृतीयपंथींयासाठी कौशल्य विकासकार्यक्रम राबविण्याची योजना असल्याचेही त्यांनी सांगितले.

     श्रीमती बजाज यांनी सांगितले, वाशिम हा आकांक्षी जिल्हा असल्याने व येथील बहुतांश उद्योग हे शेतीआधारित असल्याने जिल्हा कौशल्य नियोजन आराखडयात यासंबधी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचा अंतर्भाव करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. जिल्ह्यातून ‘हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे  समृध्दी  महामार्ग’ जात असल्याने बांधकाम क्षेत्रात तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. केंद्रशासनाच्या ‘संकल्प’ कार्यक्रमांतर्गत जिल्हयातील महिलांसाठी बेकरी, पाककला आणि शेळीपालन प्रशिक्षण कार्यक्रम राबविल्याचे  श्रीमती  बजाज म्हणाल्या.                               सोलापूर जिल्हयाला प्रशस्तीपत्र

    देशभरातून एकूण ९  जिल्ह्यांना या स्पर्धेंतर्गत ‘प्रशस्तीपत्र पुरस्कार’ श्रेणीत गौरविण्यात आले. या श्रेणीत  सोलापूर जिल्ह्याला सन्मानित करण्यात आले. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 

   श्री. शंभरकर यांनी सांगितले, वर्ष २०२०-२१ चा जिल्हा कौशल्य नियोजन  आरखडा तयार करून  त्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी  हा पुरस्कार मिळाला आहे. मेडीकल हब म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख असून महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातून जिल्हयात रुग्ण उपचारघेण्यासाठी येतात. ही बाब लक्षात घेवून रुग्णांना गुणवत्तापूर्ण औषधोपचार देण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले. केळी, द्राक्ष प्रक्रियाविषयक  प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. तसेच ऑनलाईन सॉफ्टस्कील प्रोगाम यशस्वीपणे राबविण्यात आल्याचेही  श्री शंभरकर यांनी सांगितले.     

या स्पर्धेत देशभरातील ४६७ जिल्ह्यांनी सहभाग घेऊन आराखडा सादर केला होता. केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता  मंत्रालयाने पुरस्कार निवडीसाठी  दिल्ली आणि खरगपूर आयआयटीच्या तज्ज्ञांची नेमणूक केली होती.  

                                                   

Post a Comment

Previous Post Next Post