इचलकरंजीत ट्रकला विद्युत वाहिनीचा स्पर्श होऊन भीषण आग

 ट्रक - कापड गाठी सह सुमारे सव्वाकोटींचे नुकसान...

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी येथून राजस्थानकडे निघालेल्या तयार कापड मालाने भरलेल्या ट्रकला विद्युत वाहिनीचा स्पर्श होऊन भीषण आग लागली. लायकर मळ्यात घडलेल्या या आगीच्या घटनेमध्ये ट्रक आणि कापड गाठीसह सुमारे सव्वाकोटी रुपयांचे नुकसान झाले.अग्निशमन दलाला दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.इचलकरंजी येथील लायकर मळा परिसरात मुकेश दाधेचा यांच्या मालकीच्या शशी ट्रान्सपोर्टमधून आज मंगळवारी भर दुपारी १४ चाकी ट्रक राजस्थान-पालीला जाणार होता. ग्रे कापडासह विविध प्रकारच्या गाठी भरलेला हा ट्रक पालीकडे जाण्यासाठी निघाला असता ट्रान्स्पोर्टजवळच उंचावर असलेल्या विद्युत वाहिनीला स्पर्श होऊन ट्रकला भिषण आग लागली. काही क्षणातच ट्रकमधील कापडगाठी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.यावेळी अग्निशमन दल आणि शहरातील विविध ठिकाणच्या हमाल कामगारांनाही पाचरण करण्यात आले होते. अग्निशमन दलाचे ४ बंब आणि भागातील नागरीकांच्या अथक परिश्रमामुळे दोन तासांनी आग आटोक्यात आली. यामध्ये ट्रक आणि ७० लाख रुपयांच्या कापड गाठीसह सुमारे सव्वाकोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Post a Comment

Previous Post Next Post