सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 50 टक्‍के पदे रिक्‍त असल्याची माहिती समोर आली

विद्यापीठ व महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचारी नसल्यामुळे प्रशासकीय कामकाजास गती मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

प्रेस मीडिया लाईव्ह : 

जीलानी उर्फ मुन्ना शेख :

 पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 50 टक्‍के पदे रिक्‍त असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यात शैक्षणिक गुणवत्तेत अग्रेसर असणाऱ्या पुणे विद्यापीठाचा कारभार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने चालत असल्याचे चित्र आहे.पुणे विद्यापीठात येत्या 31 मे रोजी 18 शिक्षकेतर कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. त्यात उपकुलसचिव, कक्षाधिकारी, लेखनिकाचा समावेश आहे. त्याचप्रमाणे 4 प्राध्यापक निवृत्त होत आहेत. विद्यापीठातील एकूण 22 जण एकाच दिवशी सेवानिवृत्त होत आहेत. त्याचा निरोप समांरभाचा कार्यक्रम होणार आहे. मात्र, उच्च शिक्षण क्षेत्रात शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रियेस राज्य शासनाकडून अद्याही मान्यता मिळाली नाही. त्यामुळे विद्यापीठ व महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचारी नसल्यामुळे प्रशासकीय कामकाजास गती मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

सद्य:स्थितीत पुणे विद्यापीठात जवळपास 485 शिक्षकेतर पदे रिक्‍त असल्याची माहिती पुणे विद्यापीठाकडून देण्यात आली. पुणे विद्यापीठात 2014 मध्ये एकूण 210 पदांची शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात आली होती. त्यानंतर आतापर्यंत कर्मचाऱ्यांची भरती झालेली नाही. त्यामुळे दिवसेंदिवस रिक्‍त पदाच्या संख्येत वाढ होत आहे. त्याचा परिणाम प्रशासकीय यंत्रणेवर पडत आहे.

गेल्या आठ वर्षांपासून पुणे विद्यापीठात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती न झाल्याने अनेक कर्मचारी संघटनांनी आवाज उठविला होता. तातडीने राज्य शासनाने शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधाला मान्यता द्यावी, अशी मागणी वेळावेळी केली. मात्र अजूनही आकृतीबंधास मान्यता मिळाली नाही. पदे भरण्यासाठी राज्य शासनाने निर्णय घ्यावा, या मागणीवरून संघटनेने आंदोलन केले होते. परंतु लवकरच हा प्रश्‍न मार्गी लावू, असे आश्‍वासन राज्य शासनाकडून देण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचारी संघटनेत नाराजीचा सूर आहे.

Post a Comment

Previous Post Next Post