चांधई मधील शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग .. तब्बल दोन एकरात टोमॅटो ची लागवड; लाखोंचा उत्पन्न घेण्याचा मानस



प्रेस मीडिया लाईव्ह : 

नरेश कोळंबे :  कर्जत

 कर्जत तालुक्यात अनेक शेतकरी आपल्या कल्पकतेने शेती मध्ये विविध प्रयोग करत आले आहेत. त्याचप्रमाणे चांधई गावातील एका शेतकऱ्याच्या शेतात टोमॅटो चे भरघोस पीक आले आहे . ह्यात ह्या शेतकऱ्यांचे आर्थिक हित लक्षात घेता एक अनोखा प्रयोग केल्याने सर्व परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.



  कडा व भिवपूरी रस्त्यांतर्गत असलेल्या चांधई गावात अनेक प्रयोगशील शेतकरी राहत आहेत त्यामध्ये माधव कोळंबे , सुनिल रसाळ, दिलीप बागडे आणि सुभाष गोसावी अश्या अनेक शेतकऱ्यांनी शेती क्षेत्रात मोलाची कामगिरी करत गरीब कष्टकरी शेतकरी वर्गाला आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कसे जास्त पीक घेता येईल ते आपल्या कार्य कर्तृत्वाने दाखवून दिले आहे. माधव कोळंबे यांनी यशस्वीरीत्या भुईमुगाचे उत्पादन घेऊन दाखवत घरात वापरासाठी शेंगदाणा तेल बनवले. सुनील रसाळ हे मागील काही वर्षांपासून यशस्वीरीत्या कलिंगडाचे पीक घेत आहेत. तर यावर्षी सुभाष गोसावी यांनी आपल्या घराशेजारील २ एकर जमिनीत गवाण जातीच्या वेलवर्गीय टोमॅटो ची लागवड केली आहे. ही वेल तब्बल पाच फुटापर्यंत वाढली असून त्याला काठींचे सहारे दिले असून अनेक टोमॅटो लागलेले पाहायला मिळत आहेत. एका झाडापासून कमीतकमी २ ते ४ किलो टोमॅटो मिळतील असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. पीक छान आल्याने या पिकातून लाखोंचे उत्पन्न मिळेल असे यावेळी बोलताना सुभाष गोसावी यांनी सांगितले. या पिकाला कर्जत कृषी अधिकारी गोसावी यांनी ही भेट देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.सुभाष गोसावी यांना २०१२-२०१३  साली रायगड जिल्हा परिषद कृषी विभाामार्फत कृषिनिष्ठ पुरस्कार ,  तसेच ग्रामपंचायत नसरापूर मधून देखील गौरविण्यात आले आहे. 

प्रतिक्रिया 

 ह्या वर्षी एक वेगळा प्रयोग करायचा ठरवून कर्जत कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गवाण जातीच्या टोमॅटोची लागवड २ एकरात केली आहे. आलेले उत्पादन पाहता केलेल्या मेहनतीचे फळ गोड मिळणार आहे हे निश्चित झाले असून त्यातून लाखोंचे उत्पन्न प्राप्त होईल. हा प्रयोग यशस्वी झाल्यास आपल्या आसपासचे सर्व शेतकरी हा प्रयोग करतील त्यामुळे आपल्याला पुण्यावरून येणाऱ्या भाजीवर अवलंबून राहावे लागणार नाही आणि आपला शेतकरी सधन बनेल . 


    -- सुभाष गोसावी ( प्रगतशील शेतकरी, चांधई)

Post a Comment

Previous Post Next Post