बखर लोकराजाची :अस्सल आशयाचे अव्वल सादरीकरणप्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी ता.१ ,लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे राजेशाही परंपरेतील एक लोकाभिमुख व रयतेभिमुख राजे होते.त्यांच्या स्मृती शताब्दी निमित्त समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालयाच्या वतीने 'प्रत्यय ' कोल्हापूर ,निर्मित 'बखर शाहूराजाची 'हा कार्यक्रम महाराष्ट्रदिन व कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आला होता.


शाहूकालीन आदेश, जाहीरनामे, भाषणे यांच्या संपादित साहित्याच्या अभिवाचनाचा हा कार्यक्रम अतिशय प्रभावीपणे सादर करणयात आला. हे अभिवाचन ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. शरद भुथाडिया,मिलिंद इनामदार,डॉ. रसिया पडळकर,सुहास लकडे,रोहित पोतनीस,हृषीकेश साळवे,आदित्य खेबुडकर आदी कलावंतांनी केले. प्रारंभी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला डॉ.शरद भुथाडीया यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.ज्येष्ठ नेते जयकुमार कोले यांनी सर्व कलाकारांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत केले.प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृतीशताब्दीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय ,कोल्हापूर यांच्यावतीने 'कृतज्ञतापूर्व वंदन लोकराजाला 'या उपक्रमाद्वारे शाहू विचारांचा लोकजागर करणारे प्रबोधन उपक्रम सुरू आहेत.या उपक्रमांतर्गत प्रत्यय संस्थेच्या या अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालयाच्या वतीने करण्यात आले होते.


या अभिवाचनामध्ये शाहू छत्रपतींचे अस्पृश्यता-जातिव्यवस्था-  चातुर्वर्ण्यविरोधी हुकूम, माणगाव परिषदेतील सैद्धांतिक भाषण ,महार वतने खालसा केल्याचा कायदा ,आरक्षणाचा कायदा ,सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाचा कायदा, आधी सामाजिक की आधी राजकीय सुधारणा याबाबतची  भूमिका , महिला उद्धार विषयक भूमिका ,आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह मान्यता, शिमग्यासारख्या सणाला अभद्र भाषेत बोलण्याला बंदी, शेतकऱ्यांचे कल्याण करणारे कायदे ,दुष्काळग्रस्तांना मदत, जनावरांची पैदास - प्रदर्शन, प्लेगशी मुकाबला करण्याची यंत्रणा, सहकार समृद्धीची भूमिका ,शेतकरी- कामगार- मजूर- कष्टकरी यांच्या उन्नतीचे मार्ग आदी अनेक विषयांवरील शाहू राजांचे जाहीरनामे,आदेध, कायदे ,भाषणे यांचा समावेश होता त्यातून शाहू महाराजांचे व्यक्तित्व कार्य कर्तृत्व व याचा अतिशय सखोलपणे त्यांच्याच शब्दात परिचय होत होता. 'एक वेळ गादी सोडून देईन पण बहुजनांच्या उद्धाराचे कार्य सोडणार नाही' असे म्हणणाऱ्या शाहू महाराजांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रभावी प्रयत्न या अभिवाचनातून झाला. समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास जाणत्या रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.

Post a Comment

Previous Post Next Post