लोकांनी एकत्र येऊन कायम स्वरूपाची पर्यावरण चळवळ उभी करावी लागेल.... ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक संदीप चोडणकरइचलकरंजी ता. ६ जागतिक तापमान वाढीचे दृश्य परिणाम पंचगंगा नदीखोऱ्यामध्ये सुद्धा जाणवू लागले आहेत. गेल्या दहा वर्षांमध्ये महापूर, दुष्काळ आणि रोगराईचा सामना जनतेला करावा लागला. या समस्या सुटताना दिसत नसल्यामुळे नदीखोऱ्यातील जनजीवन, जनमानस अस्वस्थ आहे. पर्यावरणाच्या या समस्यांवर मात करण्यासाठी आता लोकांनी एकत्र येऊन कायम स्वरूपाची पर्यावरण चळवळ उभी करावी लागेल असे मत ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक संदीप चोडणकर यांनी व्यक्त केले. ते समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालयाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन आणि शिवस्वराज्य दिन यानिमित्ताने आयोजित व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.' पंचगगेचे खोरे आणि अस्वस्थ लोकमानस ' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार दयानंद लिपारे होते .प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रा.रमेश  लवटे  यांनी पाहुण्यांचे ग्रंथभेट देऊन स्वागत केले. प्रसाद कुलकर्णी यांनी प्रस्ताविक केले. तसेच रयतेच्या स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपतींच्या वृक्षसंवर्धनासाठीच्या आज्ञापत्राचे वाचन केले.आणि शिवाजी महाराजांच्या  पर्यावरण संदर्भातील विचारांची समकालीन प्रस्तुतता स्पष्ट केली.

संदीप चोडणकर म्हणाले, स्वीडनमध्ये १९७२ साली सुरवात झालेल्या पर्यावरण परिषदेनंतर पन्नास वर्षांनी पुन्ह पुन्हा चर्चा आयोजित केल्या जात आहेत. यापुढे जलवायूपरिवर्तनाचे मोठे संकट जगावर असणार आहे. पुढील सात -आठ वर्षांमध्ये १.५ डिग्री सेंटिग्रेड पर्यंत तापमान वाढ रोखली गेली नाही तर त्याचे विध्वंसक परिणाम सर्वसामान्य लोकांना भोगावे लागतील. क्लायमेट सेक्युरिटी साठी आता जग खडबडून जागे झाले आहे. गेल्या पन्नास वर्षातील झालेल्या चुकां सुधारून सर्वसमावेशक चर्चा आता जागतिक पटलावर होताना दिसत आहे हा आशेचा किरण आहे.  ग्लासगो येथील COP 27 परिषदेनंतर मुंबई शहराने क्लायमेट ऍक्शन प्लॅन तयार केला आहे. स्थानिक पातळीवर सुद्धा असे क्लायमेंट ऍक्शन प्लॅन तयार केले गेले पाहिजेत. 

  ते पुढे म्हणाले,इचलकरंजी शहराने २०११ साली लोकसहभागातून पर्यावरणाचा आराखडा तयार केला. घर, विभाग शहर पातळीवरील आराखडे पर्यावरण संवर्धनासाठी महत्वाचे आहेत. पर्जन्यजल संकलन, कचरा निर्मूलन, पर्यावरण व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये युवकांना काम करायचे आहे, त्यास चालना देणे गरजेचे आहे. प्रशासन आणि स्थानिक वस्त्रोद्योग, साखर उद्योगांनी सुद्धा लोकांच्या अश्या प्रयत्नांमध्ये सहभागी होऊन त्यास चालना दिली पाहिजे. पाण्याचे व्यापारीकरण वाढत आहे. रासायनिक प्रदूषणामुळे जलस्रोत कायमचे बाधित होत आहेत. या कडे उद्योग आणि प्रशासनाने गांभीर्याने बघितले पाहिजे. जलसाक्षता आणि पर्यावरण साक्षरता या विषयांवर पुढील किमान दहा वर्षे सातत्याने काम झाले तरच जलवायू परिवर्तन आणि पर्यावरण प्रदूषणाच्या गंभीर समस्ये मधून आपण बाहेर पडू शकू.

     दयानंद लिपारे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.यावेळी अक्षय कोळी,सचिन पाटोळे,रामभाऊ ठीकणे, तुकाराम अपराध,अशोक केसरकर ,शकील मुल्ला, नौशाद शेडबाळे ,जतिन पोतदार, प्रा.आर्पिता सोकाशे, किरण सोकाशे,आनंदराव जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.पांडुरंग पिसे यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post