पुणे : जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सीची तपासणी होणार

दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी महसूल अधिकारी, गॅस वितरक कंपन्यांचे अधिकारी आणि पोलीस प्रशासनाला दिल्या.

प्रेस मीडिया लाईव्ह : 

जिलानी उर्फ मुन्ना शेख :

 पुणे – गॅस सिलिंडरचे वजन कमी असणे, सिलिंडर घरपोच देणाऱ्यांनी (डिलिव्हरी बॉय) जादा पैसे मागणे, सिलिंडरमधील गॅसची चोरी करून तो दुसऱ्या सिलिंडरमध्ये भरणे आदी तक्रारींची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. गॅस एजन्सींच्या डिलिव्हरी बॉईजने ग्राहकांकडून अतिरिक्‍त पैसे घेऊ नये. योग्य त्या वजनाचा सिलिंडर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी गॅस वितरक कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या सह जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सीची तपासणी करावी. यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी महसूल अधिकारी, गॅस वितरक कंपन्यांचे अधिकारी आणि पोलीस प्रशासनाला दिल्या.

काही दिवसापूर्वी कात्रज येथे एका सिलिंडरमधून गॅस काढून तो दुसऱ्या सिलिंडर मध्ये भरण्यात येत असताना मोठी आग लागली होती. या मध्ये सुमारे 12 सिलिंडरचा स्फोट झाला होता. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली गॅस एजन्सीच्या तपासणी बाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. गॅस एजन्सीबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. या सर्व तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी गॅस वितरक कंपन्यांकडून आढावा घेतला आहे 

Post a Comment

Previous Post Next Post