राजकीय पक्ष निवडणुकीसाठी पुन्हा सक्रीय झाले

भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि मनसेने आपण तयार असल्याचा दावा केला आहे.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

जिलानी उर्फ मुन्ना शेख :

पुणे :   राजकीय पक्ष निवडणुकीसाठी पुन्हा सक्रीय झाले आहेत. यात भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि मनसेने आपण तयार असल्याचा दावा केला आहे. त्याबाबत या पक्षांच्या शहराध्यक्षांनी दिलेल्या प्रतिक्रिया. तर, ओबीसी राजकीय आरक्षण प्रश्‍नावर सर्वच राजकीय पक्षांनी खुल्या गटातून ओबीसी उमेदवारांना तिकीट देणार असल्याचे म्हटले आहे.

भाजप.....

“निवडणुका केव्हाही झाल्यातरी पक्ष सज्ज असून विकासकामांच्या जोरावर महापालिकेत पुन्हा भाजपच सत्तेवर येईल. न्यायालयाच्या निकालामुळे या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रीयतेमुळेच हे आरक्षण गमवावे लागले आहे,’ असे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी म्हटले आहे

राष्ट्रवादी काँग्रेस : 

निवडणुकीसाठी आम्ही सर्व पातळ्यांवर सज्ज आहोत. गेल्या पाच वर्षांतील भ्रष्ट कारभारामुळे पुणेकर भाजपला या निवडणुकीत घरचा रस्ता दाखवतील. न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करत असून ओबीसींवर राजकीय अन्याय होऊ देणार नाही. खुल्या जागांमधून ओबीसीना त्यांच्या कोट्याएवढ्या जागा पक्षाकडून देण्यात येणार आहेत, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे.

कॉंग्रेस.....

पालिकेच्या निवडणुकांसाठी आम्ही सर्व बाजूंनी सज्ज आहोत. आम्ही शहरात पक्षाची संघटनात्मक बांधणी यापूर्वीच केली असून आढावा बैठका नियमित सुरू आहेत. ओबीसी उमेदवारांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही. त्यांना खुल्या गटातून त्यांच्या हक्काच्या जागा दिल्या जाणार आहेत. पक्षाला या निवडणुकीसाठी पोषक वातावरण असून, पक्ष सर्व पातळ्यांवर सज्ज असून उद्या तातडीची बैठक बोलाविली आहे, असे कॉंग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले.


शिवसेना.....

शिवसेना निवडणुकीसाठी तयार आहे. न्यायालयाच्या निकालाने ओबीसींवर अन्याय झाला असला तरी महाविकास आघाडीतील घटक ओबीसींना 27 टक्के आरक्षण देण्याची तयारी दर्शविलेली आहे. त्यानुसार शिवसेनाही तयार आहे. तर शहरात पक्षाचे नियमित भेटी-गाठी आणि मेळावे सुरू असून महापालिकेत शिवसेना सत्ताबदल घडवेल यात कोणतेही दुमत नाही, असे शहर प्रमुख संजय मोरे म्हणाले.

मनसे....

निवडणुका झाल्या, तर आम्हाला थेट फायदाच आहे. ज्या पद्धतीने पक्षाकडून महाराष्ट्रभर राजकीय वातावरण ढवळून काढले आहे, त्याचा आम्हाला निश्‍चितच फायदा होणार असून आम्ही केव्हाही सज्ज आहोत. मात्र, ओबीसींवरही अन्याय होऊ दिला जाणार नसून त्यांना न्याय हक्कानुसार पक्षाकडून आवश्‍यक त्या सर्व जागांवर संधी दिली जाणार आहे, असे मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post