महाराष्ट्राची मॅनेंचस्टर सिटी असलेल्या इचलकरंजी नगरपरिषदेला आता महानगरपालिकेचा दर्जा

 शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांचा पाठपुरावा महत्वाचा आणि निर्णायक मानला जात आहे.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

इचलकरंजी : मनु फरास :

 महाराष्ट्राची मॅनेंचस्टर सिटी  म्हणून प्रसिद्ध असलेल्या इचलकरंजी  नगरपरिषदेला आता महानगरपालिकेचा दर्जा मिळाला असून त्या बाबतची अधिसूचना काल प्रसिद्ध करण्यात आली आहे.महापालिका करताना शहराची हद्दाही वाढविण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. इचलकरंजी ही राज्यातील २८ वी महानगरपालिका ठरली आहे. 

इचलकरंजीला महानगरपालिका होण्यासाठी शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांचा नगरविकास विभागाकडील पाठपुरावा महत्वाचा आणि निर्णायक मानला जात आहे. त्यांनीच काल संध्याकाळी अचानक या संदर्भातील आदेश दाखवत घोषणा केली आणि स्वपक्षासह इतर विरोधकांनाही बुचकळ्यात पाडले. वास्तविक मागील दहा वर्षांपासून इचलकरंजी नगरपालिकेची महापालिका करण्याबाबत चर्चा सुरू होती. 

मात्र प्रत्यक्षात काही महिन्यांपूर्वी धैर्यशील माने यांनी यात आघाडी घेत राज्य शासनाच्या पातळीवर पाठपुरावा सुरू केला. मध्यंतरीच्या काळात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली होती. त्यावेळी त्यांनी प्रस्ताव देण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानंतर नगरपालिकेच्या शेवटच्या सभेत एकमुखी महापालिका करण्याचा ठराव घेण्यात आला होता. नगरपालिकेचा ठराव प्राप्त झाल्यानंतर सर्व पक्षीय नेतेमंडळींनी याबाबतचा ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. त्यावर सविस्तर प्रस्ताव देण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले होते. त्यानुसार एक समिती स्थापन केली होती. त्या समितीने सर्वंकष अभ्यास करून प्रस्ताव तयार केला, आणि यानुसार महापालिकेची अधिसुचना मिळाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post