नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणे आपले प्रथम कर्तव्य... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे




प्रेस मीडिया लाईव्ह

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील


उसर येथील अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय  प्रशासकीय इमारतीचे भूमीपूजन सोहळा संपन्न

 अलिबाग,:- कोरोना अजून संपलेला नाही, मास्कची सक्ती कधी काढणार हा प्रश्न सातत्याने विचारला जातोय, मात्र आताच काही सांगता येत नाही. आता आपल्याला हा जो काळ मिळाला तो लसीकरण वाढविण्यासाठी उपयुक्त आहे. साथ शिखरावर असताना लसीकरण करणे कितपत योग्य हे डॉक्टर सांगतील परंतू आता लाट कमी होत असताना लसीकरण वाढविणे गरजेचे आहे. नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणे, हे आपले प्रथम कर्तव्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दूरदृष्यप्रणालीद्वारे केले.


अलिबाग तालुक्यातील उसर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रशासकीय इमारतीचा भूमीपूजन सोहळा दूरदृष्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तर ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि.22 फेब्रुवारी) रोजी संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हेदूरदृष्यप्रणालीद्वारे तर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री कु.आदिती तटकरे,आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती योगिता पारधी, खासदार सुनिल तटकरे, आमदार बाळाराम पाटील, आमदार अनिकेत तटकरे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक *डॉ.दिलीप म्हैसेकर,* जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.महेंद्र कुरा, सहाय्यक अधिष्ठाता डॉ.गिरीष ठाकूर, सरपंच अनिता गोंधळी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे, माजी आमदार सुरेश लाड, सभापती बबन मनवे, महेंद्र घरत, पदाधिकारी, विविध विभागांचे शासकीय अधिकारी आदी मान्यवर प्रत्यक्ष उपस्थित होते.

     मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, लसीकरणानंतरही कोरोना लागण होते पण त्याची घातकता कमी होते, जीव वाचविण्याचे सुरक्षा कवच म्हणून लस महत्वाची आहे. गेल्या दोन वर्षात राज्यातील रुग्णालयांचे नूतनीकरण, नवीन रुग्णालयांचे उद्घाटन, श्रेणीवर्धनाचे जास्तीत जास्त काम महाराष्ट्रात झाले. आरोग्य सेवेला ब्रेक न लावता त्यात सातत्याने वाढ करावी लागली. संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्याने या आव्हानात्मक परिस्थितीत आरोग्य सुविधांमध्ये प्रचंड वाढ केली. उद्योग-व्यवसायाचा विकास करताना निरोगी आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. 

 छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड जिल्ह्यात या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे भूमीपूजन संपन्न होत आहे. शिवरायांच्या भूमीत आधुनिक सोयी सुविधा असलेले वैद्यकीय महाविद्यालय- रुग्णालय उभे करीत आहोत, त्याचबरोबर अपघातग्रस्त भागात ट्रॉमा केअर सेंटर उभे करीत आहोत, याचे समाधान वाटत आहे. 

  अनेकांच्या अनेक मागण्या असतात. मात्र नुसत्या मागण्या करून काही होत नाही तर त्या मागण्यांच्या पूर्णत्वासाठी पाठपुरावा करावा लागतो. या जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या महाविद्यालयासाठी सातत्याने पाठपुरावा केला आणि त्या यशस्वीही झाल्या. मुंबई-पुण्याच्या सीमा लाभलेल्या या जिल्ह्याला भविष्यात चांगल्या आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न निश्चित केला जाईल असे सांगून शेवटी ज्यांचे या रुग्णालय उभारणीस सहकार्य लाभले त्या सर्वांना धन्यवाद. या महाविद्यालयाची इमारत लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य राज्य शासनाकडून दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार म्हणाले की, एका अत्यंत महत्त्वाच्या आणि मोठ्या प्रकल्पाची आज सुरुवात होत आहे. महाविद्यालय काढणे तशी अवघड गोष्ट नसते, मात्र वैद्यकीय महाविद्यालय काढणे ही अवघड गोष्ट आहे. कारण त्यासाठी कमीत कमी 500 ते 700 बेड्सचे हॉस्पिटल असावे लागते आणि वैद्यकीय कर्मचारी वर्ग व साधनसामग्री लागते. त्यात किमान 500 कोटींची गुंतवणूक सुरुवातीला करावी लागते. ती गुंतवणूक केल्यानंतर महाविद्यालयासाठी वेगवेगळ्या सुविधा उभाराव्या लागतात. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, कर्माचाऱ्यांसाठी निवासस्थाने उभारावी लागतात. हे अवघड काम खासदार श्री.सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, राज्य सरकार व सरकारमधील संबंधित मंत्री मिळून करीत आहेत. या सर्वांचे तसेच त्यांना सहकार्य करणाऱ्या स्थानिक नागरिकांचे मी अभिनंदन करतो. या जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी लोकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प त्यांनी हाती घेतला आहे

Post a Comment

Previous Post Next Post