महापुरुषांच्या पुतळ्यांपासून भावी पिढीला विचार आणि प्रेरणा मिळेल... ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कागलच्या भूमीत महापुरुषांचे विचारांचे अनावरण - नाना पाटेकर.


प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर, दि. 4 (जिमाका) : कागल ही ऐतिहासिक वारसा, परंपरा लाभलेली भूमी आहे. समतेचा विचार देणाऱ्या कागलच्या पवित्र भूमीत उभारलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यांपासून भावी पिढीला विचार आणि प्रेरणा मिळेल, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. तर महापुरुषांनी समाज कार्यासाठी आपले आयुष्य वेचले आहे. त्यांचे विचार आत्मसात करुन त्यानुसार समाज हितासाठी प्रत्येकाने काम करावे. आज कागलच्या भूमित महापुरुषांच्या पुतळ्यांचे अनावरण झाले असे न म्हणता त्यांच्या विचारांचे अनावरण झाले असेच म्हणावे लागेल, असे मत सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले. 

कागल नगरपरिषदेच्या वतीने गैबी चौक येथे उभारण्यात आलेल्या महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे तर श्री शाहू उद्यान येथे उभारण्यात आलेल्या महात्मा बसवेश्वरांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांच्या हस्ते आज करण्यात आले. 

पुतळ्यांच्या अनावरण कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक व धैर्यशील माने, आमदार सर्वश्री जयंत आसगांवकर, पी. एन. पाटील, प्रकाश आबिटकर, राजेश पाटील, राजू आवळे, जयश्री जाधव, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, संजय घाडगे, सुजित मिणचेकर व संध्यादेवी कुपेकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, तहसीलदार शिल्पा ठोकडे, मुख्याधिकारी टिना गवळी यांच्यासह  कागल व  तालुक्यातील ग्रामस्थ उपस्थित होते

ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, महापुरुषांचे विचार हे समाजासाठी दीपस्तंभासारखे असतात. सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतूनच महापुरुषांच्या विचारावर वाटचाल सुरु असून त्यांच्या प्रेरणेतून आपल्या हातून समाज विकासाची केली जात आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी राज्य शासनाकडून आवश्यक ती सर्व मदत मिळविण्यासाठी आपण व्यक्तीश:  प्रयत्न करु अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.  पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये आयटीपार्क उभारण्यासाठी आणि गडहिंग्लज येथील औद्योगिक वसाहतीमधील सुविधांसाठी प्रयत्न केले जातील. जेष्ठ अभिनेते व सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर पुतळ्यांच्या अनावरण कार्यक्रम उपस्थित राहिल्याबद्दल ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ यांनी त्यांचे आभार मानले.

श्री. पाटेकर म्हणाले, सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकानी समाजाभिमुख होऊन समाजासाठी आपले योगदान द्यावे. महापुरुषांनी चांगल्या विचारांचा प्रसार, प्रचार होण्यासाठी आपले आयुष्य वेचले आहे. महापुरुषांचे विचार आजही समाजाला प्रेरणा देणारे आहेत. समतेचा संदेश व जागर करणाऱ्या कागलच्या या ऐतिहासिक भूमीत महापुरुषांचे पुतळे सर्वांनाच प्रेरणा  देतील. महापुरुषांचे पुतळे पाहून त्यांच्या विचारांचे पाईक होऊया, अशी अपेक्षाही श्री. पाटेकर यांनी यावेळी व्यक्त केली.

सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, विकासाच्या योजना राबविण्यात कागल तालुका सर्वात पुढे आहे, याचे श्रेय ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना द्यावे लागेल.  कागल शहरात उभारलेले महापुरुषांचे पुतळे सर्वांना समतेच्या विचारांची प्रेरणा देतील, असेही श्री. यड्रावकर म्हणाले.

कागल समतेचा विचार देणारी भूमी आहे. महापुरुषांनी दिलेला हा समतेचा हा विचार आपण  सर्वजण मिळून पुढे नेऊया, अशी भावना व्यक्त करुन कागल शहरात महात्मा गांधी यांचा पुतळा उभारला जावा, अशी अपेक्षा खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केली.

शाहू विचारांचे आचरण करत असलेल्या कागल नगरीत पुतळ्यांच्या स्वरूपात महापुरुषांची स्मारके उभारली आहेत.  समतेचा आणि मानवतावादी विचारांचा संदेश देणाऱ्या महात्म्यांचे पुतळे भावी पिढीला समतेच्या विचारांची ऊर्जा देतील, असा विश्वास खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केला.

माजी आमदार मालोजीराजे छत्रपती म्हणाले, महापुरुषांच्या विचारांची आज समाजाला खरी गरज असून त्यांच्या विचारांचे अनुकरुन करणे आवश्यक आहे. महापुरुषांच्या पुतळ्यांमुळे कागलच्या वैभवात भर पडली आहे. महापुरुषांच्या कृतीशील विचारांचा वारसा पुढे नेऊया, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कार्यक्रमात सचिन साठे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रकाश गाडेकर यांनी स्वागत तर भैया माने यांनी प्रास्ताविक केले. 


Post a Comment

Previous Post Next Post