भाई माधवराव बागल पुरस्काराच्या निमित्ताने..

(भाई माधवराव बागल पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केलेल्या मनोगताच्या आधारे तयार केलेला लेख.)

प्रेस मीडिया लाईव्ह :

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

(९८ ५०८ ३० २९०)

सर्वप्रथम आज २८ मे २०२२ रोजी ' भाई माधवराव बागल ' यांच्या १२६ वा जन्मदिनी त्यांना विनम्र अभिवादन.आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.जयसिंगराव पवार,भाई माधवराव बागल विद्यापीठाचे अध्यक्ष ऍड.अशोकराव साळोखे,कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ.टी.एस.पाटील आणि सर्व संचालक,मंचावरील व मंचासमोरील सर्व मान्यवर,या समारंभासाठी आलेले समाजवादी प्रबोधिनीच्या कामातील माझे सर्व सहकारी, प्रबोधन दिंडीतील व समविचारी चळवळीतील सर्व सहप्रवासी स्नेही वारकरी,या कार्यक्रमासाठी आवर्जून सहकुटुंब आलेल्या माझ्या दोन्ही बहिणी व दोन्ही मेहुणे ,मला शुभेच्छा देणारे बंधू - भगिनी आणि मित्रपरिवार आणि माझे सर्वच कुटुंबिय यांना सर्वप्रथम मी कृतज्ञतापूर्वक नमस्कार करतो.पुरस्कार समारंभासाठी हे  भरलेलं सभागृह पाहून मला भरून आलं आहे. एरवी मी शेकडो भाषणे दिलेली आहेत,पण जीवनात काही प्रसंग असे असतात की आपल्याला आपल्या घेतलेल्या नोंदीबद्दल आणि केलेल्या कोतुकाबद्दल काय बोलावं ,कस बोलावं,किती बोलावं हे सुचत नाही.आजचा प्रसंग त्यातील आहे.सामाजिक कार्यकर्ता कठीण प्रसंग व कठीण परिस्थिती यांना सातत्याने सामोरा जात असतो.त्याला त्याचा रियाज असतो.पण अशा कौतुकाचे,पाठीवर हात असल्याच्या जाणिवेचे जाहीर प्रसंग दुर्मिळ असतात.मला दिलेल्या मानपत्राच जाहीर वाचन मीही ऐकलं.नव्या जबाबदारीची जाणीव अधिक बळकट झाली. या साऱ्यामुळे माझ्या एरवीच्या सहजतेला निश्चितच थोडं अवघडलेपण आलं आहे.

या  पुरस्काराची उंची मी वेगळी काय सांगू ? महाराष्ट्रातील महत्वाच्या पुरस्कारापैकी हा एक आहे.गेल्या पंचवीस वर्षांपासून दरवर्षी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारर्थिनींची नावे पाहिली तरी यातील प्रत्येकाने मराठी मातीचा सुगंध अपआपल्या क्षेत्रातील अनमोल योगदानाने देशभर - देशाबाहेरही पसरवला आहे. अशा 'भाई माधवराव बागल पुरस्कार ' या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल आणि  तो समारंभपूर्वक मला प्रदान केल्याबद्दल  निश्चितच आनंद वाटतो आहे.अर्थात हा पुरस्कार माझा एकट्याचा नाही याची मला नम्र जाणीव आहे.समाजकार्यात व्यक्तीपेक्षा समष्टीचे महत्व मोठे असते. हा पुरस्कार समाजवादी प्रबोधिनी व परिवर्तनवादी चळवळीत गेली सदतीस वर्षे मी काम करत असताना कालवश आचार्य शांतारामबापू,एन.डी.सर,पानसरे काका यांच्यासह सर्व दिग्गज मार्गदर्शकांमुळे, समाजवादी प्रबोधिनीतील व परिवर्तनवादी चळवळीतील माझ्या सर्व सहकाऱ्यांमुळे व प्रबोधिनी परिवारामुळे, मला संघटन -लेखन-भाषण-संपादन आदी अनेक बाबतीत सहकार्य करणाऱ्या सर्वांमुळे,माझ्या लेखन व वाणीवर प्रेम करणाऱ्या असंख्य वाचक - श्रोत्यांमुळे,माझ्या हाकेला ओ आणि शब्दाला किंमत देणाऱ्या मित्रपरिवारामुळे, मला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक हितचिंतकामुळे ,माझी लेखणी व वाणी अधिकाधिक धारदार करणाऱ्या वैचारिक टीकाकारांमुळे पण माणूस म्हणून व्यतिगत पातळीवरील मित्रांमुळे ,आणि १९८५ साली प्रबोधिनीचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करण्याचा निर्णय घेत असतांनाच मला मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती कविवर्य सुरेश भट भेटले आणि मी गझलकार होऊ लागलो या  गझलप्रवासात भेटलेल्या सर्वांमुळें, माझे तजेलास्थान असलेल्या गझलेमुळे,आणि माझ्या सर्व कुटुंबियांच्या सहकार्यामुळे मिळतो आहे याची नम्र जाणीव मला आहे.म्हणूनच आपल्या सर्वांच्या वतीने आपला प्रतिनिधी म्हणून विनम्रतापूर्वक हा पुरस्कार स्वीकारला आहे.

ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा.राम पुनियानी यांच्या हस्ते तो मला दिला जाणार होता.पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते येऊ शकले नाहीत.त्यांची प्रकृती लौकर बरी होवो यासाठी माझ्या शुभेच्छा.या कार्यक्रमाला त्याच तोलामोलाचे असलेले आणि राजर्षी शाहूंराजांचे कार्यकर्तृत्व अवघ्या जगाला माहीत करून देणारे थोर इतिहास संशोधक डॉ.जयसिंगराव पवार पाहुणे म्हणून लाभले आहेत.त्यांच्या हस्ते  मला सपत्निक पुरस्कार प्रदान करण्यात आला याचा अतिशय आनंद आहे.भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात व लोकराजे राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी वर्षात हा पुरस्कार मिळतो आहे यामुळे हा आनंद द्विगुणित झाला आहे. प्रबोधनाचा वसा व वारसा अधिक ताकदीने पुढे नेण्यासाठी हा पुरस्कार प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.आज प्रबोधन व परिवर्तनाची चळवळ गतिशीलतेने,व्यापकतेने,ऐक्यभावनेने  करण्याची गरज आहे.हा पुरस्कार सर्व मार्गदर्शक,सहकारी,हितचिंतक अशा सर्वाचा आहे.मी निमित्तमात्र आहे.

भाई माधवराव बागल पुरस्कार पुरस्काराने आजवर पंचवीस मान्यवरांना सन्मानित केले आहे.यापैकी थोर चित्रकार गणपतराव वडणगेकर यांना भेटण्याची संधी मला मिळाली नाही.उर्वरित चोवीस जणांची माझी प्रत्यक्ष ओळख होती ,आहे.त्यातील अनेक माझे मार्गदर्शक आहेत.अनेक सहकारी आहेत .भाई माधवराव विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार कालवश बाबूरावजी धारवाडे ,शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू कालवश रा.कृ.कणबरकरसर आणि सर्वच मान्यवराशीही माझा निकटचा परिचय होता. माझ्या जडणघडणीमध्ये बागल विद्यापीठाच्या कार्यकर्ता प्रबोधन शिबिरांचा मोठा वाटा आहे याची मी कृतज्ञतापूर्वक नोंद करतो. समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस आणि माझे प्रबोधनकार्यातील गुरु किंबहुना ज्यांचा मानसपुत्र म्हणून माझी ओळख आहे त्या कालवश आचार्य शांताराम गरुड यांना त्यांच्या आयुष्यात मिळालेला शेवटचा पुरस्कार भाई माधवराव बागल पुरस्कार होता. २८ मे २०११ रोजी त्यांना तो असाच समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.आणि ३ सप्टेंबर २०११ रोजी ते कालवश झाले. प्रबोधिनीचे संस्थापक असलेले प्रा. डॉ.एन.डी.पाटील ,शहीद गोविंदराव पानसरे यांनाही हा पुरस्कार मिळालेला होता. तसेच माझे ज्येष्ठ सहकारी प्राचार्य आनंद मेणसे यांनाही हा पुरस्कार मिळाला आहे. आज मला मिळालेला बागल पुरस्कार स्वीकारताना प्रबोधन व परिवर्तनाच्या चळवळीतील माझे काम मी योग्य दिशेने करतो आहे याची कौतुकपूर्ण नोंद घेतली आहे असे मला वाटते. गेली सदतीस वर्षे सातत्यपूर्ण काम केल्याची ही पोच दिल्याचा आनंद जसा आहे तसेच वाढत्या जबाबदारीची जाणीवही आहे. या कामात अधिक ऊर्जेने काम करण्याची प्रेरणा मला मिळालेली आहे. माझे सर्व सहकारी सुद्धा अधिक व्यापकतेने  या कामामध्ये माझ्याबरोबर असतील याची खात्री आहे.

मित्रहो ,आजचे वर्तमान अस्वस्थ आहे .सत्यापेक्षा असत्याचा बोलबाला व गुणगान जास्त आहे.अहिंसेपेक्षा हिंसाचार बळावतो आहे.ओठात राम व पोटात नथुराम जोपासला जातोय. सर्व क्षेत्रात सुमारीकरणाच वारू चौखूर उधळत आहे

सार्वजनिक उद्योग व क्षेत्रांना ' राष्ट्राची मंदिरे ' असे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु म्हणतअसत.पण आज सार्वजनिक क्षेत्रे उध्वस्त करून,कवडीमोलाने विकून टाकली जात आहेत.ही खरीखुरी मंदिरे मोडून दैववादी मंदिरांच्या भोवती राष्ट्राला फिरवले जात आहे. भारताच्या तत्त्वज्ञानाच्या उदात्त परंपरेला, भारतीय राज्यघटनेच्या तत्वज्ञानाला जाणीवपूर्वक तडे दिले जात आहेत. धर्मश्रद्धा व भावना यांचा उन्मादी सत्तास्थापी वापर करून घेतला जात आहे. माणसांच्या श्रद्धेला व भावनेला इतके कमी समजले जाणे हे राष्ट्रीय अध:पतन आहे. स्वामी विवेकानंद म्हणाले होते, ' भारतात धर्म व राजकारण यांचा शोध गेली हजारो वर्षे सुरू आहे. पण त्याची आपण एकमेकात सरमिसळ केली तर आपली अधोगती अटळ आहे.' आज ज्यांच्या भगव्या कफनीचा अभिमान बाळगावा अशा स्वामी विवेकानंदांच्या विचारांशी प्रतारणा करून धर्म व राजकारण यांची सांगड घालून आपल्याला अधोगतिकडे नेले जात आहे.

गेल्या काही वर्षात जनतेला जमिनीवरच्या प्रश्नांबाबत अधांतरी ठेऊन हवेतील प्रश्न उभे केले जात आहेत.स्वातंत्र्यानंतरच्या काळातील सर्वोच्च बेरोजगारी, जीवघेणी प्रचंड महागाई, जगण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या मूलभूत गोष्टींची कमतरता,रुपयांचे ऐतिहासिक अवमूल्यन,सतत घसरता जीडीपी, भुके पासून आनंद निर्देशांकामध्ये शेवटच्या स्थानी ढकलले जाणे,नोटाबंदी पासून  लॉकडाऊन पर्यंतचे अनेक आततायी देशबुडवे निर्णय, समाजाचे जातीय व धार्मिक केले जात असलेले ध्रुवीकरण ,स्वधर्मप्रेमापेक्षा परधर्मद्वेषाची आलेली हिंसकता, विरोधक मुक्त भारत या लोकशाहीशी विसंगत वल्गना,हातात असलेल्या सत्तेचा अनिर्बंध दमनकारी वापर, भारतीयत्व हेच राष्ट्रीयत्व याचा पद्धतशीर पाडला जात असलेला विसर, अवैज्ञानिक व अशास्त्रीय बाबींची सतत मांडणी, सर्व व्यवस्थांचे तकलूपीकरण व सुमारी करण होत आहे. महामानव हायजॅक करून त्यांचे विकृतपणाने सादरीकरण सुरू आहे. आणि सत्य सांगणाऱ्यांना,न्याय मागणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जात आहे. राजकारण, समाजकारण, अर्थकारण ,संस्कृतीकारण ,धर्मकारण अशा सर्व क्षेत्रांचे विद्रुपीकरण सुरू आहे. आणि त्याला सबका साथ सबका विकास ,आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया अशी गोंडस नावे दिली आहेत. पण शब्दांच्या बुडबुड्यातून,दिवा स्वप्नातून देश घडत नसतो. देश घडत असतो तो नेतृत्वाच्या व्यापक भूमिकेतून. मन की बात पेक्षा जन की बात महत्वाची असते. हे सार्वकालिक सत्य आहे.म्हणूनच आजच अस्वस्थ वर्तमान भयावह आहे .त्यामुळे प्रबोधनाची कधी नव्हे तेवढी गरज आज निर्माण झाली आहे.

निद्रिस्ताची निद्रा भंग करणे, स्वतःची ओळख पटणे, आत्मबोध प्राप्त होणे हा प्रबोधनाचा प्रारंभ असतो.उजेडाचा उगम सुर्यात नसतो तर तो माणसाच्या मनात असतो हे विचारवंतांनी यापूर्वीही सांगितलेले आहे.समाजामध्ये ज्ञानापेक्षा शहाणपणा किती वाढला हे पाहणे फार महत्त्वाचे असते. आपल्याला संत चळवळ,छत्रपती शिवराय, राजर्षी शाहू, महात्मा फुले, डॉ.आंबेडकर अशी अनेकांची मोठी राष्ट्रीय मराठी परंपरा लाभलेली आहे. प्रबोधन चळवळीतून ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, आर्यसमाज, थीऑसॉफिकल सोसायटी, रामकृष्ण मिशन ,सत्यशोधक समाज अशा अनेक संस्था निर्माण झाल्या. भारतीय स्वातंत्र्यलढ्याने,लोकमान्य टिळक व गांधी युगाने, डॉ बाबासाहेब शिल्पकार असलेल्या राज्यघटनेने ,नवभारताचे उभारणीचे एक व्यापक व सुदृढ स्वप्न आपल्याला दिले आहे .नेहरूंनी नियतीशी करार करताना स्वप्न पाहिले. ती स्वप्ने निरनिराळ्या इझमच्या माध्यमातून आपल्या स्वतःच्या जीवन जाणीवा व्यापक करून आपल्याला सत्यात आणावी लागतील. समाजप्रबोधनाच्या कार्यात समाजातील मध्यमवर्गाची भागीदारी नेहमीच मोठी राहिलेली आहे. मात्र गेल्या काही वर्षात हा मध्यमवर्ग प्रबोधन व परिवर्तनाच्या चळवळीपासून मोठ्या संख्येने अलिप्त राहतो आहे.त्याला जोडून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे असे मला वाटते.भाई माधवराव बागल जे व्यापक स्वप्न पाहत होते याचे भान हा पुरस्कार स्वीकारताना मला आहे.म्हणूनच त्यासाठी कार्यरत राहण्याचा मी सतत प्रयत्न करत असतो.

 कोणतेही राष्ट्र हे योग्य विवेकी निर्णयातून उभे राहत असते.योग्य निर्णय व त्याची अंमलबजावणी यातूनच राष्ट्र उभारणीची एक दीर्घकालीन प्रक्रिया आकार घेत असते .भारतीय स्वातंत्र्यानंतर आपण जो आकार घेतलेला आहे तो निश्चितच स्पृहणीय आहे.अर्थात तो अधिक चांगला करता आला असता याबद्दल दुमत नाही. पण काहीच झाले नाही असे म्हणणे ही राष्ट्रीय कृतघ्नता आहे.स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात मध्यंतरी कोणीतरी हा देश २०१४ सली स्वतंत्र झाला आहे असे अत्यंत राष्ट्रद्रोही ,स्वातंत्र्यविरांचा अपमान करणारे वक्तव्य केले. त्याचा कडाडून निषेधही झाला नाही हे बरोबर नाही. पोलादी पुरूषाचे नाव घेत सिद्धीपुरुष आणि प्रसिद्धीपुरुष निर्माण होणे,त्यांचा अंधभक्त संप्रदाय निर्माण होणे, जमिनीवरील गंभीर प्रश्नांची चर्चा टाळणाऱ्यांना अवतारी पुरुष मानून त्यांच्यामागे  कोण जर फरपटत नेत असेल तर त्यापासून त्याला सावध करणे ही आजच्या प्रबोधनाची मुख्य दिशा असली पाहिजे. बोलण्यासारखं बरच आहे पण ज्यांना प्रबोधनाचा वसा आणि वारसा पटला आहे त्यांनी कृतिशील होण्याची गरज आहे. ते त्यांनी व्हावं असं नम्र आवाहन करतो.आपणही सर्वजण प्रबोधनाच्या दिंडीत अधिक सक्रिय पणाने सहभागी व्हाल असा आशावाद व्यक्त करतो व थांबतो. मी आजवर मला मिळालेल्या पुरस्काराची रक्कम मी बापू व एन.डी.सर यांचा आदर्श घेत समाजवादी प्रबोधिनीला देत आलो आहे.समाजाने दिलेली रक्कम समाजसाठीच खर्च झाली पाहिजे. बागल विद्यापीठाच्या शिबिरातून माझ्यातील कार्यकर्ता घडण्यात मोठी मदत झाली याची कृतज्ञता म्हणून पुरस्काराच्या रकमेत एक हजार रुपयाची भर घालून सहा हजार रुपये बागल विद्यापीठाला नम्रतापूर्वक देणगी रूपाने देत आहे.त्यांनी त्याचा स्वीकार करावा ही नम्र विनंती.

 ---- -----------------------

ता.क. सत्काराला उत्तर देतानाच्या माझ्या भाषणानंतर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा.डॉ.जयसिंगराव पवार यांनीही आजच्या अस्वस्थ वर्तमानावर परखड भाष्य केले. आणि राष्ट्र धर्माच्या झेंड्याखाली सर्वांनी एकत्र यावे असे मूलभूत प्रतिपादन केले.अध्यक्षस्थानी ऍड.अशोकराव साळोखे होते.प्रारंभी भाई माधवराव बागल यांच्या प्रतिमेला प्रसाद कुलकर्णी व अन्य मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. शाहीर रंगराव पाटील यांनी कवी श्रीनिवास यादव लिखित आणि श्याम सुतार यांनी संगीतबद्ध केलेले बागल गौरव गीत गायले. कॉ.चंद्रकांत यादव यांनी स्वागत केले प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डॉ.टी.एस. पाटील यांनी करून दिला. संभाजीराव जगदाळे यांनी गौरव पत्राचे वाचन केले.सन्मानचिन्ह, शाल, फेटा, मानपत्र आणि पाच हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते.या समारंभाला सरोजमाई पाटील, प्रा.डॉ.जे.एफ.पाटील ,डॉ. रमेश जाधव ,डॉ. बी.एम. हिर्डीकर, प्रा.डॉ.अरुण भोसले, एम.बी.शेख, सुभाष नागेशकर, दलितमित्र डी.डी.चौगुले ,दलितमित्र व्यंकाप्पा भोसले, विजतज्ञ प्रताप होगाडे ,माजी आमदार राजीव आवळे, जयकुमार कोले,डॉ.चिदानंद आवळेकर,प्राचार्य डॉ.सुनील हेळकर,शशांक बावचकर,मेघा पानसरे,डॉ.मंजुश्री पवार,डॉ.कविता गगरानी,दिलीप पोवार,आर.जी.पाटील,संजयराव कुलकर्णी ,प्रा.शिवाजी होडगे,प्रा.अनिल उंदरे, वसंतराव मुळीक,डॉ.इस्माइल शेख, सीमा पाटील,शाहीर विजय जगताप , प्रा.रमेश लवटे आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह समाजवादी प्रबोधिनीच्या अनेक शाखांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रवी जाधव यांनी आभार मानले.अनिल घाडगे यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

-–----–-----------------------

ब्लॉग : 

 https:// pm kulkarni.home.blog 

 या ब्लॉगवर सातत्याने लेखन. येथे विविध विषयावरचे शेकडो लेख वाचायला मिळतील.

 यु ट्यूब चॅनेल : https://youtube.com/prasad.kulkarni65@ gmail.com या यूट्यूब चॅनेल वर शेकडो गझला - कविता, चित्कलायन या दीर्घ कवितेचे बारा भाग, तसेच अनेक भाषणे

ऐकायला मिळतील. ' एक रविवार : एक गझल ' या उपक्रम युट्युब वरून १४ जून २०२० पासून सतत दर रविवारी सुरु आहे.Post a Comment

Previous Post Next Post