कर्तव्यात कसूर करणाऱ्या आयजीएम कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

 माणुसकी फौंडेशनचे आंदोलन स्थगित : जावळे..


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी येथील आयजीएम सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल निराधार व्यक्ती पुन्हा पोस्ट कार्यालय परिसरात आढळून आल्याने या प्रकरणी माणुसकी फौंडेशनच्यावतीने कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती. त्याची दखल घेत रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. रविंद्रकुमार शेट्ये यांनी संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. खुलासा प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कारवाईचे आश्‍वासन डॉ. शेट्ये यांनी दिल्याने आंदोलन स्थगित ठेवले असल्याची माहिती माणुसकी फौंडेशनचे अध्यक्ष रवि जावळे यांनी दिली.

मागील आठवड्यात इचलकरंजी शहरातील मुख्य पोस्ट कार्यालय परिसरात एक निराधार व्यक्ती रस्त्याकडेला पडून होती. त्याला धड चालताही येत नव्हते. या संदर्भात काही नागरिकांनी दिलेल्या माहितीवरुन माणुसकी फौंडेशनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्या निराधार व्यक्तीला आयजीएम सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. मात्र अवघ्या दोनच दिवसात ती व्यक्ती पुन्हा पोस्ट कार्यालयात परिसरात रस्त्यावर दिसून आली. त्यामुळे संतप्त माणुसकी फौंडेशनने रुग्णालयात जात तेथील वैद्यकिय अधिकारी व कर्मचार्‍यांना जाब विचारला होता. त्यावेळी संबंधितांवर कारवाई न झाल्यास मंगळवारपासून आंदोलन छेडण्याचा इशाराही माणुसकी फौंडेशनच्यावतीने देण्यात आला होता.

या संदर्भात रवि जावळे व अन्य पदाधिकार्‍यांनी पुनश्‍च डॉ. शेट्ये, डॉ. महेश महाडिक यांची भेट घेऊन विचारणा केली असता डॉ. शेट्ये यांनी त्या व्यक्तीवर ज्या वॉर्डमध्ये उपचार सुरु होते. त्या वॉर्डमधील कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे सांगत खुलासा प्राप्त होताच कारवाई करु असे आश्‍वासन दिले. डॉ. शेट्ये यांच्या आश्‍वासनामुळे माणुसकी फौंडेशनच्यावतीने करण्यात येणारे आंदोलन स्थगित ठेवण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र कारवाई न झाल्यास आंदोलन करणार असल्याचेही जावळे यांनी सांगितले.

यावेळी माणुसकी फौंडेशनचे अध्यक्ष रवि जावळे, प्रथमेश इंदुलकर, आनंद इंगवले, चेतन चव्हान, ऋषिकेश सातपुते आदींसह रुग्णालय कल्याण समिती सदस्य सुभाष मालपाणी आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post