विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू
प्रेस मीडिया लाईव्ह :
सांगली : रशिया आणि युक्रेन मधील युद्धाची झळ युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बसली आहे. युक्रेनमध्ये सांगली जिह्यातील दहा विद्यार्थी अडकले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज देण्यात आली आहे.काही विद्यार्थ्यांना युक्रेनमधून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले असले तरी या विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत आहेत. विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. चार विमाने पाठविण्यात येणार असल्याने युक्रेनमधील विद्यार्थी लवकरच परततील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
रशियाकडून युक्रेनमधील महत्त्वाच्या शहरांवर हल्ले करण्यात येत आहेत. या युद्धजन्य परिस्थितीत प्रचंड तणावाचे वातावरण असून, हिंदुस्थानची चिंता वाढली आहे. शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेले शेकडो भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. यामध्ये सांगली जिह्यातील दहा विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे, तर त्याची सर्व माहिती जिल्हा नियंत्रण विभागामार्फत सरकारकडे पाठविण्यात आली आहे. जिह्यातील पार्थिव विजय सुतार (युनिव्हर्सिटी इन कार्कीव), अभिषेक प्रकाश पाटील, प्रथमेश सुनील हंकारे (लिव्हीव्ह युनिव्हर्सिटी), तोहिद बशीर मुल्ला, विशाल सुभाष मोरे, आदित्य अर्जुन पुसावळे, स्नेहल नवनाथ सावंत, संध्या रामचंद्रा, कोमल तानाजी लवटे (लिनिव्हो फान्सिस्क), यश मनोज पाटील (बुकोव्हीन युनिव्हर्सिटी) हे विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत.
युद्धाच्या बातम्या सुरू झाल्यापासून या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांत अस्वस्थता पसरली आहे. पालक काळजीत असताना काही विद्यार्थ्यांचा पालकांशी संपर्क झाला आहे. व्हॉट्सऍप कॉलिंग तसेच मोबाईलवरून मेसेज करून आपण वास्तव्यास असलेला परिसर सुरक्षित असल्याचे सांगत आहेत. युद्धामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे मोबाईलची बॅटरी टिकवून ठेवावी लागते. त्यामुळे काही अपडेट असतील तर नंतर देतो, असे मुले सांगत असल्याचे काही पालक सांगत आहेत. काही विद्यार्थ्यांची नावे जाहीर करू नये, अशी विनंतीही कुटुंबाकडून केली जात आहे.
'आम्ही युक्रेनमध्ये सुरक्षित आहोत', असा संदेश युक्रेन येथे वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या पंढरपूर तालुक्यातील तपकिरी शेटफळ येथील विश्वास बोंगे याने पाठविली आहे. या मेसेजमुळे चार पालकांचा जीव भांडय़ात पडला असून, यातील दोघेजण भारतात दूतावासाच्या मदतीने बसने प्रवास करत युक्रेनच्या सीमा ओलांडून रोमानिया येथून भारतात येण्याच्या तयारीत आहेत. पंढरपूर तालुक्यातील विश्वास ज्योतिराम बोंगे (तपकिरी शेटफळ), वेदांत बाळासाहेब पाटील (रोपळे), वैष्णवी दिलीप कदम (पंढरपूर) व प्रसाद शिंदे-नाईक (पंढरपूर) हे चार जण युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. तेथील युद्धजन्य परिस्थितीचा अंदाज आल्याने भारतात येण्यासाठी त्यांनी विमानाची तिकिटेही काढून ठेवली होती. पण 24 तारखेला पहाटेच हल्ला झाल्यानंतर युक्रेनमधील सर्व विमानसेवा बंद झाल्याने त्यांना दुसऱया मार्गाने भारतात परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.