कोंढवा बहुउद्देशीय हॉलवर बेकायदेशीर कब्जा केल्याबद्दल

 माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा: आम आदमी पक्ष.


प्रेस मीडिया लाईव्ह :

कोंढवा पुणे  : शहरातील कोंढवा परिसरात पुणे महानगर पालिकेच्या वतीने कोंढवा बहुउद्देशीय हॉल बांधण्यात आला होता. परंतु अक्षम्य तसेच 'अर्थ'पूर्ण शासकीय दुर्लक्षपणामुळे या हॉलवर या परिसरातील मावळते नगरसेवक आणि नवनिर्वाचित मनसे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी कब्जा केल्याचे निदर्शनास आले आहे.

सदर हॉल मनपा प्रशासनाच्या परस्पर साईनाथ बाबर यांनी नाममात्र फीस भरून तिसऱ्याच व्यक्तीस भाडेतत्वावर दिला आहे. हि बाब मनपा प्रशासनाच्या बऱ्याच उशिरा लक्षात आली, त्यानुसार मनपा आयुक्तांनी हि जागा सील करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अशा प्रकारे पुणेकरांच्या मालमत्तेवर लोकप्रतिनिधी अतिक्रमण करणार असतील तर हे प्रकरण गंभीर आहे. आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाने आज कोंढवा पोलीस स्थानकात निवेदन देत मागणी केली आहे की, या प्रकरणाशी संबंधित साईनाथ बाबर तसेच त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व मंडळींवर गुन्हे दाखल करण्यात यावे. जेणेकरून पुन्हा कुठलाही लोकप्रतिनिधी अशा प्रकारे मनपा मालमत्तेवर मालकी स्थापन करण्याचा प्रयत्न करणार नाही. 

आम आदमी पक्षाचे वानवडी विभाग समन्वयक विद्यानंद नायक, आप कोंढवा विभाग समन्वयक साजिद खान, ॲड मनोज माने यांनी आप शिष्टमंडळासह कोंढवा पोलीस स्थानकात पोलीस निरीक्षक यांना आपच्या वतीने निवेदन देत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. मनपा प्रशासनाने देखील या प्रकारची गंभीर घेत प्रशासनातील जे अधिकारी कामचुकारपणा करत आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी आम आदमी पक्षाची मागणी आहे.

"महानगरपालिकेची मालमत्ता ही जनहितासाठीच वापरली जावी ह्या हेतूने जनता नगरसेवक निवडून देते. जर बेकायदेशीररित्या बहुउद्देशीय हाॅल असे नगरसेवक वापरत असतील अथवा परस्पर इतरांना देत असतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे", विजय कुंभार, आप राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष

"लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हे शासकीय मालमत्तेचे रक्षक होण्याऐवजी भक्षक होत असतील तर आम आदमी पक्ष शांत बसणार नाही. पुणेकरांच्या न्याय हक्कांसाठी आप सदैव संविधानीक पद्धतीने लढत राहील.", विद्यानंद नायक, आप वानवडी विभाग समन्वयक कोंढवा पोलीस ठाण्यात निवेदन देताना *आपचे कार्यकर्ते ऍड. मनोज माने, मनोज चोरडिया, सर्फराज शेख, अन्वर बाबा शेख, साजिद खान, समीर आरवाडे, रौफ शेख, आसिफ बागवान, फेबियन सॅमसन, राहुल खोपडे व इतर समर्थक* उपस्थित होते.Post a Comment

Previous Post Next Post