मौलाना अब्दुल कलाम आझाद, भारताचे स्वातंत्र्य सेनानी आणि देशाचे पहिले शिक्षण मंत्री , यांच्या स्मृती दिनानिमित्त.



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख :

 प्रख्यात स्वातंत्र्यसेनानी व आझाद भारताचे पहिले शिक्षणमंत्री, तसेच सर्वात कमी वयाचे काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष, मौलाना अबुल कलाम आझाद यांचे मूळ नाव अबुल कलाम मोहनुद्दीन अहमद असं आहे. अबुल कलाम म्हणजेच ‘वाचस्पती’ ही पदवी त्यांना मिळाली होती. पुढे ते  आझाद नावाने प्रसिद्ध झाले. आझाद यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1888 रोजी मक्का येथे झाला. त्यांचे वडील भारतीय होते, तर आई अरब होती.

आझाद यांना लहानपणापासून वाचन, लेखनाची हौस होती. त्यांनी फारसी, उर्दू, अरबी भाषांचे ज्ञान मिळविले. तसेच तर्कशास्त्र, इस्लाम धर्म, तत्त्वज्ञान, गणित या विषयांचा अभ्यास केला. मौलाना अब्दुल कलाम आझाद एक निर्भीड पत्रकार ही होते.

आझाद यांनी लोकजागृतीसाठी कोलकता येथे ‘अल हिलाल’ हे उर्दू साप्ताहिक सुरू केले;  पण इंग्रज सरकारने त्यावर बंदी घातली. नंतर त्यांनी ‘अल बलाग’ हे दुसरं साप्ताहिक सुरू केले. मौलाना आझाद त्यांच्या लेखनातून ब्रिटिश राजवटीविरुद्ध जनतेला जागृत करत. जनतेच्या मनात अन्यायाविरुद्ध लढण्याची जाणीव निर्माण करत. 

विशेषत :  मुस्लिमांनी आणि हिंदू यांनी  बरोबरीनं ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष करावा, असं ते त्यांच्या लेखनातून, भाषणातून सांगत. आपल्या धर्माची तत्त्वं त्यांनी जपली. मात्र, धर्माची शिकवण मानवता आहे, या मानवतावादी धर्माचे आचरण करावे, त्यातूनच समाजाची आणि देशाची सेवा करावी, ते गांधीजींचे अनुयायी बनले. पुढे काँग्रेसचे प्रमुख नेते झाले. वयाच्या अवघ्या पस्तिसाव्या वर्षी ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले. तेव्हा अध्यक्षीय भाषणात हिंदू-मुस्लिम ऐक्यावर त्यांनी भर दिला. 8ऑगस्ट 1942 रोजी ब्रिटिश सरकारला ‘भारत छोडो’चा इशारा देण्यात आला. तेव्हा प्रमुख काँग्रेस नेत्यांची धरपकड झाली. अर्थातच, मौलाना आझाद यांनाही अटक झाली. 

इंग्रजांना मी सत्ताधारी मानीत नाही तर त्यांना विनंती का करू ? हे उदगार मौलाना आझाद यांना इंग्रजांनी अहमदनगर येथील तुरुंगात ठेवले होते त्या वेळी त्यांनी काढले. मौलाना आझाद यांच्या पत्नीचे निधन झाले होते. इंग्रजांनी त्यांना निरोप दिला की, पत्नीच्या दफनविधीसाठी आम्ही तुम्हाला सोडू; पण तुम्ही तसे विनंती पत्र इंग्रज सरकारला द्या. त्या वेळी मौलाना आझाद यांनी इंग्रजांना असे बाणेदार उत्तर दिले. 

इंग्रजांना मी सत्ताधारी मानीत नाही तर त्यांना विनंती का करू ?

मौलाना आझाद यांनी इस्लामचा पवित्र धर्मग्रंथ कुराणाचा अभ्यास करून त्यावर ‘तर्जुमानुल कुरान’ हे पुस्तकही लिहिले आहे.मौलाना आझाद यांना अरबी, फारशी, इंग्रजी व उर्दू या भाषा चांगल्या अवगत होत्या व ते चारही भाषांतून लिखाण करीत असत. ते एक उत्कृष्ट वक्तेदेखील होते. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित राहत असत. ते हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक होते. अनेक हिंदू विचारवंत त्यांचे चाहते होते. ते भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील एक निष्ठावान शिपाई होते. फारसा गाजावाजा न करता कार्य करीत राहणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते.

मौलाना आझाद यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात एका निष्ठावान राष्ट्रवादी मुसलमानाची भूमिका बजावली. मौलाना आझाद देशाची अखंडता अबाधित राखण्यासाठी अहोरात्र झटत होते. महात्मा गांधींशी चर्चा केल्यानंतर त्यांनी देशाचे विभाजन स्वीकारले, पण जे मुसलमान भारत सोडून पाकिस्तानला स्थलांतरित होत होते, त्यांना मौलाना आझादांनी विरोध केला होता. मौलाना हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे सच्चे प्रतीक होते.

सन 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. पं. जवाहरलाल नेहरूंनी मौलानांकडे शिक्षण मंत्रालयाचे काम सोपवले व ते स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री झाले. त्यांनी त्या काळी अत्यंत बिकट परिस्थितीतही भारतात शिक्षणाचा प्रसार व प्रचार उत्तम प्रकारे राबवला. मौलाना आझाद यांना युरोपच्या तत्कालीन समस्यांचे चांगले ज्ञान होते. जर्मन आणि इटलीच्या सत्ताधा-यांची दडपशाही संपूर्ण जगासाठी मोठा धोका ठरणार आहे, असे ते सांगत. हिटलरच्या काळात अल्पसंख्याक आणि बुद्धिजीवींची सर्रास कत्तल होईल हे मौलानांनी सांगितले होते, आणि तसेच घडले हे जगाने पाहिले. 

हाऊस ऑफ लार्ड्सचे सदस्य लॉर्ड बटमली, ज्यांनी जवळपास 60 वर्षे इंग्लंड व भारताच्या राजकारणात भाग घेतला, ते मौलानांबद्दल म्हणतात, ‘मौलाना आझाद विशाल मनाचे व्यक्ती होते. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य व अखंडतेसाठी कायम प्रयत्नांची पराकाष्ठा केली. स्वातंत्र्यलढ्यात त्यांची भूमिका खूप मोलाची आहे. मौलाना आझाद यांना युरोपियन साहित्याचेही चांगले ज्ञान होते. महाकवी बायरन आणि फ्रान्सच्या कादंबरीकारांची त्यांना चांगली माहिती होती. 22 फेब्रुवारी 1957 रोजी मौलाना अबुल कलाम आझाद यांचे निधन झाले. मौलाना आझाद यांच्या कार्याची दखल महाराष्ट्रानेही घेतली आहे. शरद पवार यांनी मौलाना आझाद यांच्या नावाने वित्तसंस्था उभारली आहे. या वित्तसंस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील अल्पसंख्याक, विशेषत: मुस्लिम समाजातील गरीब व्यावसायिकांना आर्थिक मदत होत आहे. हजारो अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जात आहे. इतर राज्यांतही मौलाना आझादांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अनेक प्रकल्प राबवण्यात येत आहेत. हैदराबाद येथे मौलाना आझाद मुक्त विद्यापीठ उभारण्यात आले आहे. केंद्र सरकारने 1992 मध्ये मौलाना आझाद यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ किताब प्रदान केला. तसेच मौलाना आझादांचा जन्मदिवस 11 नोव्हेंबर हा ‘शिक्षण दिवस’ म्हणून साजरा करण्याचे केंद्र सरकारने नुकतेच जाहीर केले आहे.

त्यांचे शैक्षणिक धोरण धर्मनिरपेक्ष होते. आधुनिक शास्त्रे आणि आधुनिक विचार यांनाच त्यांच्या शैक्षणिक धोरणात प्राधान्य होते.

 ‘इंडिया विन्स फ्रिडम’ हे त्यांचे आत्मचरित्र त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध करण्यात आले. मौलाना आझाद यांचे 22 फेब्रुवारी 1958 रोजी निधन झाले.


प्रेस मीडिया लाईव्ह  : 

पुणे जिल्हा प्रतिनिधी अन्वरअली शेख 

Post a Comment

Previous Post Next Post