राज्यव्यापी उद्यमिता यात्रेची कोल्हापूरात सुरुवात

 औद्योगिक क्षेत्रात कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रेसर व्हावा -जिल्हाधिकारी राहुल रेखावार            

प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर : (जिमाका): जिल्ह्याच्या उद्योग क्षेत्राला मोठी परंपरा आहे. शाहू महाराजांनी अनेक उद्योग उभारुन औद्योगिक विकासाला गती दिली, त्यामुळेच कोल्हापूर जिल्हा औद्योगिक क्षेत्रात संपन्न आहे. जिल्ह्यातील तरुणांनी, महिलांनी उद्यमिता यात्रेतून प्रशिक्षण घेवून आत्मविश्वासाने नवनवीन उद्योग व्यवसायात यशस्वी व्हावे आणि औद्योगिक क्षेत्रात कोल्हापूर जिल्हा राज्यात पुढे यावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले. 

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, कौशल्य विकास सोसायटी आणि युथ एड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गरजु व होतकरु उमेदवारांसाठी साळोखेनगर येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात तीन दिवसीय व्यवसाय विकास प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार जयश्री जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी, युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मॅथ्यू मत्तम, उद्यमिता यात्रेचे राज्य समन्वयक मनोज भोसले, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रवींद्र मुंडासे, डी.वाय.पाटील इंजिनिअरिंग कॉलेज साळोखेनगर कॅम्पस प्रमुख तथा कोल्हापूर इन्क्युबेशन सेंटरचे संचालक डॉ.अभिजीत माने उपस्थित होते. यावेळी कोल्हापूर इंक्युबेशन सेंटर अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण करुन यशस्वी उद्योग सुरु केलेल्या नवउद्योजक व दिव्यांग उद्योजकांना ‘उद्योग आधार’ प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 

जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, कोल्हापूरचा प्रत्येक व्यक्ती आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे. त्यामुळे उद्योजक बनण्यासाठी त्यांना केवळ योग्य दिशा देणे आवश्यक आहे. आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक पाऊल आत्मविश्वासाने टाकणे आवश्यक असते. नवउद्योग सुरु केलेल्या उद्योजकांनी हे पहिले पाऊल टाकलेले असून केवळ आत्मविश्वासाने सामोरे जाणे आवश्यक आहे.  नवनवीन बाबींची माहिती घ्या.  कोणत्याही अडचणीला न डगमगता मनातील भीती, शंका बाजूला ठेवा. उद्योगासाठी आवश्यक ते ज्ञान आत्मसात करा. उद्योगाशी संबंधित नवनवीन कला आत्मसात करा. यासाठी आवश्यक प्रशिक्षण घ्या. सतत नवीन गोष्टी शिका, समजून घ्या. तहान-भूक विसरुन वेगाने काम करा. ग्राहकांना जोडून ठेवा. कष्ट करा आणि यशस्वी उद्योजक बना, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी केले.

  आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, उद्यमिता यात्रेच्या माध्यमातून देण्यात येत असलेल्या ज्ञानाच्या गंगेचा तरुणांनी व महिलांनी लाभ घ्यावा. स्व. आमदार चंद्रकांत जाधव यांनी व्यवसाय सुरु केला. खूप कष्टातून तो उद्योग नावारुपाला आला. त्यांच्या प्रेरणेतून आता मी उद्योग सांभाळत असल्याचा दाखला देऊन अपार कष्ट करा, विविध कौशल्य आत्मसात करा, ज्ञान मिळवा आणि यशस्वी उद्योजक व्हा, असा सल्ला त्यांनी दिला.

  मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले, कोल्हापुरातील नागरिक व्यवसायाभिमुख आहेत. स्पर्धा परीक्षांमधील यशाची आकडेवारी पाहिली असता लक्षात येते की, उद्योग क्षेत्रातील स्पर्धा तुलनेने कमी आहे. पूर्वी खेड्यांमध्ये प्रत्येक व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती होत्या, त्यामुळे गावे स्वयंपूर्ण, समृद्ध होती. शहरे आणि गावांमध्ये महाविद्यालयांबरोबरच औद्योगिक प्रशिक्षण संस्थाही निर्माण व्हायला हव्यात, असे सांगून आपली मानसिकता बदलून अधिकाधिक तरुणांनी उद्योग व्यवसायाकडे वळावे, असे सांगितले.

  औद्योगिक क्षेत्राला अधिकाधिक चालना देणे आवश्यक आहे, असे सांगून मॅथ्यू मत्तम म्हणाले, देशाचा विकास साधायचा असेल तर देशातील तरुणांनी उद्योग क्षेत्राकडे वळावे. विविध कौशल्य आत्मसात करून उद्योग उभा करावा व आवश्यक ते प्रशिक्षण घेऊन यशस्वी व्हावे, असे त्यांनी सांगितले. कोल्हापुरी मिसळ, कोल्हापुरी चिकन, तांबडा-पांढरा रस्सा, कोल्हापुरी चप्पल असे विविध ब्रँड भारतभर प्रसिद्ध असल्याची  उदाहरणे देवून यात आणखी भर पडायला हवी, असेही ते म्हणाले.

सहायक संचालक संजय माळी म्हणाले, नवउद्योजकांनी ज्ञान, माहिती घेवून आवश्यक ती विविध कौशल्ये आत्मसात करावीत.  10 मे रोजी मुंबई येथून सुरु झालेल्या राज्य शासनाच्या उद्यमिता यात्रेच्या वतीने 36 जिल्ह्यात महिला आणि युवकांना मार्गदर्शन देण्यात येत आहे. 4 हजार व्यावसायिक तयार करण्याचे उद्यमिता यात्रेचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोल्हापूर इन्क्युबेशन सेंटरचे संचालक डॉ.अभिजीत माने म्हणाले, इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना, महिलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन उद्योग व्यवसायाला चालना दिली जात आहे.

कार्यक्रमास ५६० प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. यावेळी महिला, तरुण नवउद्योजक तसेच आय. टी. आय. चे विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. युथ एड फाउंडेशनचे तज्ज्ञ प्रशिक्षक मयूर घडसिंग, तेजस वाल्हेकर,  किशोरी ठकार, अमित तिखाडे प्रशिक्षणार्थींना पुढील तीन दिवस व्यवसाय विकास प्रशिक्षण देणार आहेत. प्रशिक्षणात व्यवसायाची निवड कशी करायची, आर्थिक नियोजन कसे करायचे, व्यवसायाचे ब्रॅण्डिंग आणि मार्केटींग कसे करायचे, त्यासोबतच व्यवसाय वाढवण्यासाठी काय करायचे इत्यादी विषयांचे प्रशिक्षण दिले जाणार असून नव उद्योजकांना युथ एड फाउंडेशन यांच्यावतीने व्यवसाय वाढीसाठी पुढील सहा महिने मदत आणि मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील तरुण- तरुणी आणि महिलांनी या प्रशिक्षण उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उद्यमिता यात्रा जिल्हा समन्वयक अमर कांबळे यांनी यावेळी केले.

उद्यमिता यात्रेची सुरुवात: कोल्हापूर इंक्युबेशन सेंटर अंतर्गत उपक्रम

कौशल्य विकास विभाग, कौशल्य विकास सोसायटी आणि युथ एड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेली राज्यव्यापी उद्यमिता यात्रा आज कोल्हापूर येथे पोहोचली. उद्यमिता यात्रेचे स्वागत आमदार ऋतुराज पाटील व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, साळोखेनगर येथे केले. यावेळी आमदार जयश्री जाधव प्रमुख उपस्थित होत्या.

आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रासाठी पोषक वातावरण आहे. नव उद्योजकांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. लाभ घेऊन नवउद्योजकांनी उभारी घ्यावी. सध्याच्या काळात उद्यामिता यात्रेद्वारे देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणासारख्या उपक्रमांची नितांत गरज असून याचा प्रशिक्षणार्थ्यांना नक्की फायदा होईल.

  कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी, युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मॅथ्यू मत्तम, उद्यमिता यात्रेचे राज्य समन्वयक मनोज भोसले, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रवींद्र मुंडासे, कोल्हापूर इन्क्युबेशन सेंटरचे संचालक डॉ.अभिजीत माने उपस्थित होते.  


Post a Comment

Previous Post Next Post