इश्तियाक अहमद खान यांनी ही तब्बल अडीच कोटींची जमीन विराट रामायण मंदिरासाठी दिली.
प्रेस मीडिया लाईव्ह :
जगातील सर्वात मोठ्या हिंदू मंदिरासाठी आपली जमीन दान करत एका मुस्लीम कुटुंबाने जातीय सलोख्याचं उदाहरण दिलं आहे. धर्माच्या भिंती ओलांडत बिहारमधील कुटुंबाने तब्बल अडीच कोटींची जमीन विराट रामायण मंदिरासाठी दिली आहे.हे जगातील सर्वात मोठं हिंदू मंदिर असल्याचा बोलले जात आहे. राज्यातील पूर्व चंपारण जिल्ह्यात हे मंदिर उभारलं जात आहे.
पाटणा मधील महावीर मंदिर विश्वस्त मंडळाने या मंदिराचं काम हाती घेतलं आहे. या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आचार्य किशोर कुणाल यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं की, "इश्तियाक अहमद खान यांनी ही जमीन दान केली असून ते उद्योजक आहेत"."मंदिराच्या बांधकामासाठी आपल्या कुटुंबाची जमीन दान करण्यासंबंधीची सर्व औपचारिकता त्यांनी पूर्ण केली आहे," अशी माहिती माजी आयपीएस अधिकारी कुणाल यांनी दिली आहे. आचार्य यांनी खान यांनी दिलेलं हे दान दोन समाजात असणारा सलोखा आणि बंधु भावाचे उत्तम उदाहरण असल्याचं म्हटलं आहे. मुस्लिमांच्या मदती शिवाय हे स्वप्न पूर्ण होणं अशक्य होतं असंही ते म्हणाले.
महावीर मंदिराने आतापर्यंत मंदिर उभारणीसाठी १२५ एकर जमीन मिळवली आहे. आता अजून २५ एकर जमीन विश्वस्त मंडळ मिळवणार आहे.विराट रामायण मंदिर २१५ फूट उंच असलेल्या कंबोडियातील १२ व्या शतकातील जगप्रसिद्ध Angkor Wat संकुलापेक्षा उंच असेल. पूर्व चंपारणमधील संकुलात १८ मंदिरं असतील आणि तेथील शिवमंदिरात जगातील सर्वात मोठे शिवलिंग असेल. या मंदिराच्या बांधकामाचा अंदाजे खर्च ५०० कोटी आहे. संसदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामात सहभागी तज्ज्ञांसोबत विश्वस्त मंडळ चर्चा करणार आहे.