सिडकोच्या मनमानी कारभाराला होणार पुन्हा विरोध...

 शुक्रवारी २० तारखेला पारगाव येथे सर्वांनी मोठ्या संख्येने एकत्र जमण्याचे आवाहन 

प्रेस मीडिया लाईव्ह

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

नवी मुंबईतील प्रकल्प आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी सिडकोने पारगाव, ओवळे, कुंडेवहाळ या गावांना भूसंपादन करण्याबाबतच्या नोटीसा दिल्या आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीची बैठक समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झाली. सिडकोने प्रलंबित असलेल्या समस्या आधी सोडवाव्यात आणि त्यानंतरच भूसंपदानाचा विषय काढावा, अशी ठाम भूमिका या बैठकीत मांडण्यात आली.

लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीने सातत्याने केलेल्या आंदोलनामुळे जागे झालेल्या सिडको व शासनाने प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधकामासंदर्भात नुकताच एक शासन निर्णय घेतला आहे, मात्र तो निर्णय प्रकल्पग्रस्तांच्या हिताचा नसून सिडको आणि शासनाच्या सोयीचा आहे. हा निर्णय घेताना प्रकल्पग्रस्त संघटना व त्यांच्या प्रतिनिधींकडून कुठल्याही सूचना मागविलेल्या नाहीत. प्रकल्पग्रस्तांच्या २५० मीटरबाहेरील बांधकामांचे काय होणार याचे उत्तर सिडकोकडून अनुत्तरित आहे. याबाबत लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीची बैठक ०५ मे रोजी झाली होती. त्यामध्ये ९५ गावांतील शेतकर्यांची जमीन घेऊन अनेक प्रकल्प सिडकोने उभारले, मात्र आता गरजेपोटी घरांच्या बाबतीत सिडको व शासनाने घेतलेला निर्णय अन्यायकारक आहे. त्यामुळे या भूमीची मालकी हक्क असलेला प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्र हा सिडकोने लादलेल्या निर्णयाच्या विरोधात असून प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी २४ जूनच्या नियोजित आंदोलनाप्रमाणे या विषयावरही आंदोलन करण्याचा इशारा त्या वेळी देण्यात आला होता.

सिडकोने पुन्हा पनवेल तालुक्यातील पारगाव, कुंडेवहाळ, ओवळे या गावांमधील जमीन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाकरिता संपादित करण्यात येणार असल्याच्या नोटीसा प्रकल्पग्रस्तांना दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आगरी समाज मंडळाच्या पनवेलमधील सभागृहात लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीची बैठक समितीचे उपाध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी जमिनीचा जो सर्व्हे २० मे रोजी पारगाव व २३ तारखेला कुंडेवहाळ येथे होणार आहे त्याला समितीने विरोध दर्शविला. विविध समस्यांबाबत ग्रामस्थ अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत तसेच विमानतळाच्या भरावामुळे गावे पाण्याखाली बुडत आहेत. त्याकडे सिडको जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. सिडकोने सर्वप्रथम या सर्व प्रलंबित समस्या सोडवाव्यात आणि त्यानंतरच भूसंपादनाचा विषय काढावा, अशी भूमिका या बैठकीतून मांडण्यात आली.

या बैठकीला लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सरचिटणीस भूषण पाटील, भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, ओबीसी सेल उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, रूपेश धुमाळ, सुनील कटेकर, विनोद म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

शुक्रवारी पारगाव येथे मोठ्या संख्येने एकत्र या -लोकनेते रामशेठ ठाकूर

या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले, विमानतळाच्या प्रकल्पासाठी तीनपट जमीन दिली तशी तीनपट जमीन आता बाधित होणारया  प्रकल्पग्रस्तांना मिळाली पाहिजे आणि ती जमीन कुठे देणार तेही आम्हाला आताच सांगितले पाहिजे. तुमच्या तोंडी आश्वासनावर आमचा विश्वास नाही. आम्हाला उठवण्याअगोदर तुमची डेव्हलमेंटची कामे पूर्ण करा. त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. ज्या वेळी आपण आपली ताकद दाखवू त्या वेळीच यांचे डोळे उघडतील, असे मत व्यक्त करून येणारया  शुक्रवारी २० तारखेला पारगाव येथे सर्वांनी मोठ्या संख्येने एकत्र जमावे. या वेळी दुसरा धक्का सिडकोला द्यावा लागेल. त्यासाठी गावोगावी जनजागृती करा, असेही त्यांनी सूचित केले.

Post a Comment

Previous Post Next Post