चामोर्शी तालुक्यात अवैद्य रेती वाहतूकीला उधान.

 रात्रीच्या काळोख्यात चाले रेतीची तस्करी. 

महसूल विभागाचे या तस्करीकडे डोळे झाक..

प्रेस मीडिया लाईव्ह :

जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली :विनोद कोडापे

📱8380802959📱

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी, तालुक्यातील रेती घाटावर अवैद्य रेती वाहतूक करणार्‍या रेती तस्करांनी कारवाईपासून वाचण्याकरिता व स्वतःला आर्थिक लाभ व्हावा, म्हणून जादा दराने रेतीची विक्री करीत आहेत. महसुली बाबू व अधिकारी रात्री घरी जेवण केल्यानंतर गाढ झोप घेतात तेव्हा मध्यरात्रीच्या सुमारास हे तस्कर मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध तस्करी करीत आहेत. मात्र, याकडे संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांचे डोळेझाक होत असून लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.


रात्री महसूली बाबू गाढ झोप घेत असताना कारवाई करणार तरी कोण..? हे धाक न बाळगता थेट रात्रभर व सुट्टीच्या दिवशी कुरुड, रामपूर, विसापूर, आमगाव, खोळदा या नदी घाटातून विविध ठिकाणी रस्ते तयार करून मोठ्या प्रमाणात अवैद्य रेतीची वाहतूक केली जात आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी त्यांच्या प्रकल्पाच्या ठिकाणी अवैद्य रेतीची वाहतूक करून त्याठिकाणी टाकल्या जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये केल्या जात आहे. 

ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाहतूक करून रेती विक्रीचा गोरखधंदा राजरोसपणे केला जात आहे. तसेच अवैध रेती उपसा, वाहतूकी बाबत महसूल प्रशासन अनभिज्ञ नसून केवळ कुंभकर्णी झोप घेत असल्याचे सोंग करीत आहे. संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांकडूनच रेती माफियांना रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक करायला मुभा मिळत असल्याचेही बोलले जात आहे. एवढेच नाही तर दीड ते दोन हजार रुपयाला मिळणारी रेती गरीब व सामान्य नागरिकांना पाच ते सहा हजार रुपयांना विकल्या जात आहे. त्यामुळे गरीब नागरिकांना घर बांधण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहणार की काय असे चित्र पाहायला मिळत आहे. महागाईमुळे नागरिकांचे आधीच कंबरडे मोडले आहे. तर दुसरीकडे घर बांधकाम करणार्‍या नागरिकांचे रेतीच्या अधिकच्या दरामुळे कंबरडे मोडलेले आहे. तरी प्रशासनाने याची दखल घेऊन रेती घाटाचे लिलाव लवकरात लवकर करून सामान्य नागरिकांना न्याय द्यावा व रेती तस्करावर गस्त घालून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केल्या जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post